यशाची शिखरे तुमचीच आहेत ; तुम्ही कॉमन विद्यार्थी नाही ! - हिरालाल पगडाल
निरोप समारंभ नव्हे शुभेच्छा शुभारंभ !
संगमनेर ( प्रतिनिधी )
दिवसाचे ओझे पेलत नेहमीच अडी अडचणींना सामोरे जात,रात्री स्वप्नांना उजाळा देत शिक्षणाची वाट चालणारे रात्र शाळेचे विद्यार्थी हे खरोखरच सर्वसामान्य नाहीत ते असाधारण आहेत. संघर्षाला सामोरे जात यशाची पायरी टप्प्याटप्प्याने चढणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात केवळ परीक्षा पास होण्याची नाही, तर आयुष्य घडविण्याची जिद्द स्पष्ट दिसते. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. हिरालाल पगडाल म्हणाले, तुम्ही केवळ शालेय परीक्षा देत नाही, तर आयुष्याच्या कठीण प्रश्नपत्रिकेलाही सामोरे जात आहात. प्रत्येक टप्प्यावर येणाऱ्या प्रश्नांची उकल एकाग्रतेने आणि आत्मविश्वासानेच शक्य आहे. पेपरवर लक्ष केंद्रित ठेवा यश तुमच्या दिशेने चालत येईल असे ते म्हणाले.

सभापती , शिक्षण मंडळ नगरपालिका , संगमनेर डॉ. अनुराधाताई सातपुते यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितले की, शाळेने दिलेले संस्कार आणि शिक्षकांचे मार्गदर्शन ही तुमची खरी ताकद आहे. त्या भावनांना जपत करिअरची वेगळी वाट निवडा. आज विविध क्षेत्रांमध्ये असंख्य संधी तुमच्यासमोर उभ्या आहेत. जिद्द, आत्मपरीक्षण आणि आवडीचा विषय निवडण्याची तयारी असेल, तर कोणतीही कठीण परिस्थिती तुम्हाला रोखू शकत नाही. त्यांनी रात्र शाळेतील विद्यार्थी हे समाजासाठी आदर्श ठरतात, असेही नमूद केले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक विकास जगताप यांनी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत, शिक्षण आणि कष्ट यांची सांगड घालत त्यांनी केलेल्या प्रवासाची माहिती उपस्थित मान्यवरांना दिली.
श्री. पवार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, तुमच्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक अडचणीच्या निराकरणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुमच्या यशाच्या प्रवासात आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांसमोर अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत विविध प्रकारच्या अडचणी उभ्या राहत असतात. विशेषतः नाईट शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, प्रवेशासाठी लागणारी माहिती, मार्गदर्शनाचा अभाव अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर सिद्धार्थ नाईट हायस्कूल येथे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात छात्रभारतीचे अनिकेत घुले यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारे आश्वासन दिले.

दहावी उत्तीर्ण झालेल्या एकाही विद्यार्थ्याला अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक ती सर्व जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत. प्रवेश अर्ज भरण्यापासून ते आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, योग्य कनिष्ठ महाविद्यालयाची निवड, प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन तसेच शासकीय नियमांची माहिती देण्यापर्यंत सर्व स्तरांवर विद्यार्थ्यांना सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले
विशेष म्हणजे, सिद्धार्थ नाईट हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याऐवजी त्यांच्या आगामी परीक्षांसाठी शुभेच्छा देत एक सकारात्मक शुभारंभ करण्यात आला. हेच या शाळेचे वेगळेपण अधोरेखित करणारे ठरले. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत, आत्मविश्वासाने आम्ही यश संपादन करणारच! असा निर्धार व्यक्त केला.

