तुमच्या बेगडी हिंदुत्वावर जनता विश्वास ठेवणार नाही : आमदार खताळ
आमदार तांबेंच्या वक्तव्याचाही घेतला समाचार
{ रविवारच्या सभेत देणार प्रतिउत्तर }
संगमनेर प्रतिनिधी
तालुक्यातील जनतेने पराभव करुन तुमचा खुळखुळा केला आहे. इथल्या जनतेला तुमच्या विषयी कोणतीही सहानुभूती आता राहिलेली नाही. तालुक्यातील विकासाची घडी आता चांगल्या पद्धतीने बसत असल्याने तुम्हाला हे सहन होत नसल्यामुळेच तुम्हाला मोर्चे काढण्याची वेळ आली आहे. तुमच्या बेगडी प्रेमावर हिंदुत्वावर जनता विश्वास ठेवणार नाही. मला सल्ले देण्यापेक्षा भविष्यात राहुल गांधीच तुम्हाला समज देवून घरात बसवतील अशी खरमरीत टीका आमदार अमोल खताळ यांनी केली.

माध्यमांशी बोलताना आ. खताळ म्हणाले की, माजी आमदारांनी काढलेल्या मोर्चाबद्दल मला कोणतेही भाष्य करायचे नाही. त्यांनी खतपाणी घातल्यामुळेच घुलेवाडीतील घटनेला राजकीय पार्श्वभूमी मिळाली. कटकारस्थान करुन कीर्तनामध्ये त्यांच्या स्विय सहायकानेच गोंधळ घातल्याचा आरोप करुन आज भगवे झेंडे घेवून तुम्ही सहानुभूती मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरला असला तरी सोयीनुसार हिंदुत्ववाद स्वीकारण्याचा तुमचा प्रयत्न जनतेने केव्हाच ओळखला आहे. यापूर्वी तालुक्यात हिंदुत्ववादी कार्यकर्ते, युवक-युवती यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकार घडले त्यावेळी तुमची सद्भवना कुठे गेली होती. सकल हिंदू समाजाचा मोर्चाला विरोध करणारे पत्रक अजुनही जनता विसरलेली नाही. त्यामुळेच अडचणीत आलात.
हिंदुत्ववादी असल्याचे दाखवायचे हे संगमनेरी जनता कधीही मान्य करणार नाही. तालुक्यात कोणतीही गुंडगिरी चालू नाही. विधानसभा निवडणूकीनंतर विकास कामांची घडी चांगल्या पद्धतीने बसत आहे. आपली राजकीय घडी विस्कटल्याने आपण अस्वस्थ झाले आहात. येथील बाजारपेठ व व्यापार आता मोकळा श्वास घेवून चांगल्या पद्धतीने सुरु आहे. यापूर्वी व्यापाऱ्यांना बॅकमेल करणारे कोणाचे कार्यकर्ते होते ? त्यांना पाठीशी कोणी घातले ? असा सवाल करुन आमदार खताळ म्हणाले की, डीएनएच्या बाबतीत माजी आमदारांनी केलेले आरोप हे निरर्थक आहेत. माझा डीएनए वारकरी सांप्रदायातला आहे. गेली २३ वर्षे माझी आई वारीला जाते. परंतू माजी आमदार या विषयाचा गैर अर्थ काढून सहानूभुती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वी त्यांनी मला खबऱ्या म्हणून हिणवले, हत्यार म्हणून हिणवत आहेत आता कुणाचेतरी खेळणं झाल्याचे ते म्हणतात परंतु जनतेनं तुमचा खुळखुळा केला आता तो वाजवत बसा अशी खरमरीत टीका थोरातांचे नाव न घेता खताळ यांनी केली.
भंडारे महाराजांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन नाही. परंतु अध्यात्मिक क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीला अतिशय त्रागाने अशा प्रकारचे वक्तव्य करावे लागते हे दुर्देव आहे. आज त्यांच्या सभेमध्ये दाखविण्यात आलेले व्हीडीओ खोडसाळपणे दाखविण्यात आलेले आहेत. टोलनाक्याचे मालक चालक कोण आहेत ? हे जनतेला चांगलेच माहिती आहे.
रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेतून त्यांना चांगली समज मिळेल असे आमदार खताळ यांनी ठणकावून सांगितले. मागील आठ महिन्यांत संगमनेर तालुक्याच्या विकासाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. विधानसभेतही सामान्य माणसांच्या प्रश्नांचा आवाज मी उठवत असल्याने याचीच कुठेतरी असूया माजी आमदार आणि त्यांच्या बगलबच्चांना होत असल्यामुळेच व्यक्तिगत पातळीवर माझ्यावर टीका करण्यापलिकडे त्यांच्याकडे कोणतेही भांडवल राहिलेले नाही. सामान्य माणसाच्या सुख-दु:खात मी सहभागी होत आहे. ग्रामीण भागातील समस्याही वेळेत सुटत असल्याने त्यांची चाळीस वर्षांची अपयशी कारकीर्द उघड झाल्याचे शल्य त्यांना आहे. हा तालुका आता अधिक शांत झाला असून, विकास प्रक्रीयेत तो आता थांबणार नाही असे आ.खताळ यांनी ठामपणे सांगितले. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत महायुतीचा भगवा फडकणार आहे. या निवडणूकीत आत्ताच त्यांना पराभव समोर दिसत असल्यामुळेच अस्वस्थ झालेले माजी आमदार व त्यांचे कार्यकर्ते हा तालुका अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे घुलेवाडीच्या घटनेवरुन उघड झाले. परंतू जनता त्यांना कोणताही थारा देणार नाही. आ.सत्यजीत तांबे यांनी केलेल्या राजकीय वक्तव्याची खिल्ली उडवून ते सत्तेच्या जवळ असल्याचे सांगत असले, तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत त्यांनी महायुतीच्या विरोधात प्रचार का केला ? असा प्रश्न आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित केला आहे.
