तालुका हादरला आजी- नातवाचा होरपळून मृत्यू; खळीगावात घडली दुर्दैवी घटना;
संगमनेर : भारत रेघाटे
अंघोळीसाठी गरम पाणी अंगावर सांडल्याने या दुर्दैवी घटनेत आजी आणि नातू हे दोघेही गंभीररित्या भाजले होते. त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले डॉक्टरच्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही दोघांनाही प्राण गमवावे लागल्याने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

संगमनेर तालुक्यातील खळी कांगण वाडी येथे घटलेल्या दुर्देवी घटनेत आजी आणि नातवाचा होरपळून मृत्यू झाला असून सिंधुबाई नामदेव सोसे ५२ त्यांचा नातू राहुल प्रकाश सोसे ५ यांच्या सोबत ही दुर्दैवी घटना घडली.
८ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास अंघोळीसाठी घेतलेले गरम पाणी या दोघांच्या अंगावर सांडले. यामध्ये दोघेही ६० टक्के भाजले गेले एवढेच नव्हे तर पाठी मागील बाजू आणि पाय जास्त प्रमाणात भाजल्या गेले. त्यांना तात्काळ लोणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
काही दिवस उपचार घेतले परंतु १५ सप्टेंबर रोजी आजी सिंधुबाई सोसे यांचा मृत्यू झाला, तर मंगळवार २३ सप्टेंबर ला नातू राहुल प्रकाश सोसे याचीही प्राणज्योत मालवली. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने सोसे कुटुंबावर आणि खळी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सिंधुबाई सोसे यांच्या पश्चात पती नामदेव , प्रकाश योगेश दोन मुले, दोन सुना, दोन मुली, जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने पंचकोशी सह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
