हेरगिरी ही राष्ट्ररक्षणाची प्रकाशरेखा : गुप्तचर संघटना राष्टाचे कवच :- ज्येष्ठ पत्रकार रवी आमले
संगमनेर :- ( प्रतिनिधी )
हेरगिरी म्हणजे केवळ गुप्त कामकाज , अथवा गुप्त माहिती गोळा करणे नसून ती समाजाच्या राज्यकारभाराच्या व राष्ट्रसंरक्षणाच्या सुरक्षेच्या रचनेसाठी आणि अदृश्यशक्ती आणि शत्रुचा अंदाज घेणाचा महत्त्वाचा घटक असून जगभरातील गुप्तचर संस्था त्यांच्या तंत्रज्ञानाने सज्ज असल्या तरी या हेरगिरीचा पाया आपल्या प्राचीन वेदांमध्ये पुराणांमध्ये आणि महाकाव्यामध्ये दिसून येतो असा ठोस संदेश ज्येष्ठ पत्रकार, संपादक, हेरगिरीचे अभ्यासक रवी आमले यांनी दिला.

संगमनेर येथे कवी अनंत फंदी व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पप्रसंगी त्यांनी "हेरगिरीचा बदलता चेहरा” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन करत प्रेक्षकांना भुरळ घातली. कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानी मधुसूदन नावंदर, उपाध्यक्ष रूपाली मेहेर, राजेंद्र भंडारी, अरुण ताजणे, पद्मभूषण देशपांडे, सुनील चांडक आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री आमले म्हणाले प्राचीन वेदांपासून आधुनिक ‘रॉ’ पर्यंत हेरगिरीचा प्रवास सांगताना आमले म्हणाले, आज इस्रायलचा मोसाद, भारताचा रॉ, आणि अमेरिकेचा सीआयए या संस्था जागतिक राजकारणाला दिशा देतात. पण त्याचे बीज आपल्या वेद, पुराण आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रात रुजलेलं आहे. वरुण देव यांना वेदांमध्ये आद्य हेर म्हटले गेलंय हेच आपलं बौद्धिक वारसंपण होय. वाल्मिकी रामायणातील हनुमान, अंगद, जांबुवंत, बीभिषण, तर महाभारतातील विदूर, कृष्णा बालसवंगडी ही सर्व हेरगिरीच्या धर्मयुक्त परंपरेची उदाहरणं आहेत. कौटिल्याचा अर्थशास्त्र तर हेरगिरीचा ग्रंथराज आहे. भाषा विश्लेषक, वाकिया, हारकारे ,,व्यापारी, आणि गृहीतकारक या प्रकारच्या हेरांनी राज्यकारभाराचा पाया मजबूत ठेवला असेही आमले यांनी खास नमूद केलय.
संगमनेरच्या रायतेवाडीत शिवाजी महाराजांची शेवटची लढाई :-
शिवरायांच्या स्वराज्यातील बुद्धीची तलवार म्हणजे बहिरजी नाईकांची छाप. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हेरगिरीचं जाळे सर्वदूर पहले होते. बहिरजी नाईकांसारख्या हेरांनी औरंगजेबासारख्या धूर्त शत्रूला बुद्धीने पराभूत केलं. शिवाजी महाराजांची शेवटची लढाई संगमनेरच्या रायतेवाडीत झाली, त्या परिसरात आजही गुप्त संवादांच्या पाऊलखुणा सापडतात असा ऐतिहासिक संदर्भ आमले यांनी दिला.
ब्रिटिशकालीन ‘आयबी’ ते आधुनिक ‘रॉ’ भारतीय गुप्तशक्तीचा विकास
ब्रिटिश काळात स्थापन झालेली इंटेलिजन्स ब्युरो ही भारतातील पहिली अधिकृत गुप्त संस्था. स्वातंत्र्यानंतर 1968 मध्ये रिसर्च अँड अॅनालिसिस विंग "रॉ"ची स्थापना झाली. पहिले प्रमुख आर. एन. काव यांनी 1971 च्या बांगलादेश युद्धात गुप्तनीतीने इतिहास घडवला. हेरगिरी म्हणजे तलवारीची नाही, तर विचारांची लढाई, असं आमले ठामपणे म्हणाले.
सायबरयुगातील हेरगिरी आता माहिती तंत्र ज्ञानाचे रणांगण हे आपल्या समोर उभे ठाकले आहे. आजचं युद्ध बंदुकीचं नाही ते डेटा आणि विश्लेषणाचं युद्ध आहे .एक फोटो, एक मेसेज, एक ट्वीट हे सगळं कोणासाठी तरी माहितीचं हत्यार ठरतं, असं त्यांनी इशारा दिला.
इस्रायलचा मोसाद, पाकिस्तानचा आय एस आय आणि भारताचा रॉ या संस्थांनी आता डिजिटल मानसशास्त्र, सायबर ट्रॅकिंग आणि सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून हेरगिरीचं नवं रूप घेतलं आहे. ओपरेशन सिंदूर ते अजीत डोभाल बुद्धीची परंपरा जिवंत! ओपरेशन सिंदूरपासून ते अजीत डोभाल यांच्या सर्जिकल स्ट्राईकपर्यंत, भारताच्या हेरगिरी व्यवस्थेने दाखवलेली संयम आणि बुद्धिमत्ता ही जगात उदाहरण ठरली आहे. आमले म्हणाले, मोरारजी देसाई यांचा संवाद असो वा अजीत डोभाल यांची रणनीती ही सर्व विचारांनी जिंकण्याची’ परंपरा आहे. हेरगिरी ही सजगता असून राष्ट्राचं कवच आहे.
हेरगिरी ही काही काळापुरती खेळी नाही, ती राष्ट्ररक्षणाचं शास्त्र आहे. आज प्रत्येक देशाची सुरक्षा माहितीच्या सामर्थ्यावर उभी आहे. हेरगिरी म्हणजे अंधारातली नजर ज्याला दिसतं, तेच राष्ट्र पुढे नेतं,असं म्हणत आमले यांनी उपस्थितांना विचार करायला भाग पाडलं. डॉ. ओमप्रकाश सिकची यांनी मितभाषी आणि विनोदी शैलीत सूत्रसंचलन केले.
