लाच घेताना तिघे अडकले ! जात प्रमाणपत्रासाठी १३ हजारांची मागणी; ६ हजार घेताच तलाठ्यासह दोघे रंगेहात पकडले
संगमनेर ( प्रतिनिधी )
जातप्रमाणपत्र व कास्ट व्हॅलिडीटी काढून देतो, असे आमिष दाखवत तब्बल १३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठीसह त्याच्या दोन साथीदारांना ६ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही धडक कारवाई मंगळवारी दि. १७ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजता तहसील कार्यालय परिसरात करण्यात आली. कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी तलाठी बाबासाहेब गंगाधर बोहाडे आश्वी बु., ता. संगमनेर) याने तक्रारदाराकडून जातीचा दाखला ६ हजार व कास्ट व्हॅलिडीटी ७ हजार अशा एकूण १३,००० रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तहसील व प्रांत कार्यालयात ओळख असल्याचे सांगत पहिल्या टप्प्यात ६,००० रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. तलाठ्याच्या सूचनेवरून हितेश सोमनाथ घोडेकर २६, रा. राजापूर रोड, ढोलवाडी, संगमनेर याने ही रक्कम स्वीकारली आणि ती प्रतीक विजयकुमार कातोरे २८, रा. सांगवी, संगमनेर याच्याकडे दिली.
याच क्षणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने सापळा यशस्वी करत तिघांनाही ताब्यात घेतले. कारवाई एसीबी पथक प्रमुख अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळ्यात बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे व हारून शेख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास छाया देवरे करत आहेत. शहर पोलीसात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ (अ) व १२ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे महसूल यंत्रणेतील भ्रष्टाचार पुन्हा ऐरणीवर आला आहे.

