शिवकालीन विचारधारा मराठी भाषेच्या अस्मितेचा दीपस्तंभ ; शिवबांनी स्वराज्य स्वभाषा, स्वसंस्कृतीला सर्वोच्च स्थान दिले
ह्या तर मराठी पाट्या नव्हेच !
इंग्रजी उच्चाराची देवनागरी कशासाठी ?
-:संपादकीय :-
मागील आठवड्यात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. आणि आम्ही आणि इंग्रजाळलेले इंग्लिश भाषेचे धेडगुजरी उच्चार पावलोपावली क्षणोक्षणी उच्चारत मराठी दिन साजरा केला. हीच तिची शुद्धता असेल तर मराठी भाषेसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे.

शिवकालीन मराठी मूल्ये जपली पाहिजेत; मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे. महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे हे केवळ शब्द नाहीत, तर त्या शिवकालीन विचारधारेचा आणि मराठी अस्मितेचा दीपस्तंभ आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना स्वभाषा, स्वसंस्कृती आणि स्वाभिमान यांना सर्वोच्च स्थान दिले.
मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या इतिहासाची, परंपरेची आणि ओळखीचा पवित्र वारसा आहे. छत्रपती शिवरायांना आपल्या मातृभाषेचा प्रचंड अभिमान होता. त्यांच्या कारभारात मराठीला प्रतिष्ठा मिळाली आणि प्रशासना पासून लोकजीवनापर्यंत मराठीचा सन्मानाने वापर झाला. त्यामुळे आजही आपण मराठी भाषेचे शुद्धत्व जपणे ही आपली जबाबदारी आहे.
आजच्या काळात देवनागरी लिपीत इंग्रजी शब्दांची धेडगुजरी मिसळून मराठीचे स्वरूप बिघडवले जात आहे. हा माझा स्पष्ट आरोप आहे. अशी दूषित होत चाललेली भाषा आपण का वापरावी ! हा साधा प्रश्न प्रत्येक मराठी भाषिकाने स्वतःला विचारण्याची गरज बनली आहे मराठी भाषा समृद्ध, सशक्त आणि अभिमानास्पद आहे; त्यामुळे तिच्या शुद्धतेचे जतन करणे हे आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासारखेच आहे.
आपल्या पूर्वजांनी जपलेली ही अमूल्य परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. शिवकालीन मूल्यांचा आदर ठेवत मराठी भाषा, संस्कृती आणि स्वाभिमान यांचे जतन केले तरच महाराष्ट्राची खरी ओळख आणि गौरव टिकून राहील.
पाट्यांवरील इंग्रजीचा वाढता प्रभाव आणि मराठीचे अस्तित्व
आज गाव असो, तालुका असो किंवा मोठे शहर रस्त्यांवरून फिरताना नजरेस पडणाऱ्या दुकानांच्या पाट्या पाहिल्या की एक वेगळे चित्र दिसते. मल्टीप्लेक्स, मल्टीस्टेट, रेस्टॉरंट, क्लासेस, ब्युटीक, टी सेंटर, कॉम्प्लेक्स, फॅमिली रेस्टॉरंट (व्हेज-नॉनव्हेज), मेन्स पार्लर, बँगल्स, फॅब्रिकेशन , क्रेन सर्विस, हार्डवेअर, कलर वर्ल्ड, अॅग्रो टूर्स अँड ट्रॅव्हल्स क्रिटीकल केअर पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, क्लिनिक, फुटवेअर, लेडीज वेअर, जेन्ट्स वेअर
अशा असंख्य पाट्या दिसतात. या पाट्या बहुतांश वेळा देवनागरी लिपीत लिहिलेल्या असतात; पण शब्द उच्चार इंग्रजीचे असतात. त्यामुळे वरकरणी त्या मराठी पाट्या वाटतात, परंतु प्रत्यक्षात त्या इंग्रजी शब्दांचे देवनागरी रूप असते. इथेच भाषा आणि लिपी यातील मूलभूत फरक लक्षात येतो.
