पत्रकारितेचा तेजस्वी दीप : मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा वैचारिक प्रवास
जयंतीनिमित्त विशेष लेख
जन्म : २० फेब्रुवारी १८१२, पोंभुर्ले. निधन : १७ मे १८४६, मुंबई
दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस ‘दर्पण दिन’ म्हणून ‘पत्रकार दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे, समाजप्रबोधनाच्या वैचारिक परंपरेचे खरे शिल्पकार असलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पुण्यतिथी अपेक्षित त्या व्यापकतेने साजरी होताना दिसत नाही. ज्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजमनाला विचारांची दिशा दिली, त्यांच्या कार्याचा सखोल परिचय आजही अनेकांना नसणे ही अंतर्मुख करणारी बाब आहे.

वैचारिक वारशाची उपेक्षा : चिंतनाची गरज
मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून जांभेकरांचा गौरव आपण शब्दांनी करतो; मात्र त्यांच्या वैचारिक वारशाच्या जतनाबाबतची उदासीनता प्रकर्षाने जाणवते. महाराष्ट्रातील मोजक्या काही पत्रकार संघटना वगळता बहुतांश पत्रकार संघटनांकडे त्यांच्या चरित्रात्मक साहित्याचा अभाव आहे. सार्वजनिक ग्रंथालये, महाविद्यालयीन व शालेय वाचनालयांमध्ये त्यांच्या जीवनकार्याचा समग्र परिचय करून देणारे साहित्य अत्यल्प प्रमाणात—किंबहुना अनेक ठिकाणी उपलब्धच नसल्याचे दिसते. ही केवळ दुर्लक्षाची बाब नसून पत्रकारितेच्या बौद्धिक परंपरेशी असलेल्या आपल्या नात्याची झालेली दुरावस्था दर्शविणारी चिंताजनक बाब आहे.
लोकशाहीच्या चारही स्तंभांना वैचारिक अधिष्ठान देणाऱ्या प्रभावी माध्यम म्हणून पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अशा परिस्थितीत जांभेकरांचे विचार, लेखनसंपदा व तत्त्वज्ञान यांचा सातत्यपूर्ण अभ्यास पत्रकार, विद्यार्थी व अभ्यासकांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक ठरते.
जांभेकर घराण्याची वंशपरंपरा
हरभट (चुलत पणजोबा), गोपाळभट (खापर पणजोबा), व्यंकटेश (पणजोबा), रामभट (आजोबा) आणि गंगाधर (वडील) अशा विद्वानांच्या पिढ्यांतून पुढे आली. गंगाधर जांभेकर व त्यांच्या पत्नी सगुणा यांना नारायण, लाडूबाई, चिमाबाई आणि बाळशास्त्री अशी अपत्ये होती; त्यामध्ये बाळशास्त्री हे धाकटे होते. तत्कालीन सामाजिक प्रथेनुसार लाडूबाई यांचा विवाह सावंतवाडी येथील रामचंद्र शास्त्री जानवेकर यांच्याशी, तर चिमाबाई यांचा विवाह मालवण येथील विष्णू भट योगी यांच्याशी झाला. दुर्दैवाने गंगाधर शास्त्री यांच्या हयातीतच पुत्र नारायण व दोन्ही कन्यांचे निधन झाले. इ.स. १८४० च्या सुमारास पोंभुर्ले येथे गंगाधर शास्त्री यांचे निधन झाले.
शिक्षण, संस्कार आणि कौटुंबिक जीवन
लहानपणापासूनच जांभेकरांवर संस्कृत अध्ययनाचे संस्कार झाले. वयाच्या आठव्या वर्षी मुंजबंधनानंतर वेदपठण, भगवद्गीता, अमरकोश, लघुकोश तसेच पंचमहाकाव्यांचा अभ्यास त्यांनी बाराव्या वर्षापर्यंत पूर्ण केला. त्यांच्या पहिल्या पत्नीपासून पंढरीनाथ नावाचा पुत्र झाला; परंतु अल्पवयातच त्याचे निधन झाले. द्वितीय पत्नी पंढरपूरच्या देवस्थळी घराण्यातील, कविवर्य मोरोपंत यांच्या नात्यातील होत्या. या पत्नीपासून १८४५ साली नारायण नावाचा पुत्र झाला; मात्र तोही अल्पायुषी ठरला.
