प्रयत्नांचाच विजय होतोच :- डॉ. मैथिली तांबे खूप वर्षानंतर फिरली स्केटिंग ची चाके
संगमनेर : ( प्रतिनिधी )
जिंकणे,हरणे हा जीवनाचा एक भाग आहे. पण प्रयत्न सोडू नका, कारण सातत्याने प्रयत्न करणारा कधीच हरत नाही, असे प्रेरणादायी प्रतिपादन प्रसिद्ध मार्गदर्शक डॉ. मैथिली तांबे यांनी स्केटिंग चॅम्पियन विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात केले. तत्पूर्वी त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्केटिंग स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना संदेश देताना त्या म्हणाल्या की, फेल होणे हे शेवट नसतो, तर नव्या सुरुवातीची संधी असते. उठणे आपल्या हातात असते. स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि ध्येय गाठेपर्यंत कुठेही थांबू नका. कारण तो एक प्रेरणेचा झरा असून प्रयत्नांच्या बळावर यशाची झेप घेता येते. डॉ. तांबे यांनी शिक्षकांच्या प्रयत्नांचेही कौतुक करत सांगितले की, येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्लॅटफॉर्म दिला आहे. प्रत्येक मुलाने आपल्या स्किल्सना धार लावून आत्मविश्वासाने पुढे गेले पाहिजे. स्केटिंग स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले. कार्यक्रमात पालक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. वातावरण प्रेरणेच्या उत्साहाने भरले होते.

सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय रोलर ऍथलेटिक्स स्केटिंग स्पर्धा उत्साहात आणि स्पर्धात्मक वातावरणात पार पडल्या. अहिल्यानगर रोलर ऍथलेटिक्स स्केटिंग असोसिएशन व अंबिशन स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत संगमनेर, राहुरी, राहता, कोपरगाव, अकोले, श्रीरामपूर आदी तालुक्यांतील सुमारे 150 खेळाडूंनी सहभाग घेतला. तालुका क्रीडा संकुलात वेग, संतुलन आणि आत्मविश्वासाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
स्पर्धेचे उद्घाटन डॉ.मैथिली तांबे तसेच प्रा. नारायण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ. मैथिली तांबे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शब्दांत मार्गदर्शन केले.
स्पर्धेचे आयोजन अंबिशन स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भोत, सचिव प्रशांत भंडारी, सदस्य प्रवीण फटांगरे, संतोष मेहेर, अमोल कासार, तेजस शिरसाट, ऋषिकेश तारडे, अमोल वामन, महेश जंगम, भारत फैय्याऊल यांनी उत्तम रीतीने केले. स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना 15 व 16 नोव्हेंबर रोजी खोपोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रोलर ऍथलेटिक्स स्केटिंग स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. माजी प्राचार्य नारायण जाधव , तसेच प्रमिला ढोकणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन बाबासाहेब मेमाणे यांनी केले.
