तीन एकर डाळिंब बागेतून शेतकऱ्याने मिळवले 45 लाख रुपयांचे उत्पन्न; चिंचोली गुरव येथील शेतकऱ्याच्या कष्टाला मिळाले फळ ; गडद शेंद्री भगव्या लाल रंगाच्या आकर्षक डाळिंबाने चिंचोली गुरवसह व्यापाऱ्यालाही पडली भुरळ
संगमनेर : भारत रेघाटे
डाळिंब पीक कालबाह्य होत असतानाच आता नव्याने शेतकरीवर्ग डाळिंब शेती बागांकडे वळताना दिसून येत आहे. चिंचोली गुरव गावचे भूमिपुत्र प्रगतशील शेतकरी आणि कांदा व्यापारी तुकाराम सोनवणे यांनी सात एकर मध्ये जेवढे पीक घेतल्या जाते तेवढेच पीक त्यांनी तीन एकर मध्ये घेत 45 लाख रूपयाचे उत्पन्न घेतले आहे. एक आदर्शवत शेती कशी असावी यांचे एक उत्तम उदाहरण म्हणून सोनवणे यांच्याकडे बघितले जात असून इतर शेतकऱ्यांनाही दिशा देण्याचे काम त्यांनी केले आहे.

तालुक्यात पूर्वीच्या काळात डाळिंब बागांची संख्या ही अगणिक होती. मात्र तेल्या, मर रोग, तसेच जास्त जलसिंचन, नापीक जमीन, जमिनीत बुरशी होणे आदि विविध कारणाने वैतागून गेलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या बागा तोडून टाकल्या होत्या.

संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावचे उद्योजक तसेच आदर्श प्रगतशील शेतकरी 65 वर्षीय तुकाराम भागुजी सोनवणे यांनी तीन एकर क्षेत्रामध्ये शेंदरी भगवा जातीच्या 2,900 डाळिंबाची लागवड केली होती. ठिबक सिंचन, खतपाणी, संगोपन तसेच पाण्याचे व्यवस्थापन वेळोवेळी 'क्लोरोपायरीफॉस' किंवा शाश्वत कीटक नियंत्रण पद्धती अवलंबून औषध फवारणी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मेहनत व कौशल्याच्या जोरावर इस्राईल पद्धतीने चिंचोली गुरव मध्ये तीन एकरात डाळिंब बाग फुलवली आहे. साधारणपणे या डाळिंबाला मोठा बाजार भाव मिळत असून तीन एकरात डाळिंबाचे उत्पन्न 45 लाख रुपये होणार असल्याचे शेतकरी तुकाराम सोनवणे यांनी सांगितले. सोनवणे यांनी कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ही लक्षवेधी टपोरी डाळिंब बाग फुलवली आहे.

परिसरात निळवंड्याचे पाणी आल्याने शेती व्यवसाय करण्यास शेतकऱ्यांना आता सोपे झाले असून आता बहुतांशी भागात पाण्याची चिंताच मिटली आहे. येणाऱ्या काळात याच भागात वेगवेगळ्या प्रकारची प्रायोगिक शेती करणार असल्याचे ते म्हणाले. गावात चार-पाच शेतकरी हे फळबागा घेताना दिसून येतात आता डाळिंबा बरोबरच पेरूच्याही बागा तयार करण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले. सोनवणे यांच्या आदर्शवत शेती बद्दल विविध स्तरातून कौतूक होत आहे. सोनवणे म्हणाले की, अनिल गोडगे यांनी याबाबत प्रेरित केल्याचे सांगत गावचे आदर्श प्राचार्य अनिल गोडगे यांनीही शुभेच्छा दिल्या.

पूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर हे डाळिंब पिकासाठी एक राजधानी म्हणून ओळखल्या जाते. डाळिंब पीक साधारण अहिल्यानगर सोलापूर, बार्शी, करमाळा, सांगली या ठिकाणी घेतल्या जाते. वडगाव लांडगा जवळे कडलग, राजापूर, चिखली आदि भागात डाळिंब पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. परंतु तेच तेच पीक घेऊन तसेच जास्त जलसिंचन व जमीन नापीक तसेच जमिनीला बुरशी निर्माण झाल्याने डाळिंब उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. बहुगुणी तसेच झुडूपवर्गीय वनस्पती असून खाण्यासाठी तसेच औषध निर्मितीसाठी याचा वापर केला जातो. बागायत, मुरबाड, डोंगरावर डाळिंबाची लागवड करून पीक घेतल्या जाते.

एकदा डाळिंबाची लागवड झाल्या नंतर दहा वर्ष या झाडाची काळजी घेतल्यास कोणताही दूष्परिणाम काही होत नाही. खोडाला कीड लागू नये म्हणून चुना, क्लोरोफाईड, मोरचूद, गेरूची पेस्टिंग केल्या जाते. साधारण एप्रिलमध्ये आंबे बहार, जून पावसाळ्या मध्ये मृग बहार, सप्टेंबर मध्ये हस्त बहार असा हा डाळिंब पिकाचा बहार असून जानेवारी ते डिसेंबर या दरम्यान कधीही लागवड केल्या जाते. पूर्वी पाणी नव्हते त्यामुळे बाजरी , ज्वारी, खरीप, रब्बी ज्वारी असे पिकाचे उत्पादन घेतले जात होते.निळवंडे धरणामुळे आता परिसरात पाणी जिवंत झाल्याने फळबाग घेण्यास सुरुवात झालेली आहे. सहा महिन्यातच या पिकाचे उत्पादन विक्रीसाठी तयार होऊन शेतकरी लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत.

अशा आहेत डाळिंबाच्या जाती
जुणी गणेश जाती, मृदुला, सेंद्रिय भगवा, आरक्ता, शरद किंग अशा असून सोनवणे यांनी घेतलेल्या डाळिंब पीकांचे फळ हे दीडशे ते चारशे ग्रॅम वजनाचे एक फळ या बागेत तयार झालेले आहे. महाराष्ट्रासह बनारस, दिल्ली आदि भागात व्यापाऱ्याच्या माध्यमातून फळ विक्री केल्या जाते. चिंचोली गुरव मध्ये शेतकऱ्यांच्या सेंद्रिय भगवा तसेच गडद लाल रंगाच्या आकर्षक डाळिंबाने पंचक्रोशीसह या ठिकाणी व्यापाऱ्याला भुरळ घातल्याचे दिसून येत असून डाळिंब बाग बघण्यासाठी गर्दी होत आहे.
