आमदार खताळांनी बस स्टेअरिंग हातात घेत स्थानकात मारला राऊंड ; आगारात ५ नवीन बसेस दाखल ; भक्तांना पंढरपुरी रवाना करत केले लोकार्पण
संगमनेर { भारत रेघाटे }
राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार अमोल खताळ यांच्या पाठिंब्याने संगमनेर आगारात १० बसेस आल्या. यापूर्वी मार्चमध्ये पाच बसेस आल्या होत्या. आता आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला शनिवारी आणखी ५ एसटी बसेस दाखल झाल्या. दस्तुरखुद्द खताळ यांनी स्थानकात महायुती पदाधिकारी कार्यकर्ते आणि वारकरी यांच्यासोबत स्थानकात राऊंड मारत प्रवाशांना पंढरपूरला रवाना करत बसचे लोकार्पणही केले.

खताळ म्हणाले की, आगारातील एसटी कर्मचारी, चालक आणि वाहकांच्या समस्या परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांना कळवल्या जातील आणि त्या तात्काळ सोडवल्याही जातील. नागरिकांनी बस स्थानक, बस स्वच्छ ठेवाव्यात असे आव्हान त्यांनी केले.

यावेळी शिवसेना तालुका अध्यक्ष रामभाऊ रहाणे, शिवसेना शहराध्यक्ष दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, महिला जिल्हा उपाध्यक्ष दीपाली वाव्हळ, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, मेघा भगत उषा कपिले, आरपीआय शहराध्यक्ष कैलाश कासार, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, कैलाश वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कपिल पवार, अॅड., संग्राम जोंधळे, यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते आणि आगार कर्मचारी नंदू कानकाटे चौधरी, किसन घुमरे, पटेल, श्रीमती बोंबले, श्रीमती उंबरे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

आगार प्रमुख प्रशांत गुंड म्हणाले की, संगमनेर आगारात ५७ बस होत्या, त्यापैकी पाच स्क्रॅप करण्यात आल्या. त्यानंतर मार्चमध्ये पाच नवीन बस दाखल झाल्या. आता नवीन पाच बस दाखल झाल्या आहेत. आता आगारात एकूण ६२ बस आहेत, त्यापैकी सामान्य बीएस २, च्या दोन बस, बीएस ३ च्या चाळीस बस, बीएस ४, बीएस ६ च्या वीस बस अशा एकूण ६२ बसेस आहेत. प्रवासाच्या तुलनेत बसची संख्या कमी असल्याचे त्यांनी सांगितले. ऑफ सीझनमध्ये आरक्षण केल्यास १५ टक्के सूट दिली जाते. लांब मार्गावरील बस फेरी कमी करण्यात आल्या असछन ग्रामीण भाग आणि तालुक्याला प्राधान्य देण्यात आले आहे. मुंबई, गोंदवले, म्हसवड, पंढरपूर, औरंगाबाद नगर जिल्ह्यांमध्ये बस पाठवल्या जातात. भविष्यात दर्शन योजनेत अक्कलकोट आणि तुळजापूर साठी बस सोडण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.

जेव्हा आमदार खताळ बस स्टेरिंग घेतात हातात !
आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यातून नव्याने दाखल झालेल्या पाचही एसटी बसेसची पूजा करून चक्क बसच चालवून पंढरपूर कडे प्रवाशांना रवाना करत लोकार्पण केले. दस्तुरखुद्द आमदार खताळांनी चक्क बस स्टेरिंग धरत स्थानकात बस चालवण्याचा आनंद घेतला. ते म्हणाले की आपण मतदार संघ चालवतो. मतदारसंघ चालवण्याचा अनुभव सोबत आहेच परंतु पांडुरंगाकडे धावा करणारी बस चालवणे हा वेगळाच आनंद देवून गेल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यानंतर बसेस आषाढी एकादशी निमित्त भाविक भक्तांना घेऊन पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या. नव्या कोऱ्या लालपरी मध्ये प्रवास करण्याची संधी आम्हाला मिळाली. पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविक भक्तांनी आनंद व्यक्त करत पंढरपुरच्या दिशेने बस ने धाव घेतली.