अनेक भाषेत देवनागरी लिपीचा वापर
देवनागरी ही केवळ लिपी आहे; मराठी ही भाषा आहे. देवनागरीत अनेक भाषा लिहिल्या जातात मराठी, हिंदी, संस्कृत, नेपाळी, मैथिली, पाली आदि. त्यामुळे एखादी पाटी देवनागरीत आहे म्हणून ती मराठीच आहे असे मानणे योग्य ठरत नाही. जर आशय, शब्दसंपदा आणि व्यवहार इंग्रजीचा असेल, तर मराठीचा वापर खऱ्या अर्थाने वाढत नाही. आज अनेक नागरी सहकारी पतसंस्थांच्या पाट्यांवर कार्पोरेट ऑफिस, न्यू ब्रांच, या रोडवर अशा शब्दांचा वापर दिसतो. अशा पाट्या पाहताना एक प्रश्न मनात उभा राहतो की, आपल्या समृद्ध मराठी शब्दसंपदेचा वापर आपण का टाळतो ? मराठीमध्ये यासाठी सुंदर पर्यायी शब्द उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ केश कर्तनालय ऐवजी हेअर सलून, सौंदर्य प्रसाधन केंद्र ऐवजी ब्युटी पार्लर औषधालय ऐवजी मेडिकल स्टोअर दुरुस्ती केंद्र ऐवजी वर्कशॉप किराणा व भुसार मालाचे दुकान मॉल अथवा मर्चंट, जनरल स्टोअर्स तथापि काही ठिकाणी अजूनही मराठीचे अस्तित्व अभिमानाने टिकून आहे. अंबिका दुग्धालय, किराणा भुसार मालाचे घाऊक व्यापारी, फूल भांडार , कानिफनाथ रसवंतीगृह अशा पाट्या पाहिल्या की मराठीची गोडी आणि आपलेपणा जाणवतो. मंदिर परिसरात, यात्रास्थळांवर किंवा पारंपरिक व्यवसायांत अजूनही मराठीचा सहज सुलभ वापर दिसतो. एखादा साधा चहावाला देखील चहा घ्या, आस्वाद घ्या असे लिहून मराठी भाषेविषयीचे प्रेम व्यक्त करताना दिसतो.
आजच्या काळात मात्र समाजजीवनात मोठा बदल झाला आहे. मोबाईल, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा वापर झपाट्याने वाढला आहे. परिणामी वाचन संस्कृती काही प्रमाणात कमी होत असल्याची खंत व्यक्त केली जाते. प्रत्यक्षात वाचन हेच भाषेला विस्तार देणारे साधन आहे. वाचनामुळे शब्दसंपदा वाढते, विचारांची कक्षा रुंदावते आणि भाषेचे सौंदर्य अधिक जाणवते. मग देवनागरी पाट्य वरील इंग्रजी उच्चार कशासाठी ? भाषेचे जतन केवळ घोषणांनी होत नाही ते व्यवहारातून होते.
आपल्या बोलीभाषा, लिपी आणि उच्चार यांची सांगड घालून मराठीचा वापर केला, तरच ती पुढील पिढ्यांपर्यंत जिवंत राहील. मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही ती आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि अस्मितेची ओळख आहे.
जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजीचे महत्त्व नाकारता येणार नाही. व्यापार, तंत्रज्ञान आणि शिक्षणात तिचा उपयोग होणारच. परंतु त्याचवेळी स्थानिक भाषेचा सन्मान राखणे हेही तितकेच आवश्यक आहे. योग्य मार्ग म्हणजे पाट्यांवर प्रथम मराठी भाषेतीलच शब्द असावेत आणि आवश्यक असल्यास त्याखाली इंग्रजी अनुवाद द्यावा. भाषिक स्वाभिमान हा केवळ भावनिक मुद्दा नाही. तो सांस्कृतिक जबाबदारी आहे. आपल्या घरापासून, दुकानापासून, संस्थांपासून मराठीचा वापर वाढवला, तरच शहरांची ओळख देवनागरीतील इंग्रजी अशी न राहता समृद्ध मराठी अशी बनेल.
