रक्तदानात जीवदान देण्याची किमया :- गिरीश मालपाणी. स्व. दामोदर मालपाणी यांचा ५० वा स्मृतीदिवस ; १९० पिशव्या रक्त संकलित ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संगमनेर प्रतिनिधी
अन्नदान, धनदान, ज्ञानदान, श्रमदान, योगदान असे दानाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने आयुष्यामध्ये दान करण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र इतर सर्व दानांच्या तुलनेत रक्तदानाचे महत्त्व आगळे वेगळे आहे. एक रक्तदाता एकाच वेळी चार जणांचे जीव वाचवू शकतो. ही किमया रक्तदानामध्ये आहे. त्यामुळे सर्वाधिक समाधान देणारे दान म्हणजे रक्तदान आहे’ असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी यांनी शिबिराचे उद्घाटन प्रसंगी केले.

तत्पूर्वी मालपाणी उद्योग समूहाचे संस्थापक स्व. दामोदरजी आणि सौ रुक्मिणीबाई मालपाणी यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून आदरांजली वाहण्यात आली. उद्योग समूहाचे संस्थापक स्व. दामोदर जगन्नाथ मालपाणी यांच्या ५० व्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी प्रमाणे मालपाणी इंडस्ट्रियल मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अर्पण रक्तपेढीचा महत्वपूर्ण सहयोग लाभला.

व्यासपीठावर अर्पण रक्तपेढीच्या प्रमुख मार्गदर्शक डॉ. मधुरा पाठक, मालपाणी उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल खिवंसरा, कामगार नेते कॉम्रेड माधव नेहे, वरिष्ठ व्यवस्थापक रमेश घोलप, मानव संसाधन व्यवस्थापक बालाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तब्बल १९० पिशव्या रक्त संकलित करण्यात यश आले. त्याबद्दल मालपाणी उद्योग समूहाला अर्पण रक्तपेढीच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. रक्त ही काळाची गरज आहे. रक्त संकलना मध्ये लक्षवेधी वाढ झाल्याचे दिसून आली. हे कौतुकास्पद आहे.
रक्तदाना विषयी शास्त्रशुद्ध माहिती देतांना गिरीश मालपाणी म्हणाले की,‘रक्तदानाचा संकटातील रुग्णांना वाचवण्यासाठी तर उपयोग होतोच. मात्र रक्तदात्यालाही रक्तदानाचे फायदे होत असतात. रक्तदान केल्यानंतर प्रत्येकाचे शरीर पुन्हा नवीन रक्त तयार करते. नव्याने सर्व प्रकारच्या उपयुक्त पेशींचा साठा तयार होतो. उद्योग समूहामध्ये अनेक वर्षांपासून सातत्याने रक्तदानाचा उपक्रम राबविला जातो आणि त्या माध्यमातून असंख्य रुग्णांपर्यंत रक्त पोहोचते. सर्व कामगार सहकारी महिला बंधू भगिनी रक्तदानासाठी उत्स्फूर्तपणे पुढे येतात ही गोष्ट अतिशय कौतुकाची आहे. स्व. दामोदर मालपाणी हे एक परोपकारी व्यक्तिमत्व होते आणि त्यांची शिकवण डोळ्यासमोर ठेवूनच मालपाणी उद्योग समूह विविध सामाजिक उपक्रम राबवितो असे ते म्हणाले.
याप्रसंगी प्रफुल्ल खिवंसरा, कॉम्रेड नेहे, रमेश घोलप, बालाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक देवदत्त सोमवंशी यांनी तर सूत्रसंचालन संतोष राऊत यांनी केले. कार्यक्रमासाठी रवी कानडे, राहुल शेरमाळे, व्यंकटेश लाहोटी, मनोज हासे, विनोद एनगंदुल, मुरारी देशपांडे, मंगेश उनवणे शुभम शिंदे, विविध विभागाचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते.
