ब्रेकिंग न्यूज :
भारत

गेली अनेक दशके राजुरकर सोसतायत पाण्याच्या झळा; भंडारदरा निळवंडे पाणलोटात असूनही राजूर तहानलेलेच; आज गाव बंद व ‘रास्ता रोको’चा इशारा; आठ आठ दिवस पाणी नाही; ग्रामस्थ संतप्त जलजीवन प्राधिकरणाला आली जाग

Blog Image
एकूण दृश्ये: 119

गेली अनेक दशके राजुरकर सोसतायत पाण्याच्या झळा; भंडारदरा निळवंडे पाणलोटात असूनही राजूर तहानलेलेच; आज गाव बंद व ‘रास्ता रोको’चा इशारा; आठ आठ दिवस पाणी नाही; ग्रामस्थ संतप्त जलजीवन प्राधिकरणाला आली जाग

     अकोले ( प्रतिनिधी )

भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असूनही अकोले तालुक्यातील राजूर गावाला पिण्याच्या पाण्यासाठी गेली अनेक दशके टंचाईचा सामना करावा लागत आहे. आठ आठ दिवस पाणीच येत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देत शुक्रवार दि. ६ मार्च रोजी राजूर गाव बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राजूर हे अकोले तालुक्यातील महत्त्वाचे आदिवासी केंद्र मानले जाते. सुमारे १३ ते १५ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात विविध शासकीय कार्यालये, न्यायालय, पोलीस ठाणे, शासकीय व खासगी महाविद्यालये तसेच सहकारी संस्था कार्यरत आहेत. मात्र इतक्या महत्त्वाच्या गावाला आजपर्यंत स्वतंत्र व शाश्वत पाणीपुरवठा योजना मिळालेली नाही. मागील अनेक महिन्यांपासून गावात आठ ते दहा दिवसांनीच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात पाणीटंचाईमुळे दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण होऊन कॉलऱ्यासारख्या साथरोगाचा उद्रेक झाला होता. त्यात दोन मुलींचा मृत्यू झाला, तर हजारो नागरिक बाधित झाले होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्याची मागणी ग्रामस्थांनी जोर धरली आहे. भंडारदरा धरण सुमारे २० किलोमीटर अंतरावर तर निळवंडे धरण अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर असतानाही राजूरकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार अकोले तसेच गटविकास अधिकारी अकोले यांना निवेदने देण्यात आली आहेत. या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व संतोष मुतडक, राजेंद्र वाघ, रोहिदास लहांगे, रोहिदास डगळे, अ‍ॅड. उल्हास शिंदे, किरण माळवे, गुलाब तांबोळी, सुनील सोनार आदी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तांत्रिक अडचणी लवकर दूर होणार : जलजीवन प्राधिकरण उपअभियंता :- मधुकर बिन्नर

जलजीवन योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून १९९८ साली राजूरसाठी पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली होती. मात्र २५ ते ३० वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर ही योजना आता कालबाह्य झाली आहे. त्या काळातील एम.एस. लोखंडी पाईपलाईन आजही वापरात असून ती मोठ्या प्रमाणात जीर्ण झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात वारंवार अडथळे निर्माण होत असल्याची माहिती जलजीवन प्राधिकरणाचे उपअभियंता मधुकर बिन्नर यांनी दिली. राजूरमध्ये जलशुद्धी केंद्राजवळ दोन लाख ४० हजार लिटर क्षमतेची टाकी तसेच खंडोबा वस्ती येथे सुमारे ९० हजार लिटर क्षमतेची दुसरी टाकी उभारण्यात आली आहे. सर्वोदय परिसरात आणखी एक पाण्याची टाकी उभारण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी जागेचा प्रश्न प्रलंबित आहे. ग्राम पंचायतीकडून जागा उपलब्ध झाल्यास पाणी साठवण क्षमता वाढवून पुरवठा अधिक सक्षम करता येईल, असे त्यांनी सांगितले. सध्या राजूर गावाची लोकसंख्या सुमारे १३ ते १५ हजार असून भविष्यातील गरज लक्षात घेऊन २०५२ पर्यंत सुमारे १९ हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करता येईल, असा सुधारित आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. राजूर परिसर चढ उताराचा असल्याने पाणीपुरवठा करताना ग्रेडियंटचा विचार करावा लागतो. तसेच या भागात वीज वितरण कंपनीकडून कमी-जास्त होणाऱ्या होल्टेजमुळे पंप ट्रिप होण्याऐवजी मोटारी जळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा वारंवार खंडित होतो.

ही समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सुमारे १५ लाख रुपये खर्चून स्टेबिलायझर बसवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मार्च अखेरीस हे काम पूर्ण झाल्यानंतर होल्टेजमुळे होणारे नुकसान थांबेल आणि पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय राजूरच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवीन सुधारित पाईपलाईनसाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर नवीन पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा अधिक सक्षम केला जाईल. सध्या हायड्रॉलिक टेस्टिंगची प्रक्रिया सुरू असून ग्रामपंचायती मार्फत कनेक्शन पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा नियमित होईल. येत्या काही दिवसांत राजूरच्या पाणी प्रश्नावर तोडगा निघेल, असा विश्वास उपअभियंता मधुकर बिन्नर यांनी व्यक्त केला.

----- Advertisements -----

जीवन हे एक प्रवास आहे, गंतव्य नव्हे.

महात्मा गांधी