पत्नीच्या खाकी वर्दीतून तोतया पोलीस पतीने अनेकांना गंडवले;
महिलांसह अनेकांची केली फसवणूक; नऊ महिन्यानंतर प्रकार उघड ; केली अटक
नाशिक [ भारत रेघाटे ]
गेली काही वर्षापासून पोलीसांनी वर्दी परिधान करून पोलीस अधिकारी असल्नेयाचे भासवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलीस यास नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने साळुंके नगर अंबड येथे सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक शहरासह अनेक ठिकाणी या तोतया पोलिसाने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. अखेर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सागर विष्णू पवार कमोदनगर असे या भामट्या आरोपीचे नाव आहे.

सागर पवार वर या आधी विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई झाली आहे. आपण पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून उपनिरीक्षक असलेल्या पत्नीच्या वर्दीचा तो गैरवापर करत होता. या माध्यमातून त्याने अनेकांना गंडा घातला आहे.

नऊ महिन्यांपासून फरार, अखेर अटकेत
पोलिस पत्नीच्या गणवेशाचा वापर करून तो स्वतः उपनिरीक्षक असल्याचे भासवत होता. नऊ महिन्यापासून सागर पवार हा फरार होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत सापळा रचला आणि सागरला अटक केली आहे. या प्रकरणी आता त्याची चौकशी केली जाणार आहे.

