हुश्श ! ठरली एकदाची प्रभाग रचना ; रणधुमाळीत झडणार आरोप प्रत्यारोपाच्या फैरी संगमनेर महिला प्रवर्गासाठी खुला, 65,714 लोकसंख्या 52,000 मतदार बजावणार आपला हक्क; कोण घेणार ताब्यात पालिका ? आमदार खताळांनी भगवा फडकाण्याचा केला दावा ; चर्चेत डॉ तांबे चे नाव आघाडीवर, दिवाळीनंतर राजकारणाचा फुटणार बॉम्ब
संगमनेर: भारत रेघाटे
तब्बल तीन वर्षाचा बराच मोठा कालावधी उलटून अखेर संगमनेर नगरपालिकेची प्रभाग रचना आणि नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून पालिकेचा कारभार हा प्रशासकीय अधिकारी चालवत असून आता निवडणुकीचे वेध लागल्याने खिळलेल्या नजरा उमेदवारांचेही डोळे उघड झाक करीत असून अखेर प्रभाग रचना ठरल्याने चौका चौकात केवळ राजकीय वर्तुळांचाच विषय रंगतदार बनत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गाव कट्टा, चहाची टपरी, जमेल तिथे आपापले घोळके एकत्र येत, कोणी भुवया उंचावून तर कोणी कान टवकारून चाललेली कुजबूज आपल्या मनात साठवत जनतेला कानोसा देत दिवाळीतील बॉम्ब फुटल्यागत चर्चेलाही चांगलेच उधान आणत असल्याचे चित्र संगमनेर शहरात जागोजगी दिसून येत आहे.
सर्वांनी श्री गणेशाला निरोप दिला. अन् पालिकेची प्रभाग रचना, आरक्षण अखेर जाहीर होताच कोजागरीच्या मुहूर्तावर निवडणुकीच्या चर्चेचा श्री गणेशाची सुरूवात झाली असून कोण जागे आहे ? कोण इच्छूक आहे ? यांचे आडाखे बांधण्यास आता चांगलीच सुरूवात झाल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे. गेली काही महिन्या पासून जय्यत तयारी सुरू केलेले अनेक शड्डू मैदानात उतरण्याच्या मानसिकतेत असले तरी नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अखेर प्रभाग रचना आणि आरक्षणावर शेवटी पडदा पडला. या निर्णयामुळे निपचीत पडलेले उमेदवार आता प्रभाग रचना जाहीर झाल्याने एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकण्यास तयारीला लागले असले तरी पुरूषी उमेदवाराची नगराध्यक्ष पदाची स्वप्नांची घोर निराशा झाल्याने नाराजी दिसून येत आहे.

मागील महिन्यातच पोळा झाला. आता वळू उधळतील अशी एक चर्चा दरम्यान रंगली होती. परंतु संगमनेर शहरात महिलांसाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांनी शांत बसणे उचित धरले असून आपल्या मर्जीतल्या महिलांचे समर्थन करताना आपापली ताकद आणि शकल लढवत आहेत.
अखेर निवडणुकीचा श्रीगणेशा जाहीर झाला असला तरी पालिकेने नागरिकांच्या हरकतींवर कठोर सुनावणी घेतल्यानंतर, अंतिम प्रभाग रचना तातडीने जाहीर केली आहे. या निर्णयामुळे शहरातील राजकारण चा़गलेच ढवळून निघत आहे हे मात्र तितकेच खरे ! संगमनेर शहरात एकूण 15 प्रभागासाठी 30 नगरसेवक रिंगणात उतरणार असून महिला खुल्या प्रवर्गातून नगराध्यक्षा पदासाठी त्या आपले भवितव्य अजमावणार आहेत.

मुख्याधिकारी पदाचा प्रभार सांभाळणारे सतीश दिघे यांनी ही रचना जाहीर करताच पालिका निवडणुकीच्या हालचालींच्या वेगाना आता चांगलीच गती घेतल्याचे दिसून येत असले तरी 33 हरकतींवर सुनावणी झाली असून यापैकी प्रभाग क्र. 2 मध्ये 17 आणि प्रभाग क्र. 9 मध्ये 5 हरकती होत्या. त्यात वरिष्ठ पातळीवर किरकोळ बदल केल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यावर काहींचा नाराजीचा सूर उमटलेला दिसून येतो.
'इच्छुकांची फिल्डिंग'.
