ब्रेकिंग न्यूज :
भारत

प्रासंगिक: शोध संतांच्या आठवणींचा : गावाकडच्या पाऊलखुणा; संत विष्णुदास कवींच्या धांदरफळ बु. गावातील जन्मस्थळाचे पुनरूज्जीवन व्हावे ; २८ डिसेंबर १०८ वी पुण्यतिथी विशेष

Blog Image
एकूण दृश्ये: 101

प्रासंगिक: शोध संतांच्या आठवणींचा : गावाकडच्या पाऊलखुणा; संत विष्णुदास कवींच्या धांदरफळ बु. गावातील जन्मस्थळाचे पुनरूज्जीवन व्हावे ; २८ डिसेंबर १०८ वी पुण्यतिथी विशेष

     संगमनेर ( भारत रेघाटे ) 

अहिल्यानगर जिल्ह्याच्या सांस्कृतिक मातीतील एक तेजस्वी देदीप्यमान नाव म्हणजे संतकवी श्री विष्णुदास. वाग्वेवी सरस्वतीच्या वरदहस्ताने त्यांच्या साहित्याचा केवळ औपचारिक परिचय न होता, तो अंतःकरणापर्यंत पोहोचणारा, रसास्वाद आणि मूल्यमापन करणारा असावा या जाणीवेतून हा शोधप्रवास उलगडतो. संत विष्णुदास कवींचे भक्तिरस काव्य हे शब्दांचे अलंकार नसून, सत्याधिष्ठित भक्तीचे, मातृउपासनेचे आणि आत्मानुभवाचे प्रांजळ दर्शन आहे.

     संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बु. या गावाचा इतिहास केवळ भौगोलिक नाही, तर तो धर्मक्षेत्र, तीर्थक्षेत्राच्या पाऊलखुणांनी नटलेला आहे. पुराणसंदर्भांत धांदरफळ हे धौम्य ऋषींचे गाव म्हणूनही उल्लेख आढळतात. संगमनेर परिसर पारमार्थिक वैभवाने समृद्ध असून ‘मंदिरांचे गाव’ म्हणून ओळखला जाणारा हा भाग संपूर्ण तालुक्यासाठी अमृतवाहिणीने पुण्यभूमी ठरलेला आहे. संतकवी आणि परम मातृभक्त श्री संत विष्णुदासांनी देवीच्या उपासनेसाठी अभंग, अष्टके, आख्यानपदे, आरत्या पद, यांची निर्मिती केली. मात्र ही निर्मिती केवळ लयबद्धते पुरती मर्यादित नव्हती ती अनुभवसिद्ध, सत्यनिष्ठ आणि अंतःप्रेरित होती. महालक्ष्मी, रेणुका, जगदंबा यांचे त्यांनी केलेले भक्ती शक्तीचे काव्यमय वर्णन आजही भक्तहृदयाला स्पर्श करते. विविध विषय, विपुल भावछटा आणि आत्मनिवेदनाची प्रांजळ शैली यांतून त्यांच्या काव्याची स्वतंत्र ओळख निर्माण होते. दीडशे पेक्षा अधिक वर्षांपूर्वी श्रीक्षेत्र माहूर येथे वास्तव्यास आलेले विष्णुदास कवी या भूमीला ‘पृथ्वीवरील वैकुंठ’ मानतात. माहूरच्या पश्चिमेला वाहणारी पैनगंगा जणू या क्षेत्राची प्रदक्षिणा घालत असल्याचा अर्थपूर्ण उल्लेख त्यांच्या काव्यात आढळतो. 

श्री संत विष्णुदास महाराज मातपुरवासिनीचे महाकाव्य

१) माझी रेणुका माऊली । कल्पवृक्षाची सावली । 

जैसी वत्सालागी गाय । तैसी अनाथाची माय। 

२) बया दार उघड बया दार उघड 

३) ही आदि माया जगदंबा। रेणुका कुल स्वामिनी अंबा। 

४) विपुल दयाघन गर्ने तव हृदयांबरी श्रीरेणुके हो। आदि रचना देवीचे महंन्मंगल स्त्रोत्र होय. 

