ब्रेकिंग न्यूज :
भारत

शांतीपर्वासाठी रथी महारथींची गणपतीला आरती ; संगमनेर मध्ये दोन हात एकत्र, अन् चर्चा पसरली सर्वत्र ;

Blog Image
एकूण दृश्ये: 221

शांतीपर्वासाठी रथी महारथींची गणपतीला आरती ; संगमनेर मध्ये दोन हात एकत्र, अन् चर्चा पसरली सर्वत्र ;     

      आमने सामने,   

जल्लोष एकतेचा, एकात्मतेचा, आणि अखंडतेचा ;आरती समन्वयाची, भविष्याच्या अन्वयार्थाची !

    संगमनेर : भारत रेघाटे

गेली तीन चार दिवसापासून सोशल मीडियावर आजी माजी आमदारांनी हातातवर हात ठेवत केलेल्या आरतीचा विषय चांगला रंग धरल्याने एका वेगळ्याच चर्चैला राजकीय रंगरूप दिले जात आहे. रथी महारथी या दोन्ही आमदारांनी श्री गणेशाच्या आरतीने राजकारणाला आणि समाजकारणाला एक नवीन दिशा आणि आयाम देण्याचे धारिष्टच या प्रसंगातून केल्याचे दिसून आले. परंतु याच बरोबर आमदार व्दयींनी सिंहावलोकन आणि आत्मपरीक्षण का करू नये ? कारण या घटने मागील अर्थाचा सखोल प्रवाह समजून घेण्याची ती एक प्रक्रिया होय. समाजाचे आणि त्या त्या भागाचे प्रतिनिधित्व करत असताना तद्वतच राज्यकर्त्यांना समाजात वावरताना ऐनकेनप्रकारे अनेक वेळा सुख, दुःख, धार्मिक अथवा सामुदायिक प्रसंगी एका मंचावर अथवा प्रसंगांनुरूप एका ठिकाणी यावेच लागते. तो प्रसंग समन्वयाचा असतो. समाजहिताचा असतो. परंतु दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या मनाला ही सल काही केल्या स्वस्थ बसू देत नाही, आणि सातत्याने कार्यकर्त्यांना ती टोचत राहते, सलत राहते. हाच धागा पकडून दोन्हीकडचे कार्यकर्ते आपापसात कुजबुज करीत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करताना दिसून येतात. किंबहुना त्याचे वागणेही दूरगामी परिणामकारक ठरतात. हे वागणेच दोन्ही पार्ट्यांना सकारात्मक अथवा नकारात्मक परिस्थितीशी सामना करण्याची वेळ आणते. असाही एक सूर चर्चीला जात आहे की, ह्या ग्यानबाच्या मेखेचे गुपीत कोण उलगडणार ? 

संगमनेर मधून चार दिवस पूर्वी एक आनंदाची बातमी समोर आली ती म्हणजे दोन्ही आमदार एकत्र आल्याने शहर आणि तालुक्यात राजकीय चर्चेला उधान आले. परंतु राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आणि मैत्रीच्या ठिकाणी मैत्री. साथी हात बढाना असे म्हणत ही करामत उद्याची चि़ता दूर करुन विघ्नही दूर करेल. ? खरंतर गणपती हा पूर्वी विघ्नहर्ता ऐवजी विघ्नकर्ता होता. कालच्या एकत्रित भेटीने काही लोकांना, कार्यकर्त्यांना मात्र या ठिकाणी राजकारण दिसून आले. धर्मकारण, समाजकारण आणि राजकारण हे व्यक्ती परत्वे बदलत जाणारे असले तरी त्या त्या ठिकाणी या गोष्टीचा अवलंब करणे हे समाज विधायक ठरू शकते !  समाजात अनेक ठिकाणी  राजकारण विरहीत कार्यक्रम होतात. तसेच हा सुध्दा एक राजकारण विरहीत कार्यक्रम नव्हता का ? कोणाच्या पोटात पोटशूळ उठत असेल तर हा कार्यक्रम निश्चितच राजकारणाचा समजावा. राजकारणाचा समन्वय आणि समन्वयाचे राजकरण. एका म्यानात दोन तलवारी राहूच शकत नाही. हे हिटलर मुसोलिनी च्या हुकुमशाही साठी होते. श्रीगणेशाच्या आरतीसाठी जेव्हा आपल्या भगाचे प्रतिनिधीत्त्व करणारे दोन हात एकत्र येतात, पुढे येतात ते धर्मरक्षणासाठीच, येथील विकासासाठी. या घटनेने काहीच्या मनात क्लेश निर्माण झाला, गढूळपणा साठला. तो दूर करण्यासाठीची ही वैचारिक संकल्पना नव्हे का ? पक्षाचे नि तत्त्ववादी माणसाचे विचार तत्वनिष्ठ असतात, असावेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण न बघता दोन्ही आमदार महोदयाच्या चेह-यावरील उमटलेले स्मित या समाज मनाने निरखून टिपले आणि बघितलेही. परंतु हे नीट आणि डोळस पारखून घेण्याची जबाबदारी येथील प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. ना की कोणास खेचण्याची ! गेली काही दिवस शहरात राजकीय घडामोडीतून काहूर माजतेय अशी प्रतिक्रिया जनमानसात दिसून येत आहे. शहरातील वाद हे विकासात बाधा ठरत असतात. विद्यमान दोन्ही आमदारांचे व्यक्तिमत्व निर्विवाद वादातीत आहे. हा समाजमनाचा आरसा फारच बोलका आहे.

