ब्रेकिंग न्यूज :
भारत

संगमनेरच्या कला सांस्कृतिक प्रतिष्ठेला नवा आयाम देवू ;आमदार खताळ

Blog Image
एकूण दृश्ये: 151

संगमनेरच्या कला सांस्कृतिक प्रतिष्ठेला नवा आयाम देवू ;  आमदार खताळ

{ लोककलाकार कांताबाई सातारकर यांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा }                          कलाकारांची गरिमा वाढविण्यासाठी प्रयत्न करणार

       संगमनेर : भारत रेघाटे

---- संगमनेरची भूमी ही साहित्य, कला आणि संस्कृती ची खाण आहे. येथेच साहित्य कलाविश्वाचा संगम झाला असून हा अलौकिक वारसा येथील कलाकारांनी परंपरेने जपला आहे. अनेक कलाकारांनी या भूमीला वैभव मिळवून दिले आहे. कवी अनंत फंदी, कवी विठ्ठल उमप यांच्यापासून ते तमाशा कलाकार दिवंगत कांताबाई सातारकर पवळाबाई भालेराव यांच्यापर्यंत, कला क्षेत्रातील त्यांच्या अनमोल अशा योगदानाने आपण सर्वजण भारावून गेलो आहोत. या सर्व ज्येष्ठ आणि लोकप्रिय कलाकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि मातीच्या सुपुत्रांच्या नावाने दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देण्याची योजना तयार करण्यात आली आहे. यावर्षी पहिला पुरस्कार दिवंगत कांताबाई सातारकर यांच्या नावाने लोक कलाकाराला देण्यात येईल ज्यासाठी पुरस्कार निवड समिती स्थापन केली जाईल, असे महत्त्वपूर्ण विधान आमदार अमोल खताळ यांनी केले.     आषाढी वारीच्या आध्यात्मिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, महायुतीच्या पुढाकाराने अमोल खताळ आणि महायुतीच्या वतीने मालपाणी लॉन्स येथे "बोलावा विठ्ठल" हा भक्तीगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता. आषाढी एकादशीच्या दिवशी संगमनेरमध्ये प्रथमच आयोजित केलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वागत केले. केंद्र सरकारची 'नारदीय कीर्तन शिष्यवृत्ती' मिळालेल्या देशातील पहिला तरुण कीर्तनकार पराग पांडव आणि सुरभी कुलकर्णी यांच्या भक्तीगीतांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. संगीत समन्वयक सत्यजित सराफ, सिद्धार्थ थत्ते, नरेंद्र साळवे, वैभव पवार, प्रथमेश बिडवे आदिच्या साथीने सादर झालेल्या भक्तीगीतांच्या संगीतमय कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. माझे माहेर पंढरी, बोलावा विठ्ठल, कानडा राजा पंढरीचा अशा अनेक लोकप्रिय अभंगवाणी , भक्तीगीतांनी हा संगीतमय कार्यक्रम अतिशय रंगतदार झाला. खताळ म्हणाले की, या मनोवेधक उपक्रमाद्वारे, सर्वांच्या सहकार्याने, तालुक्यातील साहित्यिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्राला अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न करू. कलेच्या माध्यमातून संगमनेरला प्रसिद्ध करण्यात योगदान देणाऱ्या तमाशा कलाकार कांताबाई सातारकर यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी, लोक कलाकाराला त्यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल, अशी घोषणा खताळ यांनी केली. संगमनेरच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेला एक नवीन आयाम देण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात काम सुरू करण्यात आले आहे. हा पहिलाच प्रयत्न म्हणून, या वर्षीपासून दरवर्षी आषाढी एकादशीला भक्तीगीतांचे आयोजन सुरू करण्यात आले आहे. सर्व गायक आणि वादकांचा त्यांच्या कुटुंबियांसह खताळ यांनी सन्मान केला.                               सूत्रसंचलन स्मिता गुणे यांनी केले. या कार्यक्रमास सांस्कृतिक, राजकीय, आध्यात्मिक, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांची लक्षणीय उपस्थित होती.

खताळ घराण्याला वारकरी सांप्रदायाचा वारसा                           -- माझ्या कुटुंबाला वारकरी सांप्रदायाचा मोठा वारसा आहे. गेल्या सव्वीस वर्षांपासून माझी आई न चुकता वारीला जात आहे. या वर्षी मी खूप भाग्यवान ठरलो. मी माझ्या आईसोबत काही अंतर चालत गेलो, वारीतील अनुपम असे क्षण मी अनुभवले. पांडुरंगच्या कृपेने आणि आईने अनेक वर्षे केलेल्या सेवेमुळे तालुक्यातील लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. तालुक्याची गरिमा उंचावण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.

जीवन हे एक प्रवास आहे, गंतव्य नव्हे.

महात्मा गांधी