बंदी असलेला गुटखा विक्रेत्याचा धंदा उघड २ लाख २८ हजार ८०० रुपयांचा गुटखा जप्त ; अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन; पानटपरी चालकावर गुन्हा दाखल
संगमनेर (प्रतिनिधी)
शहरात गुटखाबंदीचा कायदा असूनही काही जण बेफामपणे विषारी गुटखा तंबाखूचा धंदा चालवत आहेत. शहर पोलिसांनी अशा गुटखा विक्रेत्याचा पर्दाफाश करत २ लाख २८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धाडसी कारवाईने शहरातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण शंकर बत्तुल ३४, जनता नगर, संगमनेर हा व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गुटखा, सुगंधी तंबाखू, पानमसाला आणि हुक्याचे साहित्य बेकायदेशीररीत्या विक्रीस ठेवत होता. महाराष्ट्र शासनाने अशा पदार्थांवर घातलेली बंदी झुगारून हा धंदा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच थेट सुगारस लक्ष्मी पान स्टॉल, बस स्थानक परिसरात मंगळवार दि ११ रात्री ९:३० च्या सुमारास छापा टाकून मोठा साठा हाती घेतला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम 123, 125 (अ) (ब), 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 मधील कलम 26(2), 26(2) ( अ) 27(3 ) (ई) , 59 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहेे
पोलीस राम मुकरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून, कारवाई कानिफनाथ जाधव यांनी केली. तपासाची सूत्रे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या हाती देण्यात आली असून, संपूर्ण कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस निरीक्षक समीर बारवकर करत आहेत. आरोपी कडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात विविध कंपन्यांचा २ लाख २८ हजार ८०० रुपयांचा गुटखा, तंबाखू व पानमसाला साठा मिळाला आहे. पोलिसांनी सर्व नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले असून पुढील तपास सुरू आहे.

