जाणिवा जोपासत नाते जोडणारा साजेसा नवरात्रोत्सव ; दुर्गा झाल्या भावूक ; पन्नास दुर्गांना घडविले सप्तशृंगीचे दर्शन; सत्यानंद नवरात्र उत्सव मित्र मंडळाचा उपक्रम;
संगमनेर : भारत रेघाटे
नवरात्र उत्सवा निमित्त नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर लाखो अबाल वृध्द तसेच महिला भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्र हा स्त्रीशक्तीचा सन्मानाचा सण आहे. सप्तशृंगी गड महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. संगमनेर शहरातील कोष्टी गल्ली येथील सत्यानंद नवरात्र उत्सव मित्र मंडळाने नवरात्र उत्सवानिमित्त परिसरातील पन्नास महिला भगिनींना देवीचे दर्शन घडविले. त्याबदल महिलांनी त्यांचे आभार मानले.

सदर मित्र मंडळ दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा करत असतो. या नवरात्र उत्सव काळात महिलांसाठी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष व सत्यानंद नवरात्र उत्सव मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष विशाल ढोले, अध्यक्ष सत्यम जंत्रे, आकाश ढोले तसेच मंडळाच्या वतीने महिलांना सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची संकल्पना कृतीत उतरवली. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी देखील त्वरित 'आय लव संगमनेर' च्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

महिला आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्यांना यात्रा, देवदर्शन शक्य होत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सत्यानंद नवरात्र उत्सव मित्र मंडळाच्या वतीने महिलांना सप्तशृंगी गड वणी दर्शन घडविले. यात्रेदरम्यान, सर्व महिलांना नाश्ता, जेवण, मोफत रोपवे आदी व्यवस्था करण्यात आली होती. महिलांना मोफत देवदर्शन घडविल्याने महिलांसह परिसरातील नागरिकांनी सत्यानंद नवरात्र मित्र मंडळाचे कौतुक केले. सामाजिक जाणिवा जोपासत धार्मिक परंपरेशी नाते जोडणारा त्यांचा हा उपक्रम नवरात्र उत्सवाच्या खऱ्या भावनांना साजेसा ठरल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. यासाठी सत्यानंद नवरात्र मित्र मंडळातील पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

