पद्मश्री ने तमाशाची मान उंचावली; पद्मश्री रघुभाऊ खेडकरांचा होणार भव्य नागरी सन्मान – आमदार तांबे ;
८ फेब्रुवारीला दिमाखदार गौरव सोहळा
संगमनेर (प्रतिनिधी)
घरात अथवा गल्लीत कडाक्याचे भांडण झाले तर, कशाला तमाशा करताय ? तर एकीकडे तमाशाकडे उपेक्षेने, तुच्छतेने आणि अवहेलनेने पाहिले जात असे मात्र याच तमाशाने आज देशपातळीवर पद्मश्रीचा मान मिळवला आहे. लोकनाट्याच्या क्षेत्रातील तमाशाला मिळालेला हा पहिलाच पद्मश्री पुरस्कार असून, तो संगमनेरच्या रघुभाऊ खेडकर यांच्या कलेमुळे शक्य झाला आहे. समाजाने ज्या कलेला कधी दुय्यम मानले, त्याच कलेने आज संगमनेरचे नाव देशभर उज्वल केले आहे.

संगमनेरचे लोकप्रिय लोककलावंत रघुवीर खेडकर यांच्या गळ्यात अखेर पद्मश्रीची माळ पडली. प्रजासत्ताकदिन २६ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या ११३ पुरस्कारांमध्ये संगमनेरच्या मातीतून घडलेल्या या कलाकाराचा समावेश होणे, खऱ्या अर्थाने तमाशा कलेच्या प्रतिष्ठेत भर घालणारे ठरले आहे.
तमाशासम्राज्ञी स्व. कांताबाई सातारकर यांच्या समृद्ध परंपरेचा वारसा पुढे नेत लोककलेच्या माध्यमातून तमाशासृष्टीसह संगमनेरचे नाव देशभर पोहोचवणाऱ्या ज्येष्ठ लोककलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर यांना गणराज्य दिनानिमित्त पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान तमाम संगमनेरकरांसाठी अभिमानास्पद आहे.

आयुष्यभर लोककलेची अविरत सेवा करणाऱ्या रघुवीर खेडकर यांचा संगमनेरकरांच्या वतीने रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली.
आमदार तांबे म्हणाले की, तमाशा ही महाराष्ट्राची पारंपरिक व समृद्ध लोककला असून स्व. कांताबाई सातारकर आणि रघुवीर खेडकर यांनी अत्यंत निष्ठेने व समर्पणभावनेने या कलेची सेवा केली आहे. रघुवीर खेडकर यांनी हा वारसा समर्थपणे पुढे नेत देशपातळीवरील तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. या माध्यमातून त्यांनी लोककलावंतांच्या विविध समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडल्या.
सोशल मीडियाच्या युगात पारंपरिक लोककला लोप पावते की काय अशी भीती असतानाही रघुवीर खेडकर यांनी अत्यंत सक्षमपणे तमाशा जिवंत ठेवण्याचे कार्य केले आहे. विनोदी अभिनेता, सोंगाड्या, हजरजबाबी भूमिका, वगनाट्यातील प्रभावी अभिनय तसेच पारंपरिक लावणी, समई व थाळी नृत्य यांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
संगमनेरला कवी अनंत फंदी, पवळा हिवरगावकर, विठ्ठल उमप यांसारख्या थोर लोककलावंतांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. या भूमीने नेहमीच कलाकार व संतांचा सन्मान केला असून, रघुवीर खेडकर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा संगमनेर शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अत्यंत गौरवास्पद ठरला आहे.
संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिक, विविध समाजघटक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संघटना तसेच राजकारणविरहित सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने रविवार, ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले आहे.
राजकारणविरहित सर्वसमावेशक गौरव समिती
रघुवीर खेडकर हे संगमनेरकरांचे लाडके ‘रघुभाऊ’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नागरी सत्कारासाठी राजकारण विरहित, सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच विविध सेवाभावी, शैक्षणिक व सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी यांची सर्वानुमते सर्वसमावेशक गौरव समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही आमदार सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केले.
