१८ वर्षांपूर्वीचा लाडक्या बहिणींचा ‘दादा’ सोबतचा औक्षणाचा अनमोल क्षण ; पवना थडीतील अजीत पवारांची भेट आजही महिलांचे गहिवरले मन, आठवणीच्या दळवळीत 'मृदुगंधाचा स्मृतीगंध'
संगमनेर ( भारत रेघाटे )
पवना थडीच्या गजबजाटातला तो दिवस बाहेरून पाहता साधा पण मानाचा होता. प्रसंग होता पवना थडीच्या गजबजाटलेल्या उद्घाटनाचा. पिंपरी चिंचवड मधील अनेक स्टॉल या ठिकाणी लावल्या जात होते. 'मृदुगंध’ महिला बचत गटातील महिलांसाठी तो क्षण आयुष्यभर जपून ठेवावा असा अमूल्य ठेवा ठरला.
तब्बल १८ वर्षांपूर्वी अजीत दादांनी महिलांशी साधलेला तो आपुलकीचा, हसतमुख संवाद आजही त्यांच्या मनात तसाच जिवंत आहे. दादांनी त्यावेळी लाडक्या बहिणीसारखी प्रत्येक महिलेला प्रेमाने ‘ताई ताई. म्हणत विचारपूस केली. लाडक्या बहिणी बद्दलचा तो आदर, आपुलकी आणि माणुसकीचा ओलावा आजही त्या लाडक्या बहिणीच्या आठवणीत ताजा आहे.
बुधवार दि. २८ जानेवारी सकाळी दादांचे अपघाती निधनाचे वृत खाली पडताच मनखिन्न शून्य झाले, विश्वास बसेना. एकामागून एक एक घटना समजत गेल्या. त्या सर्व लाडक्या बहिणींना एकदम गहिवरून आले. अन प्रत्येकीच्या मनात आठवणींचे धुमारे उमलून आले. साधारण १७–१८ वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचे फोटो कुठे आहेत, कोणाकडे आहेत, कदाचित महानगर- पालिकेच्या बचत गट प्रकल्पाच्या फाईलमध्ये वापरले गेले का? हे सांगणे आज कठीण असले तरी त्या भेटीची आठवण मात्र महिलांच्या मनात कायम कोरली गेली असे त्या महिला स्पुदून स्पुदून सांगत होत्या.
भोसरी मध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘मृदुगंध’ महिला बचत गटाची आणि आधार पुरूष बचत गटाची सुरुवात झाली होती. त्यानंतर लगेचच पवना थडीमध्ये खवय्येगिरीचा स्टॉल लावण्याची संधी मिळाल्याने महिलांचा उत्साह गगनात मावेनासा झाला होता. हा आनंद महिलांनी दादांसमोर मोकळेपणाने व्यक्त केला. बचत गट किती दिवसांपासून सुरू आहे, ? व्यवसायाची दिशा काय आहे,? आणि महिलांनी या माध्यमातून कशी भरारी घ्यावी, यावर दादांनी मनमोकळा संवाद साधत मार्गदर्शन केले. या माध्यमातून महिला नक्कीच पुढे जातील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
बचत गटातील एकूण आठ महिलांनी स्टॉल लावण्याचा निर्धार केला होता. पहाटे पासून तयारीला लागलेल्या पाच महिला पवना थडीमध्ये मासवडी, खास अशी चविष्ट स्वादिष्ट रूचकर अशी आळुवडीसाठी झटत होत्या, तर उर्वरित महिला घरून इतर कामांतून मदतीचा हात देत होत्या. योगायोग असा की सकाळी आठच्या सुमारास दादा पवना थडीच्या उद्घाटनासाठी आले. उद्घाटनाची लगबग सुरू असतानाच त्यांच्या सहकाऱ्यांच्या नजरेत एक लक्षवेधी ड्रेसकोड मध्ये काम करत असलेल्या ह्या महिला दिसल्या. त्यांची पावले या महिलांच्या दिशेनी वळाली. दादांचे औक्षण करायचे आहे, हे शब्द कानी पडताच महिलांचा आनंद शब्दांत मावेनासा झाला. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरला. ‘मृदुगंध’ महिला बचत गटाच्या अध्यक्षा वैजयंती रेघाटे, उपाध्यक्ष सविता कणसे, तसेच सहसचिव ज्योत्स्ना बनकर-राऊत, मीनाक्षी हुमनाबादे आणि सुवर्णा मंडलिक या लाडक्या बहिणींनी दादांचे औक्षण केले. तो घटनाक्रम आजही आमच्या डोळ्यांसमोरून जात नाही. ती केवळ आठवण नाही, ती आमच्यासाठी प्रेरणा आणि स्फूर्ती आहे, अशी भावना महिलांनी व्यक्त केली.
त्या काळातही महिलांबद्दल दादांची आपुलकी, आदराने केलेला संवाद आणि ‘लाडक्या बहिणी’ म्हणून दिलेला ओळख नि मान आजही तितकाच ताजा वाटतो. सकाळची वेळ होती. स्टॉल उघडण्याची घाई, उद्घाटनाची धावपळ आणि अजून फारशी गर्दी नव्हती. अजीत दादांचे औक्षण ते पण आमच्या हस्ते विश्वासच बसत नव्हता! दादांनी महिलांशी संवाद साधला. तुम्ही इथल्याच आहात का? आतापर्यंत कोणकोणते उपक्रम राबवले आहेत? स्टाॅल वर काय पदार्थ बनवणार आहात? असे साधे, पण आपुलकीचे प्रश्न विचारत त्या सहज भेटीतून मिळालेला मान, प्रेम आणि हसरा कटाक्ष महिलांसाठी खूप मोठा होता. ती भेट, ती आठवण आणि त्या क्षणातून मिळालेली ऊर्जा आयुष्यभरासाठी पुरेशी ठरली आहे. आज त्या भेटीला अठरा वर्षे लोटली असली, तरी त्या आठवणी वर्षानुवर्षे महिलांच्या मनात तशाच जिवंत राहणार आहेत. हेच त्या भावनांचे खरे मोल आहे.
१८ वर्षांपूर्वीचा लाडक्या बहिणींचा ‘दादा’सोबतचा औक्षणाचा अनमोल क्षण ; पवना थडीतील अजीत पवारांची भेट आजही महिलांचे गहिवरले मन, आठवणीच्या दळवळीत 'मृदुगंधाचा स्मृतीगंध चिरकाल चिरंतन असाच सोबत राहणार कायम आमच्या सोबत खास दादासाठी !

दादा ! तुमच्या लाडक्या बहिणी.