मराठीचा सन्मान अक्षरांमध्ये नव्हे, तर शब्दांमध्ये आहे.या शब्दांमधूनच संस्कृती जिवंत राहते. केवळ देवनागरी लिपीतील पाट्या लावल्या म्हणून त्या आपोआप मराठी ठरत नाहीत. जर शब्दसंपदा, आशय आणि व्यवहार इंग्रजीचाच असेल, तर तो भाषिक स्वाभिमानाचा प्रश्न सुटत नाही ही आपली भूमिका स्पष्ट आहे.
लिपी आणि भाषा यातील मूलभूत फरक देवनागरी ही लिपी आहे; मराठी ही भाषा आहे.
देवनागरीत हिंदी, संस्कृत, मैथिली, नेपाळी, पाली अशा अनेक भाषा लिहिल्या जातात. त्यामुळे पाटी देवनागरीत आहे म्हणून ती मराठीच आहे, असे समजणे अर्धसत्य ठरते. महाराष्ट्रातील वास्तव आज महाराष्ट्रातील बहुतांश गावांत व शहरांत दुकानांच्या पाट्यांवर इंग्रजीचा मोठ्या प्रमाणात वापर दिसतो
General Stores,Hair Salon,Mobile, Online, Booking, Bank,Happy journey, Beauty Parlour, Ice Cream, Parlour,Speed Mart, Hospital, Workshop, Garage, Petrol Pump, Bus Stand,Medical Store
हे सर्व शब्द देवनागरीत लिहिले तरी त्यांचा उच्चार इंग्रजीचाच राहतो. परिणामी, मराठी शब्दसंपदेचा वापर कमी होतो. हीच खंत अनेकांना वाटते.
भाषिक स्वाभिमान की बौद्धिक दिशाभूल ?
जर मराठी पाट्या या नावाखाली फक्त देवनागरीतील इंग्रजी शब्दांचा आग्रह धरला गेला, तर तो भाषेच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारा ठरू शकतो. भाषेचे जतन हे शब्दांच्या वापरातून होते,
मराठी भाषा कमी प्रभावशाली नाही. मराठी ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये पहिल्या दहा बारा भाषांमध्ये गणली जाते. सुमारे ८ ते ९ कोटी लोक मराठी बोलतात. कोणतीही भाषा प्रभावशाली आहे की नाही हे फक्त क्रमांकावर ठरत नाही, तर त्या भाषेचा इतिहास, साहित्य, संस्कृती, शिक्षण, प्रशासन आणि जागतिक पातळीवरील वापर यावर ठरते. मराठीला समृद्ध संत साहित्य, शिवकालीन इतिहास, आधुनिक साहित्य, ग्रामीण साहित्य दलित साहित्य, नाटक, चित्रपट आणि पत्रकारिता यांची भक्कम परंपरा आहे. महाराष्ट्र राज्यात ती प्रशासन व शिक्षणाची प्रमुख भाषा आहे. त्यामुळे मराठीचा प्रभाव प्रादेशिक पातळीवर अत्यंत मजबूत आहे. जागतिक स्तरावर इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, चिनी अशा भाषा अधिक देशांमध्ये अधिकृत किंवा संपर्कभाषा म्हणून वापरल्या जातात, त्यामुळे त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रभाव जास्त दिसतो. पण याचा अर्थ मराठी कमी प्रभावशाली आहे असा होत नाही ती आपल्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात अत्यंत प्रभावी आहे.
मराठी भाषा किती खंडांमध्ये बोलली जाते ? याचा अर्थ त्या खंडातील मोठ्या लोकसंख्येने ती भाषा वापरणे असा घेतला तर मराठी मुख्यतः आशिया खंडात, विशेषतः भारतातील महाराष्ट्र आणि सीमावर्ती भागात बहुसंख्य लोक बोलतात. तथापि, स्थलांतरामुळे मराठीभाषिक लोक उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया अशा इतर खंडांमध्येही आहेत. पण त्या ठिकाणी ती स्थानिक बहुसंख्य भाषा नाही. ती प्रामुख्याने भारतीय वंशाच्या समुदायांमध्ये वापरली जाते. एखाद्या भाषेची ताकद फक्त ती किती खंडांमध्ये बोलली जाते यावर नाही, तर तिच्या सांस्कृतिक व बौद्धिक योगदानावरही अवलंबून असते.
