ब्रेकिंग न्यूज :
भारत

भटक्या श्वानांच्या चाव्याने युवकाचा बळी ; बोदवडला कुत्र्याचा चावा; छत्रपती संभाजीनगरमध्ये मृत्यू ; संगमनेरात अंत्यसंस्कार ; नवयुवक ठरला रेबीजचा शिकार

Blog Image
एकूण दृश्ये: 443

भटक्या श्वानांच्या चाव्याने युवकाचा बळी ; बोदवडला कुत्र्याचा चावा; छत्रपती संभाजीनगरमध्ये मृत्यू ; संगमनेरात अंत्यसंस्कार ;नव युवक ठरला रेबीजचा शिकार 

      संगमनेर (प्रतिनिधी):

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीने एका तरुणाचा जीव घेतला आहे. कुत्र्याच्या चाव्याने संगमनेर येथील अर्जुन सुरेश कतारी (वय २९) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन सुरेश कतारी हे कामानिमित्त चाळीसगाव येथे आपल्या सासरवाडीस गेले होते. माल घेऊन बोदवड मार्गे परत येत असताना झोप येत असल्याने त्यांनी एका ठिकाणी थोडी विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी भटक्या कुत्र्याने त्यांच्या तोंडाला चावा घेतला. घटनेनंतर त्यांनी बोदवड, चाळीसगाव, संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार व इंजेक्शन घेतले.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबर रोजी कुत्रा चावल्याची घटना घडली. त्यानंतर तातडीचे उपचार झाले, मात्र प्रकृती हळूहळू बिघडत गेली. पुढील उपचारांसाठी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, ६ तारखेला अंकाई येथे एका कार्यक्रमात त्यांनी भोजनही केले होते. परंतु २० तारखेला संगमनेरहून घरातून निघाल्यानंतर ते परत आलेच नाहीत. 

अखेर शनिवार, दि. १० रोजी दुपारी अडीच वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अर्जुन कतारी हे कतार वस्ती, संगमनेर येथे आपल्या आई, पत्नी आणि एका छोट्या गोंडस चिमुकलीसह वास्तव्यास होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी रात्री संगमनेरात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

----- Advertisements -----

या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न किती गंभीर आणि जीवघेणा आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना केवळ तात्पुरत्या कारवाया पुरेशा ठरत नाहीत. गावोगावी भटक्या कुत्र्यांचा तात्काळ व कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे प्रशासन जागे होणार का ? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

रेबीजची लक्षणे (जनजागृती)

रेबीजची लक्षणे सुरुवातीला फ्लूसारखी ताप, डोकेदुखी, अशक्तपणा अशी दिसू शकतात. पुढे आजार गंभीर व धोकादायक वळण घेतो. यामध्ये चावलेल्या जागी मुंग्या येणे, खाज, पाण्याची भीती, जास्त लाळ येणे, गोंधळ व अस्वस्थता, हालचालींवर नियंत्रण न राहणे पॅरालिसिस आणि भ्रम यांचा समावेश होतो. वेळेत उपचार न केल्यास रेबीज प्राणघातक ठरतो. कोणत्याही प्राण्याने चावा घेतल्यास तो किरकोळ वाटला तरी तात्काळ वैद्यकीय उपचार घेणे अत्यावश्यक आहे.

आपण जे विचार करतो, ते आपण होतो.

भगवद्गीता
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin