संगमनेरच्या विकासात प्रत्येक नागरिक विकासयात्रेचा भागीदार ; आ. सत्यजीत तांबे
{ 2.0 जनतेच्या सहभागातून आकार घेणार विकासाचा जाहीरनामा }
संगमनेर : ( प्रतिनिधी )
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेकडून, जनतेसाठी तयार होणाऱ्या संगमनेर 2.0’ या जाहीरनाम्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांनी केली. हा उपक्रम शहराच्या पुढील ५० वर्षांच्या विकास आराखड्याचा पाया ठरणार असून, नागरिकांच्या थेट सहभागातून शहराचा मास्टर प्लॅन तयार केला जाणार आहे.
आ. तांबे म्हणाले, संगमनेरचा विकास हा फक्त निवडणुकीचा मुद्दा नाही, तर प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेत, लोकांच्या विचारातून जाहीरनामा तयार करून त्यावरच पुढील विकासाचे धोरण ठरेल. नागरिकांच्या सूचनांसाठी क्यू आर कोडद्वारे सुरू करण्यात आला असून, व्यापारी, महिला, विद्यार्थी, शेतकरी, सामाजिक संस्था आणि बाहेरगावी स्थायिक संगमनेरकर यांच्याशी ऑनलाइन ऑफलाइन संवाद सुरू आहे. तांबे यांनी सांगितले. शहरातील निसर्गरम्य अशा गंगामाई घाट परिसरात आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले पुढील पाच वर्षांत मास्टर प्लॅन तयार करून शहराच्या पन्नास वर्षांच्या विकासाचा रोडमॅप निश्चित केला जाणार आहे. आमचा प्रयत्न दर्जेदार आणि लोकाभिमुख नेतृत्व देण्याचा असून, जनतेच्या मनातील सुशिक्षित, प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त व्यक्तीला संधी मिळेल,असे ते म्हणाले. शहरातील जलपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, रस्ते विकास, उद्याने आणि पर्यावरण संरक्षण याबाबत केलेल्या कामांची त्यांनी माहिती दिली. आज संगमनेर गार्डन सिटी म्हणून ओळखले जाते, ३५ उद्याने आणि लाखो झाडांमुळे हरित संगमनेर साकारले आहे. गेल्या नऊ वर्षांत २७ कोटी रुपयांहून अधिक पुरस्कार नगरपालिकेला मिळाले असे त्यांनी नमूद केले. आ. तांबे म्हणाले, संगमनेर 2.0 म्हणजे पुढील आवृत्ती मूलभूत सुविधांपलीकडे भरारी घेणारे संगमनेर. आता कामे केली आहेत, पुढे कमाल करायची आहे. नागरिकांच्या कल्पनांमधूनच जनतेच्या स्वप्नातील संगमनेर साकारले जाईल. या जाहीरनाम्यात शिक्षण, आरोग्य, उद्योग, रोजगार, वाहतूक, संस्कृती, पर्यावरण आणि डिजिटल सुविधा या सर्व क्षेत्रांचा समावेश असणार आहे. संगमनेरचा प्रत्येक नागरिक हा या विकासयात्रेचा भागीदार असेल असा आत्मविश्वास तांबे यांनी व्यक्त केला.
