ब्रेकिंग न्यूज :
भारत

घातपात की अपघात? संगमनेर पेटले! ३६ तास उलटूनही न्याय अंधारात; पोलिसांच्या ढिसाळपणा विरोधात समाजाचा भडका सुरजचे शव ठेवून रास्ता रोकोचा निर्धार ; एकही बस बाहेर पडू दिली जाणार नाही

Blog Image
एकूण दृश्ये: 9

घातपात की अपघात? संगमनेर पेटले! ३६ तास उलटूनही न्याय अंधारात; पोलिसांच्या ढिसाळपणा विरोधात समाजाचा भडका सुरजचे शव ठेवून रास्ता रोकोचा निर्धार ; एकही बस बाहेर पडू दिली जाणार नाही

   संगमनेर ( सा.वा.)

संगमनेर खुर्द येथील सुरज सूर्यभान शिंदे (वय ३६) या युवकाचा संशयास्पद मृत्यू हा अपघात की निर्घृण घातपात हा प्रश्न ३६ तास उलटूनही अनुत्तरितच आहे. गुरुवारी (दि. १२) रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास स्कूटीची धडक लागून एक व्यक्ती जखमी झाल्यानंतर, सुरजला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप समाज बांधवांनी केला आहे. या मारहाणीतच सुरजचा मृत्यू झाल्याचा ठाम दावा करत न्यायासाठी वैदू समाजबांधव एकवटला आहे.

मात्र तब्बल दीड दिवस उलटूनही पोलिस प्रशासनाकडून अपघात की घातपात याबाबत स्पष्ट भूमिका नाही. या घटनेच्या प्रकरणाकडे गांभीर्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना तीव्र होत असून, हे प्रकरण प्रशासनाला हाताळताच येत नाही असा संताप समाज बांधवांनी व्यक्त केला आहे.

----- Advertisements -----

नाशिक येथून शवविच्छेदनानंतर शुक्रवारी सायंकाळी सुरजचा मृतदेह संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर आणण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने समाजबांधव रात्रभर तिथेच ठिय्या देत न्यायाच्या प्रतीक्षेत उभे राहिले. एकीकडे तपासासाठी तीन दिवसाची मुदत मागत, कायद्याच्या चौकटीतच तपास करून न्याय देऊ तसेच शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच रीतसर गुन्हा दाखल करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असलेले पोलीस निरीक्षक समीर बारवकर, तर दुसरीकडे समाज न्यायाच्या भूमिकेवर ठाम, हेच या घटनेचे विदारक वास्तव ठरले.

जोपर्यंत गुन्हा दाखल करून आरोपी अटक होत नाहीत, तोपर्यंत हा उद्रेक थांबणार नाही, असा थेट इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास पुणे नाशिक महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांसमोर सुरजचे शव ठेवून रास्ता रोको करण्याचा निर्धार समाजाने जाहीर केला आहे. एवढेच नव्हे तर बस स्थानकातून एकही बस बाहेर पडू दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. नाशिक, अकोले, श्रीरामपूर, पारनेर, कोपरगावसह १०० किलोमीटर परिसरातील गावांमधून हजारो कार्यकर्ते एकत्र जमणार असून, मुंबईहूनही कार्यकर्ते दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. पोलीस प्रशासनाची भूमिका स्पष्ट झाली नाही किंवा न्याय मिळाला नाही, तर संगमनेरमध्ये तात्काळ रास्ता रोको करू तसेच न्याय मिळेपर्यंत हटणार नाही असा एकसंध निर्धार व्यक्त करण्यात आला.

सुरजला न्याय मिळालाच पाहिजे! या ठाम भूमिकेमुळे एकूणच संपूर्ण संगमनेर मधील वातावरण पेटलेले दिसून येत आहे.

जीवनात यशस्वी होण्यासाठी धैर्य आवश्यक आहे.

सावरकर
Blog Author Image

Rajgriha Admin

Reporter - Admin