संगमनेर मधील शांतीपर्वासाठी दोन रथी महारथीं आमदाराची गणपतीला आरती ; दोघांचे हात एकत्र, अन् चर्चा पसरली सर्वत्र ; जल्लोष एकतेचा, एकात्मतेचा, अखंडतेचा कदाचित विघ्नहर्त्याची आरतीच उद्याचे शांतिपर्व ठरेल. 

     असे म्हटले जाते. "कारण नसते ते राजकारण" ! असे वाटत असले तरी राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं. धर्मकारण, अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण हे सुध्दा चार स्तंभच होत. तालुक्याचे रथी महारथी जेव्हा एकत्र येत गणरायाची आरती करतात. यात कसले आले राजकारण ? ही तर धर्म जागृतीची नांदी नव्हे का ? समाजाला एकत्रित करण्यासाठी, दिशा देण्यासाठीच भाऊ जावळे ( रंगारी ) लोकमान्य टिळक, महात्मा जोतिबा फुले यांनी सुरू केलेला गणपती- शिवजयंती उत्सव हा समाज विधायक विचारासाठीच होता. निर्माण केल्या गेलेल्या ह्या समाज विघातक कृती होत. हा युनिव्हर्सल धागा पकडूनच संगमनेर बाजारपेठ येथील मित्र मंडळांनी दोन आमदाराच्या भेट घालून वैश्विक संकल्पना राबवली आणि ती प्रत्येकाच्या मनात रुजवली, हे शांततेचे द्योतक नव्हे का ?

----- Advertisements -----

     मंडळाचे योगेश जाजू, जितू गांधी, समीर ओहरा, संदीप बुर्रम, सोमनाथ मुर्तडक, भूपेश भळगट, किशोर पापडेजा, विलास दिवटे, विक्रम गाडे, मुकुंद चांडक, मनीष माळवे आदि युवकांची करावी तेवढी प्रशंसा कमीच. यामध्ये निखिल पापडेजा यांचेही योगदान मोलाचे आहे. 'निखिल' या शब्दाचा अर्थ अखिल, अर्थात अखंड. सर्वांना एकत्र घेऊन जाण्यासाठी जो प्रयत्न करतो तो निखिल. परंतु कुरघोडी शिवाय राजकारण होत नाही हे सर्वांना माहीत आहे, आणि ते का नसावं ! त्याशिवाय आपले अस्तित्व, आपली ओळख, आणि इतरांचे महत्व, हे कसे अबाधित राहणार ? हे कोणीही, कदापिही विसरू नये. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं. समाजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण या व्यवस्थेवरच राजकारण आणि राजकारणी चालत असतात. या सर्व गोष्टींची यथासांग मांडणी प्रसार माध्यमातून एक चांगला संदेश देण्यासाठी निश्चित प्रयत्न केला गेला पाहिजे. 

    गेली काही दिवसांपासून संगमनेरची हवा बदलत आहे ? वेगळे वारे वाहत आहे अशी चर्चा जोर धरत असताना अचानक कुठेतरी आकस्मिकपणे बॉम्ब फुटल्यागत बोंब ठोकली जाते, एकूणच शहराचे वातावरण गढूळ होवून जाते. सर्वच प्रसंग ,हेतू वाईट अथवा राजकारणी नसतात.

