माजी मंत्री थोरांतांनी साधला मंत्री विखे पाटील, खताळांवर निशाना ;म्हणाले, तुमचे योगदान काय ! तुम्ही आठ महिन्यात चारी केली का ? थोरातांनी सुनावले खडे बोल ; सातत्यपूर्ण काम आणि निसर्गाच्या मदतीमुळे आले पाणी
संगमनेर ( प्रतिनिधी )
दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून आपण निळवंडे धरण व कालवे पूर्ण केलेत. कालव्यांच्या वरच्या बाजूला पाणी मिळावे हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या मदतीने भोजापूर चारी तयार केली. पाणी देण्यासाठी आपण सातत्यपूर्ण कामही केले. यावर्षी मे महिन्यातच चांगला पाऊस झाल्याने निसर्गाची कृपा झाली. तयार असलेली चारी आणि चांगला झालेला पाऊस यामुळे पाणी आले याचा आपल्याला आनंद आहे. मात्र तुमचे या चारीमध्ये योगदान काय ? असा सवाल मा मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांना केला आहे.
प्रवरा कारखान्याने यामधून अंग काढून घेतले.
मा. महसूल व पाटबंधारे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की .निमोण, नान्नज दुमाला या दुष्काळी परिसराला पाणी मिळावे याकरिता 1977 मध्ये संगमनेर व प्रवरा कारखाना यांनी संयुक्त खर्चातून चारी करावी असे ठरले. मात्र प्रवरा कारखान्याने यामधून अंग काढून घेतले. 1994 मध्ये स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या पुढाकारातून कारखान्याने त्यावेळेस खर्च करून ही चारी निर्माण केली. 1996 मध्ये वटमाई डोंगरा जवळ पाणी आले. सदरचे पाणी पुढे तिगाव माथ्या पर्यंत नेता येईल याचा विचार करून तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी कारखान्याच्या माध्यमातून ही संकल्पना राबविली. 2006 मध्ये कारखान्याची यंत्रणा व सर्व कामगार यांनी श्रमदान करून तिगाव माथ्या पर्यंत चारी पूर्ण केली. 2 ऑक्टोंबर 2006 मध्ये येथे पाणीपूजन केले. आपण जलसंधारण मंत्री असताना 2008 मध्ये या चारीच्या दुरुस्ती, सेतु पुल, काँक्रीट कामे आदि करिता 5 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्या माध्यमातून सातत्याने कामे झाली. भोजापूरचे पाणी दरवर्षी निमोण, पिंपळे, नान्नज दुमाला ,पारेगाव बुद्रुक, तळेगाव, तीगाव, वरझडी या गावा करिता मिळावे याकरता पाठपुरावा केला. याचबरोबर ही चारी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित केली. 2021 मध्ये पुन्हा चारीच्या दुरुस्ती करता 2 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. अनेक वेळा पिंपळे धरण भरल्यामुळे पारेगाव बुद्रुक चिंचोली गुरव देव कवठ्या पर्यंत पाणी गेले. सुरुवातीला चारीच्या कामासाठी वेळोवेळी आंदोलने केली. कारखाना यंत्रणा व आपण सातत्यपूर्ण काम केले. हे जनतेला माहीत आहे. आपणही अनेक वर्षांपासून मंत्री आहात यापूर्वी या चारीच्या कामासाठी आपण कोणते योगदान दिले. असा थेट सवाल करत या कामांमध्ये आपण एक तरी खडा कधी उचलला का ? असेही थोरात म्हणाले.
नवीन लोक प्रतिनिधीला तर ही चारी सुद्धा माहित नव्हती. काम कोणी केले ! कोणाचे योगदान आहे हे जनतेला माहीत आहे. खोट्या भूल थापा आणि सोशल मीडियाचा चुकीचा वापर करून भ्रम निर्माण केला जात आहे. चांगला पाऊस झाल्याने भोजापूर धरण ओव्हर फ्लो झाले. निसर्गाची कृपा यामुळे लवकर पाणी आले. ही चारी मागील आठ महिन्यात झाली का ? चारीच्या कामात आपले योगदान काय ? असा परखड सवाल मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्री विखेंसह तसेच नूतन लोकप्रतिनिधी खताळ यांना केला आहे.
कितीही भूलथापा द्या लवकर उत्तर देणार !
आपण दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी निळवंडे धरण कालवे पूर्ण केले. भोजापुरच्या चारीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. पाणी सर्वांना मिळाले पाहिजे यासाठी हा प्रामाणिक हेतू नजरेसमोर ठेवून कामे केली. पाण्यापासून वंचित असलेल्यासह सर्वांना पाणी मिळाले पाहिजे हा आपला आग्रह आहे. तुम्ही कितीही भूलथापा द्या. सर्वांना लवकरच उत्तर देऊ असा इशाराही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
