निझर्णेश्वर देवस्थान दिसणार नव्या अवतारात ! आ. अमोल खताळ : श्रद्धा, संस्कार , शक्ती आणि विकासाचा साकारणार संगम
संगमनेर ( भारत रेघाटे )
संगमनेर तालुक्यातील कोकणगावचा निझर्णेश्वर देवस्थान परिसर आता नव्या रुपात झळकणार असून जळू या देवस्थानचा नवा अवतार आता पहावयास मिळणार आहे. श्रद्धास्थानाला पर्यटन आणि अध्यात्माचा नवा आयाम देत एक कोटी १९ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

मिळालेल्या निधीतून निझर्णेश्वर ते राष्ट्रीय महामार्ग रस्ता, जोंधळे वस्ती रस्ता आणि गावातील अंतर्गत रस्ते साकारले जाणार असून, परिसराचा पूर्ण कायापालट होणार आहे. आ. खताळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने संगमनेर तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. प्रत्येक देवस्थानाचा दर्जा आणि सुविधा वाढवणे हेच आमचे ध्येय आहे. मागील आठवड्यात हिवरगाव पावसा येथील देवगड खंडोबा मंदिराला पर्यटन खात्यातून ‘ब’ वर्ग दर्जा आणि २ कोटी रुपयांचा निधी मिळवून देत त्यांनी धार्मिक ठिकाणांच्या विकासासाठी आपली वचनबद्धता सिद्ध केली आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मदतीने संगमनेर तालुक्यासाठी एमआयडीसीला तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. येणाऱ्या काळात येथे उद्योग, रोजगार आणि विकास यांची तिहेरी वाटचाल सुरू होईल. तसेच शहरातील कॉटेज रुग्णालयात स्वतंत्र स्त्री व बालरोग विभाग सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले . आ. खताळ आवाहन करताना म्हणाले की, केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात महायुती सरकार आणि संगमनेरला आपला आमदार असताना विकास वेगाने होणारच. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आपण सगळ्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम उभं राहावं.
छत्रपतींच्या पंचधातूचा अश्वारूढ पुतळा उभारणार
कार्यक्रमा दरम्यान माजी सरपंच श्याम जोंधळे यांनी मंदिर प्रवेशद्वारावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीर्ण पुतळ्याऐवजी पंचधातूचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी केली. त्यावर आ. खताळ यांनी त्वरित प्रतिसाद देत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्याशी चर्चा करून या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन दिले.
