छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आदर्श समाज निर्मितीसाठी ते पुढे नेण्याची गरज:- थोरात
जयंतीत राजकारण आणणे दुर्दैव - आमदार सत्यजीत तांबे
शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य कार्यक्रम
संगमनेर प्रतिनिधी
समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन आदर्श राज्य आणि समाज निर्माण करण्याचे छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व संत यांचे विचार घेऊन आपण पुढे जात असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर हायटेक बस स्थानक परिसरात स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराच्या देखाव्याचे उद्घाटन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समवेत डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कांचन थोरात,.दुर्गा तांबे, डॉ.जयश्री थोरात, डॉ.मैथिली तांबे, सोमेश्वर दिवटे, विश्वास मुर्तडक, गणेश मादास, निखिल पापडेजा, किशोर टोकसे, वैष्णव मुर्तडक, शरयू देशमुख, अमर कातारी, नितीन अभंग,सुनिल मादास, आदींसह संगमनेर शहरांमधील सर्व संघटना विविध राजकीय पक्ष, सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ढोल ताशांच्या गजरात लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे बस स्थानकावर आगमन झाले. पारंपारिक दांडपट्टा, तलवारबाजी यांसह साहसी खेळ झाल्यानंतर आई तुळजाभवानीची आरती करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरती नंतर मंदिर खुले करण्यात आले यावेळी प्रचंड आतिषबाजी करण्यात आली.
थोरात म्हणाले की, संगमनेर मध्ये शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सर्वांनी एकत्र येऊन महाराजांची जयंती साजरी करण्याची वर्षानुवर्ष परंपरा होती. सगळ्यांनी मतभेद विसरून महाराजांची एकत्र जयंती करावी ही आपली कायम पद्धत राहिली. परंतु यावेळेस वेगळे चित्र पहावयास मिळते आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजातील अठरापगड जातीतील सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य उभे केले. छत्रपती शिवाजी महाराज हे सदैव आपले आदर्श आहेत. महाराजांची युद्धनीती, जनकल्याणाची कामे, कायदा सुव्यवस्था, लोकशाही, आदर्श राज्य व्यवस्था याबाबत संपूर्ण जगाला ते आदर्शवत आहेत. आदर्श राज्य, स्वराज्य व आदर्श समाज निर्माण करण्याचा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, विविध संत, समाज सुधारक यांचा हा विचार घेऊन आपल्या सर्वांना पुढे जायचे असल्याचे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीत होणारे राजकारण दुर्दैवी ;सत्यजित तांबे
अशी टीका आमदार सत्यजित तांबे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.
शिवजयंतीच्या निमित्ताने मंदिर उभारण्यासाठी अनेक अडचणी निर्माण केल्या गेल्या. जागा मिळवण्यासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करावा लागला. ही जागा आपल्याला देऊ नये यासाठी प्रशासनावर मोठा दबाव टाकला गेला. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत आहे. त्यांनी जगाला दिशा दाखवली. त्यांच्या जयंती मधले कसले राजकारण करता असा सवाल विचारताना महाराजांच्या जयंती मध्ये कधीही राजकारण नको जात-पात धर्म नको. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीत होणारे राजकारण दुर्दैवी असल्याचे सत्यजित तांबे म्हणाले.
संगमनेर बसस्थानकासमोर अश्वारूढ पुतळा व्हावा याकरता 2017 मध्ये. दुर्गा तांबे नगराध्यक्ष असताना नगरपरिषदेने ठराव केला. 2024 मध्ये आपण ही जागा मंजूर करून घेतली निधीची मागणी केली.
बस स्थानकासमोर दर्शनी भागात लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभा करणार आहोत. याचबरोबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा, संविधान स्मारक शहीद स्मारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. महापुरुषांच्या स्मारकामध्ये श्रेयवाद नको. प्रत्येकाने त्यामध्ये योगदान द्यावे. प्रशासनावर प्रचंड दबाव असतानाही त्यांनी मंदिर उभारण्यासाठी परवानगी दिली याबद्दल आणि अत्यंत सुंदर देखावा केल्याबद्दल स्वाभिमानी शहर व तालुका शिवजयंती समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले .या कार्यक्रमाचे स्वागत डॉ.जयश्री थोरात यांनी केले.
यावेळी संगमनेर शिवजयंती उत्सव समिती त्यांचे सर्व पदाधिकारी, व्यापारी असोसिएशन, वकील संघ, डॉक्टर असोसिएशन,संगमनेर मधील सर्व सेवाभावी संघटना,सर्व गणेश मंडळे,युवक संघटना, महिला मंडळ, विविध राजकीय पक्ष या सर्वांचे पदाधिकारी व युवक कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.