मोकाट जनावरांचा बाजारपेठेत उच्छाद; कुत्र्यांचा उपद्रव , दुकानदार, नागरिकांचा संताप अनावर, दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण ?
संगमनेर ( प्रतिनिधी )
गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर शहरात मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. गल्लीबोळा पासून बाजारपेठेपर्यंत या जनावरांचा उच्छाद वाढत चालला असून, नागरिक आणि विशेषत: महिला, लहान मुले, ज्येष्ठांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सोमवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत गायींच्या झुंडीने बाजारपेठेत धुडगूस घातला. भाजीपाल्यांच्या पाट्या आणि फळाचीची लाथाडणी करत काही दुचाकी वाहनांना धडक देत मोठे नुकसान केले. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या गोंधळात एखादी आजी, लहान मुलं अथवा ज्येष्ठ नागरिक जखमी झाले असते तर ,यास जबाबदार कोण ? घडलेल्या प्रकाराबाबत दुकानदार आणि नागरिकांनी भीती व्यक्त केली. असून ही जबाबदारी कोणाची ? बाजारपेठ, तांदूळ बाजार, साळीवाडा, कॅप्टन लक्ष्मी चौक, आदी परिसरात मोकाट जनावरे रस्त्यावर धावताना दिसतात. तर चंद्रशेखर चौकात कुत्र्यांची जणू काही टोळधाडीसारखे एकत्रित आलेले भटके कुत्रे वावरत असताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

सतत घडणारी घटना ही अंगाचा शहारा आणणारी आहे. वारंवार तक्रारी करूनही नगरपालिकेचा निष्क्रियपणा संपत नाही असे येथील व्यावसायिकांनी स्पष्ट मत व्यक्त केले आहे.. यापूर्वीही अशाच प्रकारचा प्रसंग बाजारपेठेत घडला होता. गायींच्या भांडणात एक गाय रक्तबंबाळ झाली होती, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. दररोजच हा त्रास वाढत असून बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे नागरिकही आता भीतीने वावरत आहेत. या मोकाट जनावर आणि कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त झाला पाहिजे, अन्यथा व्यापाऱ्यांचा संयम सुटेल असा इशारा गोविंद नागरे यांनी दिला आहे.

