नगरपालिकेच्या वतीने मोकाट जनावरांवर कारवाई करत, गाई ऐवजी केवळ लहान बछड्यांनाच ताब्यात घेतल्याने नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने गाईचे हंबरडे वाढविण्याची डोकेदुखी करून घेतली आहे. साळी वाड्यात फोडला हंबरडा गायांनी पालिकेचा उंबरठा चढला बायांनी असेच काहीशे म्हणण्याची वेळच नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणली असून पालिकेत जाऊनही नीट उत्तर तर मिळालेच नाही. एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी फोनही उचललले नसल्याने महिलांनी नगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गेली काही दिवसापासून नगर पालिकेच्या वतीने शहरातील मोकाट जनावरे पकडण्याचे काम सुरू आहे. बुधवार दि. 30 जुलैला झालेल्या कारवाईमध्ये नगरपालिकेच्या वतीने गाया ऐवजी बछड्यांनाच पकडून नेण्यात आल्याने गाया बरोबर येथील बायांनीही पालिकेच्या विरोधात चांगलाच हंबरडा फोडला असल्याचे दिसून येत आहे.

{ कवितेतील एक चपखल प्रसंग } आया बया सांगत होत्या आणि गाईचे हंबरून जाणे तसेच टुमणे लावणे असा कवितेचा प्रसंग याठिकाणी काही अंशी चपखल बसतो.
या घडलेल्या घटनेने मात्र विदर्भातील कवी प्रा. समाधान पाचपोळ यांच्या कवितेची काहीशी आठवण या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. कवी पाचपोळ आपल्या काव्यात म्हणतात.
हंबरून वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय।
*आया बाया* सांगत होत्या होतो जवा तान्हा, दुष्काळात मायचा माझा आटला होता पाम्हा, पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामंदी दिसती माझी माय हंबरून वासराले।
काट्याकुट्या वेचायला माय जायी रानी पायात नसे वहांन तिच्या फिरे अनवाणी काट्याकुट्यालाही तिचं मानत नसे पाय ,तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय. हंबरून वासराले ...।
बाप माझा रोज लावी मायच्या मागं *टुमनं* बस झाला शिक्षान आता घेऊदी हाती रूमनं शिकून शानं कुठं मोटा मास्तर होणार हाय तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय हंबरून वासराले ...।
संगमनेर नगरपालिकेच्या वतीने जनमानसाची सुरक्षा लक्षात घेत शहरातील मोकाट जनावर आणि कुत्रे यांचा बंदोबस्त करण्यासाठी सातत्याने कारवाई केल्या जाते. परंतु काल केलेल्या अजब कारवाईने पालिका कर्मचाऱ्याचे चांगले हसू झाल्याचे दिसून येत आहे. काल केलेल्या कारवाईमध्ये रस्त्यावरील समोर आलेलेच जनावरे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेत गो शाळेत पांजरपोळ येथे दाखल केली. परंतु गायी ऐवजी बछड्यांनाच पालिकेचे कर्मचारी घेऊन गेल्याने अखेर आपल्या बछड्यासाठी मात्र गाईला हंबरडा फोडणे भाग पडले. या हंबरण्यामुळे साळीवाड्यातील नागरिकांना रात्रभर गाईचा हंबरडा कासावीस करीत होता.
तर दुसरीकडे गोशाळेत नेण्यासाठी पालिकेच्या वतीने गायी ऐवजी तिच्या पिल्याला उचलण्यात आले. पिलांना उचलताच गायींनी मात्र हंबरडा फोडल्याने साळी वाड्यातल्या बायांना गायांसाठी अखेर पालिकेचा उंबरठा चढावा लागला. पालिकेत जाऊनही गायासाठी बायांची मात्र तिथे निराशा झाल्याने अखेर काही बाया आणि कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी रामदास कोकरे तसेच आरोग्य विभागाचे अमजद पठाण यांच्याशी संपर्क करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांनी त्यांच्या विषयी चांगला रोष व्यक्त केल्याचे दिसून आले.

याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी कार्यालयीन कामासाठी दौऱ्यावर होतो. तसेच पालिकेचे कर्मचारी हे श्रीरामपूर येथे कार्यशाळेत असल्याने नागरिकांचा काहीतरी गैरसमज झाल्याचे दिसून येते. परंतु उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रस्त्यावरील मोकाट जनावरांना पकडून पांजरपोळ गोशाळेत त्यांचा प्रबंध केला जातो. परंतु या कारवाईमध्ये काही जनावरे हे बेभान असतात. आक्रमक अथवा मारके जनावरे नागरिकांना अथवा कर्मचाऱ्यांना नुकसान करू शकतात. नागरिकांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता याची दखल घेण्यासाठी प्राधान्याने पालिका विचार करत असते. सप्टेंबर 2024 ते जुलै 2025 या दरम्यान पालिकेच्या कारवाईमध्ये तब्बल 500 पेक्षा जास्त जनावरांना पांजरपोळ येथे दाखल करण्यात आली आहेत. याबाबत जनावरांची नोंदही घेतल्या जाते. पालिकेच्या माध्यमातून सातत्याने ही कारवाई सुरू असते. कारवाईच्या दरम्यान अनेकदा नागरिकांकडून दांडगाई केली जाते. तसेच अनेकदा जनतेच्या विरोधालाही सामोरे जावे लागते. अनेकदा जनतेचा रोष सहन करावा लागतो. जनावर पकडल्यानंतर नागरिक सांगतात. परंतु मोकाट जनावराबद्दल तसेच उपद्रव्याची जाणीव नागरिकांनाही झाली पाहिजे. अनेकदा दांडगाईमुळे नागरिकांवरही याबाबत गुन्हे दाखल करण्याची वेळ आलेली आहे. आक्रमक, मारके, मोठी जनावरे पकडणे घातक असल्याने कर्मचाऱ्यांचे बल वाढवून जनावराचा बंदोबस केला जाईल असे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितले.
श्रम हेच यशाचे खरे साधन आहे.
लोकमान्य टिळक