       मित्रांनो! राजकारण , राजकारण आहे ! समाजकारण आणि धर्मकारण यापेक्षाही राजकराण हे वेगळेच असते. त्याच सभोवती हे सर्व चक्र फिरताना दिसू येतात. यामध्येच शहर आणि तालुक्यातील बाजारपेठेचे अर्थकारण तितकेच महत्वाचे आहे. कदाचित ही आरती उद्याच्या विकासपर्वाची नांदी ठरेल ! असेच विचार हवेत. त्या बदलास आणि गरजेचे आहे त्या बदलाची. एक हाथ, एक साथ यातच तर खरे "अनमोल" असे एक "सत्य" दडले आहे.

     

----- Advertisements -----

      आपण पाहतो की, आज सर्वच ठिकाणी केवळ "राजकराण" या विषयाचाच बाजार भरला आहे. संगमनेरची बाजारपेठ या राजकीय घडामोडीमुळे पुरती हादरून गेली. तर दुसरीकडे याच बाजारपेठेतील मित्रमंडळाने एक नवा चमत्कार घडवून आणला. आपले आणि आपल्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे दिग्गज एकाच ठिकाणी आणण्याचे इष्ट धारिष्ट या बाजारपेठेतील काही सुज्ञ अनुभवी वरिष्ठांनी केले. ते निश्चितच वाखाणण्याजोगे होते.

    संगमनेरच्या इथल्या तत्वात संगम करण्याची ताकद आहे. मग तो संगम नदीचा असेल, माणसाचा आणि माणुसकीचा असेल, अथवा उद्याच्या एक नव्या राजकारणाचा संगम असेल. आम्ही आमच्या शहराच्या चेह-र्यासाठी चांगले देऊ शकत नाही का ? चांगले लिहू शकत नाही का ? चांगली भावना व्यक्त करू शकत नाही का ? अशी मनातली कोपरखळीचे प्रश्न मनालाच आता विचारायला लागली आहेत !

        अमृतवाहिनी ठरलेल्या प्रवरा माईच्या तत्त्वात आणि प्रत्येक थेंबा थेंबात नितळ असा संगम वाहताना दिसतो. अर्थात सर्वांनाच सामावून घेत, सर्वांना एकत्र,पवित्र करत, मार्गक्रमण करत महासागरास मिसळून त्यास सामावून घेण्याची किमया येथील निसर्गतत्त्वात दडलेली आहे. म्हणूनच आपला भारत देश या जगात एक संस्कृतीप्रधान असलेला महान देश म्हणून ओळखला जातो.

----- Advertisements -----

     आचार्य दादा धर्माधिकारी यांच्या घरी एक अतिथी आले असता त्यांना गावातील कारागृह आणि रूग्णालय दाखवण्याचा प्रसंग आला. दादा म्हणाले, हा बघा इथला "मोठा कारागृह" हे बघा इथले रूग्णालय असे दादा अतिथींना सांगत होते. समजणाऱ्यास या गोष्टीचा अर्थ निश्चित समजला असेल ! दादा धर्माधिकारी यांच्याही काळात राजकारण होते, सत्ताधारी होते, विरोधकही होते. तुमच्या विकासाची गंगा या शहरासाठी असली पाहिजे .गावात अनेक रुग्णालय असणे, मोठे रुग्णालय असणे, कारागृह असणे. ते मोठे असणे हा कसला विकास. यापेक्षा विकास प्रकल्प, शैक्षणिक संस्था, स्वास्थ केंद्र, बाग बगीचे, "पिन ड्रॉप सायलेन्स" असा भला मोठा "शांती भवनाचा" सभागृह हे त्या गावाचे नव्हे तर त्या राष्ट्राचे भूषण ठरू शकते !

कार्यकर्त्याचे मन आणि मनसुबे ?