इच्छूकांनी आपली कंबर चांगली कसली असून मतदार याद्याची पाहणी, संपर्क, युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहे. वास्तविक लोकसंख्या आणि मतदार यादीत जनसंख्येत तफावत असण्याची शक्यता असून सदर यादी अद्ययावत करून सादर करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
*अशी आहे प्रभाग रचना*
शहरात एकूण 15 प्रभाग 30 नगरसेवक, महिला नगराध्यक्षा असणार प्रभाग क्र. 13 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या (4904) आहेत तर सर्वात छोटा प्रभाग 2 हा आहे. 13 मध्ये घोडेकर मळा, साईनगर ,नगरपरिषद परिसर याच प्रभागात समाविष्ट आहे. हा प्रभाग निवडणुकी निकालात दावेदार' ठरू शकतो. प्रभाग क्र. 2 हा सर्वात कमी लोकसंख्या असून (3,968) आहेत. यामध्ये ऑरेंज कॉर्नर, राम नगर, पद्मानगरचा समावेश आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात आता एकूण दोन नगरसेवक ( एक पुरुष, एक महिला) असणार असल्याने, इच्छुकांना तडजोड करून युती करावी लागणार आहे.
प्रभाग एरिया लोकसंख्या
प्रभाग क्र. 1 ) श्रमिक नगर, गोविंद नगर, गणेश नगर, जनता नगर 4,136 प्रभाग क्र. 2) ऑरेंज कॉर्नर, कुंथुनाथ सोसायटी, सुयोग सोसायटी, राम नगर, पद्मनगर, सिध्दी विनायक सोसायटी 3,968 प्रभाग क्र. 3 ) श्रमपरिहार कॉलनी, आनंद नगर, स्वामी समर्थ नगर, मधुबन कॉलनी, पारिजात कॉलनी, भरत नगर, माऊली कृपा कॉलनी 4,117 प्रभाग क्र. 4 )शिवाजी नगर, रेंगे गार्डन परिसर, मेहेर मळा, जाणता राजा मैदान विद्या नगर, सौभाग्य मंगल कार्यालय 4,539 प्रभाग क्र. 5 ) जनतानगर, चैतन्यनगर, मार्केट यार्ड 4,169 प्रभाग क्र. 6 ) इंदिरानगर, सह्याद्री विद्यालय, सा. बां. विभाग शासकीय विश्रामगृह 4,124 प्रभाग क्र. 7 ) देवाचा मळा, सावता माळी नगर, बस स्थानक परिसर पंजाबी कॉलनी, वकील कॉलनी, अभंग मळा माळीवाडा, संजय गांधी नगर क्रीडा संकूल 4,720, प्रभाग क्र. 8 )अभिनव नगर, एम ई.सी बी. नवीन नगर रोड, लिंक रोड, ताजणे मळा, नवघर गल्ली, अरगडे गल्ली 4,433 प्रभाग क्र. 9 ) कुरण रोड, गुंजाळ आखाडा, पानसरे आखाडा, जुना बैल बाजार, ज्ञानमाता विद्यालय, गुंजाळ मळा, पंचायत समिती, पाबळे वस्ती, जब्बार मळा 4,299 प्रभाग क्र. 10 ) भारतनगर, रेहमतनगर, जम-जम कॉलनी, अलकानगर, काठे मळा, मौलाना आझाद मंगल कार्यालय, गलांडे मळा 4,128 प्रभाग क्र. 11 ) गवंडीपुरा कब्रस्तान, सय्यद बाबा चौक, देवी गल्ली, घास बाजार, उपासणी गल्ली, तेलीखुंट, लखमीपुरा 4, 568 प्रभाग क्र. 12 ) गांधी चौक, कोष्टी गल्ली, खंडोबा मंदिर अशोक चौक, मेन रोड, बाजार पेठ, पानसरे गल्ली, स्वामी विवेकानंद चौक, साईनाथ चौक, वडगल्ली, भागवत वाडा, कुंभार आळा, सैय्यदबाबा चौक काही भाग 4,549 प्रभाग क्र. 13 ) घोडेकर मळा, साईनगर, पंपिंग स्टेशन, चव्हाणपुरा, जेधे कॉलनी, पुर्नवसन कॉलनी स्वामी समर्थ मंदिर, साळीवाडा, नगरपरिषद 4,904 प्रभाग क्र. 14) रंगारगल्ली, जे. पी. रोड, चंद्रशेखर चौक, पेटिट विद्यालय, नेहरू चौक, वाडेकर गल्ली, परदेशपुरा, अँग्लो उर्दू हायस्कुल, जुने पीडब्लुडी कार्यालय, नायकवाडपुरा मस्जिद परिसर 4,753 प्रभाग क्र. 15) रुबी टॉवर, नाईकवाडपुरा, डाके मळा, जोर्वे रोड, यंग नॅशनल स्पोर्ट्स ग्राऊंड, दिल्ली नाका, लखीमपुरा, रहमत नगर, फादरवाडी 4,397 अशी असून आता प्रत्येक प्रभागातून जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. आता फक्त तारखेकडे लागले लक्ष केव्हा एकदाची तारीख निश्चित होईल याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीसाठी महायुती लागली कामाला ;