पत्रकारितेची पायाभरणी : कार्य व कर्तृत्व
आधुनिक महाराष्ट्राच्या वैचारिक पायाभरणीत मोलाचा वाटा उचलणारे जांभेकर हे एलफिन्स्टन कॉलेज येथे गणिताचे प्राध्यापक होते. तसेच जगन्नाथ शंकरशेठ यांच्या सहवासात त्यांनी मुंबईत शिक्षणाचा प्रारंभ केला. दि. ६ जानेवारी १८३२ रोजी त्यांनी ‘मुंबई दर्पण’ हे मराठी–इंग्रजी भाषेत प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला. पुढे ४ सप्टेंबर १८३२ पासून हे वृत्तपत्र साप्ताहिक स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागले. मुंबईच्या कुलाबा परिसरातून प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरले. यानंतर १ मे १८४० रोजी त्यांनी ‘दिग्दर्शन’ हे मराठीतील पहिले मासिक सुरू करून समाजप्रबोधनाच्या कार्याला नवे वैचारिक अधिष्ठान दिले. काही अपरिहार्य कारणांमुळे ‘दर्पण’ २६ जून १८४० पासून बंद करावे लागले; मात्र ‘दिग्दर्शन’च्या माध्यमातून ज्ञानविस्ताराचे कार्य अखंड सुरू राहिले.
विद्वत्तेचा व्यापक आविष्कार
जांभेकरांना मराठीसह इंग्रजी, बंगाली, गुजराती, कन्नड, फारसी, हिंदी, उर्दू, फ्रेंच, संस्कृत, तेलगू अशा तब्बल १४ भाषा अवगत होत्या. त्यांनी एकूण १६ ग्रंथांची निर्मिती केली असून त्यामध्ये बालव्याकरण, नीतिकथा, सारसंग्रह, भूगोल विद्या, इंग्लंड देशाची बखर (भाग १ व २), भूगोलशास्त्र, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, शब्दसिद्धी निबंध, हिंदुस्थानचा इतिहास, हिंदुस्थानातील इंग्रजांच्या राज्याचा इतिहास, गणिती शास्त्राचा उपयोग विषयीचे संवाद, पुनर्विवाह प्रकरण, शून्यलब्धी गणित, मानसशक्ती विषयीचे शोध आदी ग्रंथांचा समावेश होतो. संतसाहित्य परंपरेला आधुनिक मुद्रणयुगाशी जोडत त्यांनी ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती प्रसिद्ध केली.
संघर्षमय उत्तरायुष्य
सामाजिक प्रबोधनासाठी धर्मांतर शुद्धीकरणासारख्या गुंतागुंतीच्या विषयांत हस्तक्षेप करताना त्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागला. परिणामी आयुष्याच्या अखेरीस आर्थिक हलाखीलाही सामोरे जावे लागले. मुंबईतील कोळभाट येथे बांधलेले घरही कर्जामुळे गमवावे लागले. कोकणातील कुणकेश्वर परिसरात ताम्रपट व शिलालेखांच्या संशोधनासाठी गेले असता त्यांना विषमज्वराने ग्रासले आणि १७ मे १८४६ रोजी त्यांचे निधन झाले. अवघ्या ३४ वर्षांच्या अल्पायुषी जीवनकाळात त्यांनी मराठी पत्रकारिता, शिक्षण आणि सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रात दिलेली दिशा आजही प्रेरणादायी ठरते.
प्रभावाचा व्यापक पट
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक म्हणून जांभेकरांचा प्रभाव इतका व्यापक होता की लोकमान्य टिळक यांच्या वडिलांनी आपल्या मुलाचे नाव ‘बाळ गंगाधर’ असे ठेवले. दादाभाई नौरोजी यांसारखे विद्वान त्यांच्या शिष्यपरंपरेत घडले.
संदर्भ ग्रंथ
बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर यांचे चरित्र – बा. ना. देव
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर : कर्तृत्वाचा एक शोध – रवींद्र बेडकिहाळ
आधुनिक मराठी गद्याचे जनक – डॉ. नलिनी मूळचकर मोकाटे
मराठी वृत्तपत्र व्यवसायाचा इतिहास व शास्त्र – माकरू शिंदे
मराठी माणसे मराठी म्हणे – प्र. के. अत्रे
दर्पण संग्रह – विनायक कृष्ण जोशी, श्री. म. सहस्रबुद्धे (संपा.)
जांभेकर कुलवृत्तांत – राजाराम रामकृष्ण जांभेकर
बाळशास्त्री – अमर शेंडे
महाराष्ट्राचे शिल्पकार : बाळशास्त्री जांभेकर – डॉ. शिवकुमार सोनाळकर
अशा या महान पत्रमहर्षींना जयंतीनिमित्त त्रिवार सविनय अभिवादन!