कार्यकर्त्यांच्या वर्तणुकीवर, कृतीवर, भाष्यावर नेहमीच बवाल उठवले जाते. तो तरुणाईचा जोश आहे. सळसळते रक्त आहे. त्यांना अनुभवाची उणीव, जाणीव फारशी नसते ? अनेक तरुणाचे आयुष्य सतरंज्या उचलण्यात गेले. असेही म्हणणारे आपणच बघितलेले आहेत, बघत आहोत. जे सुज्ञ आहेत त्यांनी स्वतःचे कल्याण करून घेतले हे ही तितकेच खरे. आज या युवा पिढीवर आपल्या कुटुंबाची, परिवाराची, गावाची आणि राज्यासह राष्ट्राचीही जबाबदारी आहे. त्यांचे आयुष्य भविष्यही त्यांच्याच हातात आहे.  रोजगाराच्या, व्यवसायाच्या, लग्नाच्या समस्या त्यांच्या समोर "आ करून" उभ्या आहेत. त्यांना यातून सावरण्यासाठी श्रीगणेशा नक्कीच बुद्धी देईल असा आशावाद आपण व्यक्त करूयात !

कार्यकर्त्यांना सांगणार कोण ? अन् लक्षात घेणार कोण ?

तत्त्ववादी आणि एकनिष्ठ कार्यकर्ते हे काही केल्या कोणाचेही ऐकत नाही. ते कोणालाही जुमानत नाही. हीच खरी ओळख त्या खऱ्या कार्यकर्त्यांची आहे. ती त्याची खासियत आहे. ती का नसावी ? कार्य करतात ते कार्यकर्ते, कार्यकर्ता होय. परंतु यामध्ये अनेक कार्यकर्ते साहेबांच्या सतरंज्या उचलण्यामध्येच संपूर्ण आयुष्य पणाला लावणारे असतील तर असे कैक कार्यकर्ते यामध्ये संपलेही. तर काही कार्यकर्त्यांचे भविष्य उज्ज्वल झाले. परंतु नव्या युवा पिढी समोर भविष्य  दिसणा-या राजकारणात आपला ठसा उमटण्याची एक नामी संधी असू शकते ! कदाचित स्वतःला वाहून घेत आपल्या आयुष्याकडे, भविष्याकडे आणि जीवनाकडे दुर्लक्ष करून आपले शिक्षण, रोजगार , उद्योगापासून आणि आपल्या वैवाहिक जीवनापासून कदाचित ते फार दूर गेलेले असतील. त्यावेळेस मात्र गेलेली वेळ परत येईल असं कधीही घडणार नाही. किंबहुना तेव्हा आपल्या सोबत कोणीही असेल ,नसेल. यापेक्षा कार्यकर्त्यांनी यातुन स्वहीत साधुन अथवा प्रेरणा घेवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत, पण लक्षात कोण घेणार.

   

    याबाबत जनमानसाचा कानोसा घेतला असताना विविध क्षेत्रातील अनेकांनी भावना व्यक्त केल्या. सामाजिक, राजकीय, शेक्षणिक, वैद्यकीय, कृषीअशा विविध क्षेत्रातील सुज्ञ नि जाणकार व्यक्ती तसेच युवा युवती आदिंनी राजकारणाच्या सद्यस्थिती बाबत या विषयी घेतलेला धांडोळा आणि केलेला ऊहापोह.

----- Advertisements -----

    चूका होतात. तू, तू - में ,में यामुळेच ख-या अर्थाने स्थानिक प्रोग्रेसला ब्रेक लागतो. या कारणांमुळे संगमनेर मधील बरेच विषय भरकटत चालले आहेत. सर्व काही अलबेल चाललेले आहे असा ग्रह होत आहे. त्यास अवास्तवपणा आलेला आहे. विकासाची मुद्दे बाजूला राहिले असून मुख्य विषय भरकटत चालले दिसून येतात. एकूणच गावपातळी नव्हे तर राज्य , देश पातळीवरसुध्दा सदर विषय चर्चेचे बनत आहे. कधी कधी असं वाटतं की,विकास झाला अशा आविर्भावात कोणी राहू नये, विकासाचे मुद्दे संपले की काय ?   

 येथील स्थानिक समस्येला सामोरे गेले पाहिजे. रस्ते, वीज, पार्किंग, बेशिस्त अशी वाहतूक समस्या, गतिरोधक , महागाई , आरोग्य, बेकारी रोजगारी, सण उत्सवावर होणारा परिणाम याची जाणीव झाली पाहिजे. राजकारण तिथे दोन गट वास करी ! गट का नसावेत ? परंतु हे सर्वसामान्य जनतेसाठी त्रासदायक, क्लेशदायक ठरत आहेत. यातूनच आता गावात, भावात भांडणे झाल्यास वावगे वाटू नये. यासाठी प्रतिनिधीत्व करणा-यांनाच पुढील दिशा ठरवावी लागणार आहे.