    अहिल्यानगर जिल्ह्यातील धांदरफळ बुद्रुक येथे १८१ वर्षापूर्वी जन्मलेले कृष्णाजी रावजी धांदरफळे ( मुळे ) उर्फ विष्णुदास ( पुरूषोत्तमानंद ) यांनी उपासनेसाठी भारतभ्रमण केले. आंध्र प्रदेशातील श्रीक्षेत्र बासर येथे त्यांना सरस्वतीबोध झाला. पुढे माहूरगड येथे स्थायिक होऊन काव्यनिर्मिती हीच साधना आणि मातृभक्ती हेच ध्येय मानून त्यांनी जीवन व्यतीत केले. पश्चिम महाराष्ट्र जन्मभूमी, मराठवाडा कर्मभूमी असे आत्मकथन त्यांनी आपल्या काव्यप्रतिभेतून व्यक्त केले. माहूरगड येथे विष्णुदास कवींचा मठ आहे. पौष शुद्ध अष्टमी, शके १८३९ मध्ये त्यांनी निजधाम गाठले. त्यांचे लहान बंधू श्री गुरुदास महाराज यांनी शके १८१२ मध्ये सातारा येथील बालामृत प्रेसमध्ये श्री विष्णूकविकृत पदे हा ग्रंथ प्रकाशित केला ज्याची प्रस्तावना स्वतः विष्णुदास कवींनी लिहिली होती. देवीची पदे, आरत्या, अष्टके यांमुळे हा ग्रंथ आजही लोकाभिरुचीचा ठेवा ठरतो.  आजही पौष शु अष्टमीला पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या प्रत्यक्ष अनुग्रहाचा अनुभव घेतलेली मंडळी मठात जमतात. आठवणी, कथा आणि प्रेरणा जिवंत राहतात; मात्र मठाच्या जतन, निधी आणि व्यवस्थापनाबाबत समाजाची उदासीनता प्रकर्षाने जाणवते ही खंतही तितकीच खरी आहे. श्री गुरुदास महाराजांनंतर पेंडसे गुरुजी, श्रीधर आनंद स्वामी यांनी मठपरंपरा पुढे नेली. विष्णुदास कवींच्या साहित्यावर नरहरी शास्त्री खरशीकर, डॉ. य. खु. देशपांडे, दादा महाजन, सुनील पंत दांडेकर, डॉ. श्री. के. क्षीरसागर, प्रा. डॉ. बा दा जोशी आदींनी प्रकाश टाकला.एवढेच नव्हे तर प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी त्यांच्यावर शोध प्रबंधातून डॉक्टरेट मिळवली. त्यांच्या लेखनातून विष्णुदास कवींच्या कार्याचे बहुआयामी दर्शन घडते. उमरखेड (यवतमाळ) येथील नित्यानंद सरस्वती यांचा अनुग्रह विष्णुदासांना लाभला. संत परंपरेतील विचारवैभव, भक्ती आणि तत्त्वज्ञान त्यांनी काव्यरूपाने लोकांपर्यंत पोहोचवले. कृष्णा श्रीधर धांदरफळे (मुळे) हे त्यांचे पूर्ण नाव. इसवी सन १८४४ मध्ये जन्म आणि १९१७ मध्ये महानिर्वाण असे ७३ वर्षांचे तपस्वी जीवन जगले. त्यांचा जन्म संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बु. येथे झाला. तर त्यांचे बालपण सातारा मंगळवार पेठेत गेले. प्रारंभी धर्मज्ञान प्राप्तीसाठी हंपी विरूपाक्ष शंकराचार्याच्या मठात वास्तव्य केले. भारत भ्रमणात क्षेत्र बासर मार्गे माहूर येथे आले. हंपी, बासर, माहूर, पांडवलेणी, देवेश्वर अशा पवित्र स्थळांतून त्यांच्या साधनेचा प्रवास घडत गेला आणि अखेरीस मातृतीर्थाच्या छायेत त्यांनी पौष शु. अष्टमी चिरविश्रांती घेतली. संतकवी विष्णुदास हे केवळ इतिहासातील नाव नाही, तर गावाकडच्या मातीत रुजलेली एक अखंड भक्तिपरंपरा आहे. जिच्या पाऊलखुणा आजही आपल्याला अंतर्मुख करतात.

----- Advertisements -----

         शास्त्रशुद्ध संशोधन

संतपरंपरेच्या जतनाची महत्त्वपूर्ण पायरी म्हणजेच हा शोध प्रबंध. किनवट येथील डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी अपार चिकाटीने, शास्त्रशुद्ध संशोधन करत श्री विष्णुदास कवींच्या साहित्यावर 'शोधप्रबंध' सिद्ध केला. त्या अभ्यासपूर्ण कार्याला स्नेहवर्धन प्रकाशन यांनी प्रकाशित करून वाचकांपर्यंत पोहोचवले हीच या संतपरंपरेच्या जतनाची महत्त्वपूर्ण पायरी ठरली आहे.

       प्रबंधातून प्रकाशझोत

महाराष्ट्रातील देवीभक्तीचे थोर संतकवी संत विष्णुदास कृष्णा रावजी धांदरफळे (मुळे) हे रेणुका मातेचे निष्ठावंत उपासक होते. रामकृष्ण परमहंसांनी बंगालमध्ये काली उपासना केली, तसेच विष्णुदासांनी महाराष्ट्रात देवीभक्ती काव्यातून प्रस्थापित केली. ओवी, अभंग, आरती, पोवाडा, लावणी आदी सर्व काव्यप्रकारांतून त्यांनी देवीभक्ती घराघरांत पोहोचवली. संत– पंत– तंत या प्रवाहांचा संगम त्यांच्या साहित्यात दिसतो. माहूर येथे कार्य पूर्ण करणाऱ्या या समन्वयकारी संताला पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण आदरांजली. :- संत विष्मुदास कवींवर शोध प्रबंधाचे लेखक  प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी किनवट 

आपण जे विचार करतो, ते आपण होतो.

भगवद्गीता