टोलवसुली थांबवा - सत्यजीत तांबे ; मंत्री गडकरींना दिले पत्र ; कामाची गती रोडावली ; वाहतूक कोंडीने प्रवासी त्रस्त
संगमनेर : ( प्रतिनिधी )
नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या कॉंक्रिटिकरण आणि पुलांच्या कामांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन पाठवत नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांची कामे होईपर्यंत टोलवसुली थांबवण्याची मागणी केली आहे.

पूर्वी संगमनेर ते नाशिक हा प्रवास केवळ एका तासात पूर्ण होत होता. मात्र, सध्या त्याच अंतरासाठी दोन तीन तासांपेक्षा अधिक वेळ लागत असून कैक घंटे आता लगत आहेत. त्यातच महामार्गावरील मोठमोठे खड्डे, खराब नियोजन आणि अपुरे वाहतूक व्यवस्थापनामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावरील कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
विशेषतः घुलेवाडी नांदूरशिंगोटे येथील पुलांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय बनली असूनही शिंदे पळसे (, हिवरेगाव पावसा, चाळकवाडी, आळेफाटा, जुन्नर) येथील टोल नाक्यांवर नियमित टोल वसुली सुरू आहे. हे नागरिकांवर अन्यायकारक असल्याचे आमदार तांबे यांनी म्हटले आहे. यावर गांभीर्याने विचार करून कामांचा वेग वाढवून कामे पूर्ण होईपर्यंत टोलवसुली थांबवावी अशा महत्त्वपूर्ण मागण्याकडे आमदार सत्यजीत तांबे यांनी लक्ष वेधत पत्राद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली असून केंद्र सरकारने तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करावी अशी मागणी तांबे यांनी केली आहे.
