ब्रेकिंग न्यूज :
भारत

ओव्हरलोड खडी डंपर चालकाचा माज ; निष्पापाचा बळी, १२ वर्षांचा समाधान चिरडला; चिकणी गाव सुन्न

Blog Image
एकूण दृश्ये: 1707

ओव्हरलोड खडी डंपर चालकाचा माज ; निष्पापाचा बळी, १२ वर्षांच्या  समाधानला सायखिंडी फाट्यावर चिरडले; चिकणी गाव सुन्न

        संगमनेर (प्रतिनिधी)

तालुक्यात बिनधास्त सुरू असलेल्या खडी वाळू तस्करीचा काळा चेहरा पुन्हा एकदा रक्तरंजित वास्तवासह समोर आला आहे. नदीपात्रातून राजरोस सुरू असलेल्या अवैध वाळू उपशासह खडी वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ओव्हरलोड डंपरने एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला. सायखिंडी फाट्यावर भरधाव वेगात धावणाऱ्या खडीने भरलेल्या डंपरने १२ वर्षांच्या समाधान मोहितेला चिरडत मृत्यूच्या जबड्यात ढकलले. या भीषण घटनेने संपूर्ण चिकणी गाव हादरून गेले आहे.

बुधवार, दि. ११ फेब्रुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावरील सायखिंडी फाट्यावर हा हृदयद्रावक अपघात घडला. शाळा सुटल्यावर मित्रांसोबत घरी जात असताना ओव्हरलोड खडी वाहून नेणाऱ्या दहा टायर विनानंबर डंपरने समाधानवर घाला घातला. या अपघातात समाधान विश्वनाथ मोहिते (वय १२) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा एक मित्र गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाळू खडी तस्करांचे डंपर गावातील अरुंद रस्त्यांवरून आणि महामार्गावरून बेदरकारपणे धावत असतात. माणसाच्या जीवाची कोणतीही पर्वा नसल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे. क्षमतेपेक्षा अधिक खडी भरून, काही ठिकाणी खडी उतरवून वजन कमी करत भरधाव वाहतूक केली जात असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अपघाता नंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी थेट तालुका पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. संबंधित डंपर, त्याचा चालक आणि मालक यांना ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही, असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला. कारवाई झालीच नाही, तर पोलीस ठाण्या समोरच अंत्यविधी करू असा कडक इशाराही प्रशासनाला देण्यात आला.

----- Advertisements -----

मृत समाधान हा शिक्षणासाठी आपल्या मामाकडे (पवार) राहायला आला होता. दहा वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले असून त्याचे मूळ गाव नायकरवाडी (ता. मुथाळणे) येथे आहे. आई संगीता ही मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकते. समाधान हा सहावी सातवीतील विद्यार्थी होता. येत्या २४ फेब्रुवारीला त्याचा वाढदिवस होता; मात्र नियतीने वाढदिवसाआधीच त्याच्यावर घाला घातला. अल्पवयात आयुष्य संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी पवन विजय काशीद यांनी फिर्याद दिली असून, आरोपी चालका विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118, 115(2), 189(1), 189(4), 352, 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, डंपर चालक व मालकाला ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, तसेच रास्ता रोको आंदोलन छेडू, असा गर्भित इशाराही नातेवाईक व ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. तालुका पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. चालक मालक यांच्यावर कठोर कारवाई करू असे आश्वासन पोलीस निरीक्षकांनी यावेळी दिले.

सुखाचे रहस्य समाधानात आहे.

संत ज्ञानेश्वर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin