पुलाचा अंदाज न आल्याने दुचाकीसह युवक वाहून गेला बेपत्ता, शोध सुरू
संगमनेर : प्रतिनिधी
केस कापून आपल्या घरी निघालेल्या पाण्याचा प्रवाहात एका व्यक्तीला पुलाचा अंदाज न आल्याने सदर व्यक्ती आपल्या दुचाकीसह पाण्यात वाहून गेल्याची दुदैवी घटना चिखली केरेवाडी रोडवरील आढळा पुलावर घडली आहे.

या दुर्दैवी घटनेत केरेवाडी येथील संदीप भाऊसाहेब केरे ( वय 34) हे आपल्या दुचाकीसह पाण्यात वाहून गेले. दोन दिवस उलटूनही अद्यापही त्यांचा शोध लागलेला नसल्याने केरेवाडीत शांतता पसरली.

याबाबतची घटना अशी आहे की, संदीप केरे हे रविवार ( दि 28 ) रोजी केरेवाडीतून मंगळापूर फाट्यावर कटिंग करण्यासाठी गेले होते. कटिंग करून ते आपल्या घरी परतत असताना चिखली केरेवाडी दरम्यान आढळा पुलावर पाणी असल्याने तसेच पुलाचा अंदाज न आल्याने आपल्या दुचाकीसह ते वाहून गेले. ही घटना रविवार दि 28 ला रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडली. संदीप घरी आले नाही. घरच्यांनी कोणाकडे तरी गेले असल्याचा अंदाज लावला. परंतु दुसऱ्या दिवशीही ते परत आलेच नसल्याने त्यांचा शोध सुरू झाला.

दरम्यान मंगळवार ( दि 30 ) सकाळी साडे सातच्या सुमारास नदीच्या पात्रात दुचाकी क्र. एम एच 17 सी टी 8515 आढळून आली. केरेवाडी येथील युवकांनी नदीपात्रातून दुचाकी बाहेर काढली. सध्या परिसरात बराच पाऊस झाल्याने पाण्याचा प्रवाह वाढला होता. या प्रवाहात संदीप वाहून गेल्याचे घटनेवरून समजते. गेल्या दोन वर्षांपूर्वी चिखली केरेवाडी दरम्यान असलेला आढळावरचा पूल हा वाहून गेला होता. तलाठी विजय भोईर, पोलीस पाटील आबासाहेब सहाने, तसेच शहर पोलीस घटनेचा शोध घेत आहेत. ग्रामस्थांनीही ओझर बंधाऱ्या पर्यंत संदीपचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कुठेही आढळून आले नाहीत.

