ब्रेकिंग न्यूज :
भारत

राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी ध्रुव’च्या चौघांची निवड !

Blog Image
एकूण दृश्ये: 103

राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी ध्रुव’च्या चौघांची निवड ! मुला-मुलींच्या संघातून प्रत्येकी दोघांचा समावेश

     संगमनेर :प्रतिनिधी

सीबीएसईच्या दक्षिण विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रिकेटपटूंनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करताना निवड समितीची मने जिंकली. या स्पर्धेत वैयक्तिक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या भूषण राऊत, श्‍लोक हेडा, तनुश्री लहामगे व मानसी आहेर या चौघांनी सुवर्णपदकासह राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत स्थान मिळवले. या संपूर्ण स्पर्धेत ‘ध्रुव’च्या क्रिकेटपटूंनी चार सुवर्ण पदकांसह बारा रौप्य आणि तीन कांस्य अशा 19 पदकांची कमाई केली.

    प्रीतीसुधाजी इंटरनॅशनल स्कूलच्या क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलांच्या गटात भूषण राऊत आणि श्‍लोक हेडा यांनी तर, मुलींच्या गटात तनुश्री लहामगे आणि मानसी आहेर अशा चौघांनी सुवर्ण पदके पटकावली. चौदा वर्षांखालील मुलांच्या गटात तनीष बलदेवा आणि निकूंज सोनी यांनी कांस्य पदकं मिळवले. 17 वर्षांखालील गटात तेज जैनला रौप्य आणि साहील खाडेला कांस्य पदकं मिळाले. एकोणावीस वर्षांखालील गटात राऊत-हेडा यांच्या पाठोपाठ सर्वेश बंगाळ, विनित भन्साळी, साहील शिरसाठ आणि ध्रुव धादवड यांनी रौप्य पदकं पटकावली. मुलींच्या सतरा वर्षांखालील गटात श्रावणी झिंजुर्डे, प्राप्ती मुरक्या आणि श्रद्धा साठे या तिघींनी रौप्य पदकांची कमाई केली. तनुश्री व मानसी या जोडीच्या सुवर्ण कामगिरीने मनोधैर्य उंचावलेल्या 19 वर्षांखालील गटात आराध्या पुजारी, आराध्या मुळे, पलक सिकची आणि मृण्मयी महाडिक यांनी रौप्य पदकं मिळवली. संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी करताना ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रिकेटपटूंनी आपल्या वैयक्तिक कामगिरीच्या बळावर चार सुवर्ण, बारा रौप्य आणि तीन कांस्य अशा 19 पदकांची कमाई केली. सुवर्ण पदक विजेत्या चौघांची राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना महेश जंगम यांचे मार्गदर्शन लाभले.

    ध्रुवच्या क्रिकेटपटूंनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी, व्हा.चेअरमन गिरीश मालपाणी, प्राचार्या अर्चना घोरपडे व क्रीडा विभागप्रमुख गिरीश टोकसे यांनी अभिनंदन केले आहे.

----- Advertisements -----

निस्वार्थपणे काम केले, तरच जीवन यशस्वी होते.

संत तुकाराम