नगरपालिकेची निवडणूक महायुती पूर्ण ताकदीनिशी लढणार असून या निवडणुकीत नगराध्यक्षपद महिला प्रवर्गासाठी राखीव झाले असून, आ. अमोल खताळ यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, महायुतीकडून नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदांसाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे सर्वाना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. पालिकेवर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी महायुती सज्ज आहे. यावर लवकरच बैठका घेत उमेदवारा बाबत योग्य निर्णय घेतले जातील तसेच जनता विकासाबरोबर राहील याची खात्री असल्याचा दावा खताळ यांनी व्यक्त केला
उद्योगपतीच्या सौभाग्यवती उतरणार रणांगणात
या निवडणुकीत शहरातील प्रथितयश असलेल्या काही उद्योगपतीच्या 'सौभाग्यवती चे नाव समोर येत आहेत तर महायुतीकडून संभाव्य महिलां उमेदवारामध्ये ज्योती भोर, प्राजक्ता बागुल, स्मिता गुणे, गुंजन कर्पे,संगमनेर जिल्हा कृती समितीच्या अग्रणी असलेल्या महिला पत्रकार नीलिमा घाडगे आदिची नावे पुढे येत असल्याने राजकीय चर्चेला शहरात चांगलेच भरते आल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेस उमेदवार गुलदस्त्यात
एका तपा पेक्षा जास्त काळ नगराध्यक्षा म्हणून दुर्गा तांबे यांनी आपली एकहाती कारकीर्द गाजवत पालिका आपल्या ताब्यात ठेवली. या भिस्तीवरच अनेक विकास कामे त्यांनी केलीत. परंतु विधानसभेत पराभूत झालेले उमेदवार माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसची झालेली पिछाडी यासाठी थोरात आणि तांबे परिवारांनी छोट्या, मोठ्या सामाजिक, धार्मिक अशा अनेक कार्यक्रमातून तसेच जनतेच्या सुख दुःख आणि भेटी, गाठीतून चांगली ताकद लावण्याचे दिसून येत आहेत. या संपर्काच्या माध्यमातून एकविराच्या डॉ. जयश्री थोरात आणि डॉ. मैथिली तांबे या जनसंपर्कात असल्याने नगराध्यक्षा पदासाठी "आय लव्ह संगमनेर" म्हणत तांबे घराण्याच्या स्नुषा डॉ मैथिली तांबे, यांचे नाव अग्रक्रमाने पुढे येत असल्याची चर्चा संगमनेर शहरात जोर धरून आहे. 'आय लव्ह संगमनेरचा नारा देत डॉ. तांबे परिवारातील नगराध्यक्ष पदाचा दावेदार कोण असणार ? हे येणारा काळच ठरवेल !

थोरातांचे प्रयत्न सफल ठरतील ;
विविध कार्य, जनसंपर्क आणि लोक सहभागातून स्थानिक राजकारणात आपला दबदबा कायम ठेवून भविष्यातही पालिकेवर आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी डॉ. जयश्री थोरात यांचे प्रयत्न निश्चितच सफल ठरतील अशी चर्चा शहरात रंग धरताना दिसून येत आहे. तर घराणेशाहीवर नाराजीचा सूर दिसून येत असला तरी थोरात तांबे घराण्यांची जनसंपर्काची तसेच कार्याची भिस्त या निवडणुकीत नक्कीच प्रभावशाली ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ता. क. :- मतदार यादी तसेच प्रभाग रचना आरक्षण फायनल होण्याबाबत प्रांत कार्यालयात प्रभाग निहाय आरक्षण सोडत उद्या दिनांक 8 ऑक्टोबर रोजी होणार असल्याने याकडे सर्व शहरवासीयांबरोबर इच्छूक उमेदवार आणि मतदारांचेही चांगलेच लक्ष लागले आहे. शहरात 65,714 लोकसंख्या असून साधारण 52,714 एवढे मतदार असण्दियाची शक्यता आहे. दिळीतील फटाक्या बरोबर दिवाळीनंतर राजकारणाचेही धमाकेदार बॉम्ब धुमधडाक्यात फुटले जाणार आहेत.