      आरोप प्रत्यारोप झालेच पाहिजे, पक्ष वाढीला महत्व दिले गेलेच पाहिजे. सोशल मीडियामुळे सवंग लोकप्रियतेची झळाळी घेते. यात कसला आला ऍक्टिव्ह आणि वैचारिकपणा. एकमेकां विषयी द्वेष पेरून तात्काळ चितावणीखोर प्रत्युत्तर सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली जात असून असुरी प्रवृत्तीस खतपाणी घालत तर नाही ना ,? असाही एक विचार व्यक्त केला जात आहे.

धार्मिक उत्सवाच्या ताकदीची गरिमा वेगळीच असते

राजकारणाला कलाटणी देण्याची ताकद धार्मिक उत्सवात असते. परंतु धार्मिक उत्सव हे राजकारणाचा भाग होवू नये! . हल्ली सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत तासापूर्वी घडडलेली घटना अथवा तो विषयच लगेच शिळा झाल्यासारखा आम्हाला  वाटयला लागतो. हे समष्टीसाठी घातक ठरू पाहत आहे.

----- Advertisements -----

      धर्माचा उत्सव हा एकतेचा, श्रध्देचा असतो. त्यास कुठेही गालबोट लागू न देणे हेच आमच्या सर्वांचे कर्तव्य होय. राजकारणाला संस्कृती देण्याची क्षमता या उत्सवात असते. धीर धरून प्राप्त केलेला विजय हे एक अनमोल सत्य होय हे कदापि कोणी विसरू नये.

एकतेचा संगम हीच संगमनेरची खरी ओळख : माजी मंत्री थोरात 

---गणेशोत्सवाची परंपरा ही शतकानुशतकाणी असून ती आपण जपत आलोय. हा केवळ एक उत्सव नाही, तर एक प्रेरणादायी इतिहास आणि सांस्कृतिक वारसा आहे, जो संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरला आहे.  गणेश विसर्जन सोहळा म्हणजे संगमनेरच्या एकजुटीचा, उत्साहाचा आणि शिस्तबद्ध परंपरेचा संगम आहे.  सोमेश्वर रंगार गल्ली मित्र मंडळाच्या बाप्पांची आरती प्रसंगी थोरात बोलत होते. ही मिरवणूक केवळ उत्सव नाही, तर संगमनेरचे सांस्कृतिक दर्शन घडविणारी आहे. गुलालाचा वापर टाळून स्वच्छतेला प्राधान्य द्या, सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन पुढे जाणारी ही मिरवणूक आपल्या संगमनेरची खरी ओळख बनली आहे. आता, या प्रेरणादायी परंपरेला शांततामय आणि शिस्तबद्ध पद्धतीने पूर्णत्वास नेऊ या. आपल्या संगमनेरच्या गौरवशाली वारशाला आणखी उज्ज्वल करूया ! असे मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केले.

आमदार खताळांना दिला मान; नाकारले मानपत्र; राजकारण झाल्याचे कारण सांगत खताळ झाले नाराज 

   मानाचा पहिला गणपती असलेल्या सोमेश्वर मित्र मंडळाच्या वतीने विद्यमान आमदाराला पहिला मान दिला जातो. या मित्रमंडळाने आमदार अमोल खताळ यांच्याबरोबरच एक ज्येष्ठ अनुभवी राजकारणी म्हणून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही उत्सवाचा मान दिला. खताळ म्हणाले की,आपण आमदार म्हणून नाही तर प्रेमापोटी गणेश भक्त म्हणून या ठिकाणी आलो असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. दुर्दैवाने या ठिकाणी राजकारण झाल्याचे कारण सांगत खताळ नाराज झाले. खताळाचे मन व्यथित झाले. आमदार खताळ यांनी आपले मत व्यक्त करत मी या ठिकाणी आमदार नव्हे तर एक गणेश भक्त आणि कार्यकर्ता म्हणून आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मंडळाने मला मान दिला. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी राजकारण झाल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. आमदार खताळ यांना आरतीचा मान देण्यात आला तरी त्यांनी मानपत्र स्वीकारलेच नाही. हा धार्मिक उत्सवच आता राजकीय झाला असल्याचे बोलले जात आहे. 

----- Advertisements -----

संपत्तीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे.

शिवाजी महाराज