न्यूज सह्याद्री एक्सप्रेस युट्यूबर पत्रकारावर ४ लाखाच्या खंडणीचा गुन्हा दाखल
संगमनेर: { प्रतिनिधी }
दत्त दिगंबर नावाच्या धर्मादाय संस्थेची बदनामी करत तसेच न्यूज सह्याद्री एक्सप्रेसच्या युट्यूब चॅनेलवर संस्थेचे चित्रिकरण करून खंडणी मागितल्या प्रकरणी एका पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर युट्यूबरने संस्थेचा व्हिडिओ पोस्ट करून संस्थेची बदनामी करण्याची धमकी दिली तसेच संस्था संचालका कडून १० लाख रुपयांची मागणी केली. तडजोड झाल्यानंतर ६ लाखा ऐवजी ४ लाख रुपये देण्याचे ठरले. पत्रकाराच्या अवाजवी मागणीचा त्रास होत असल्याने संस्थेचे शिवम राजेंद्र गडगे (वय २१ वर्षे) यांनी अकोले येथील न्यूज 'सह्याद्री एक्सप्रेस' युट्यूब चॅनेलचे पत्रकार भाऊसाहेब साळवे यांच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भाऊसाहेब साळवे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ (२) (३) अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल केला.
*काय म्हटले फिर्यादी मध्ये*
दत्त दिगंबर धर्मादाय संस्थेची बदनामी करण्याच्या उद्देशाने पत्रकार भाऊसाहेब साळवे युट्यूबर चॅनेलवर व्हिडिओ पोस्ट करण्याची धमकी देत होता. जुलै २०२४ पासून सदर पत्रकार संस्था चालकाला धमक्या देत ब्लॅकमेल करीत असे, सतत फोन, व्हॉट्सअपवर कॉल करून चॅनेलवर तुमची आणि संस्थेची बदनामी करतो. फोनवरील त्याच्या धमक्यांना आम्ही कंटाळलो होतो. तसेच, सोमवार, ४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री साळवेने मला व्हॉट्सअॅपवर फोन करून १० लाख रुपयांची मागणी केली. त्याच्या आणि माझ्यामध्ये समझोता झाल्या नंतर, ६ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर, मान्य केलेल्या रकमेपैकी ३ लाख रुपये ताबडतोब आणि उर्वरित ३ लाख रुपये नंतर देण्याचे ठरले. त्यानंतर मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १० ते ११ च्या सुमारास मी त्याला फोन केला आणि साळवे आणि माझ्यामध्ये झालेल्या संभाषणात चार लाख रुपये देण्याचे ठरले. त्याने मला रात्री संगमनेर, धांदरफळ फाटा येथे बोलावले. पण माझ्यासोबत कोणीही नसल्याने मी जाण्यास नकार दिला. त्यानंतर, त्याने मला अकोले बस स्थानकाजवळील त्यांच्या कार्यालयात बोलावले असे शिवम गडगे यांनी तक्रारीत म्हटले आहे. जुलै २०२४ पासून आजपर्यंत साळवे आमच्या दत्त दिगंबर सेवाभाई संस्थेत माहिती न देता आला आहे आणि संस्थेचे आणि तेथील भक्तांचे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्ड करून ते न्यूज 'सह्याद्री एक्सप्रेस' या युट्यूब चॅनलवर प्रसारित केले आहेत, जेणेकरून संस्थेचे नाव बदनाम होईल. आमचे आणि संस्थेचे नुकसान होईल.या हेतूने वारंवार फोन करून सदर क्लिप्स माध्यमांमधून प्रसारीत करण्याची धमकी देण्याचा प्रयत्न केला. बदनामी कारक प्रसारण थांबवायचे असेल तर माझ्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. समझोत्या नंतर,त्याला चार लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर अकोले येथील सह्याद्री एक्सप्रेसच्या कार्यालयात बोलावण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात संगमनेर तालुका पोलिसांनी न्यूज सह्याद्री एक्सप्रेस या कार्यालयातच चार लाख रुपये घेताना पकडले. भाऊसाहेब साळवे यांच्या विरुद्ध बुधवार दि ६ रोजी रात्री ११ वाजता भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (२) (३) अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीं कडून चार लाख रुपयासह मोबाईल जप्त करण्यात आला. कायदेशीर पुराव्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे पोलिस उपनिरीक्षक एस.एस. सातपुते यांनी सांगितले.
