एमपीएससीत महाराष्ट्रात २१ वा ;भूषण चत्तरचे सर्वत्र भूषण ;कृषी उपसंचालक पदी निवड
संगमनेर - प्रतिनिधी
तालुक्यातील खराडी येथील भूषण रामदास चत्तर या विद्यार्थ्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कृषी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातून २१ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाच्या जोरावर त्याची कृषी उपसंचालक वर्ग एक या पदावर नियुक्ती झाली असून, खराडी गावासह संपूर्ण तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भूषण चत्तर याने दहावीपर्यंतचे शिक्षण देवगाव येथे पूर्ण केले. त्यानंतर ओहरा कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण करत के.के. वाघ कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. कृषी पदवी प्राप्त केली. पुढे पुणे कृषी महाविद्यालयातून एम.एस्सी. कृषी ही पदव्युत्तर पदवी मिळविली. शिक्षणासोबतच त्याने अवांतर वाचनाची सवय जपली व स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. या काळात त्याला आई वडिलांचा मोलाचा पाठिंबा लाभला. पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी कृषी सेवा परीक्षेत यश मिळवत भूषणची कृषी उपसंचालक पदी निवड झाली.
वडील रामदास चत्तर शेती कसतात, आई गृहिणी आहे. या यशाबद्दल गावकऱ्यांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आमदार अमोल खताळ यांनीही दूरध्वनीद्वारे भूषणचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
