गर्ल्स क्लायमेट पार्लमेंट बनली ग्रामीण मुलींचा आवाज! मॅनिफेस्टोचा दस्तऐवजच केला सादर
जळगाव : भारत रेघाटे
ग्रामीण भागातील मुलींचा आवाज, वातावरण बदल व स्थानिक शासन प्रक्रियेत पोहोचवण्यासाठी सदरचे व्यासपीठ महत्त्वपूर्ण असून त्यांच्या मागण्या ह्या आशेचा किरण आणि बदलाचा दस्तऐवजच बनत असून ग्रामीण मुलींच्या जीवनात अमुलाग्र बद्दल करेल असा विश्वास इंदिरा पाटील यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, ग्रामीण भागातील मुलींचा दृष्टिकोन बदलणे फार गरजेचे आहे. समाजात बदल अथवा सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे संयुक्तिक ठरणार असल्याचे प्रतिपादन इंदिरा पाटील यांनी केले.

प्लॅन इंटरनॅशनलच्या युथ लीडरशिप अकॅडमी च्या जेंडर अँड क्लायमेट ॲक्शन फेलोशिप अंतर्गत, युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया (YOGI) यांच्या सहकार्याने गर्ल्स क्लायमेट पार्लमेंट हा उपक्रम जळगाव जिल्ह्यात गेल्या ८ महिन्यांपासून राबवला जात होता त्याप्रसंगी पाटील बोलत होत्या. पाटील पुढे म्हणाल्या की, खरं तर गर्ल्स क्लायमेट पार्लमेंट ही एक चळवळ असून या ऊर्जास्त्रोत बनलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तत्वज्ञान आणि शैली व्यक्त करता येते. यातूनच ग्रामीण भागाच्या मुलींना त्यांच्या यथास्थितीला आव्हाने मिळतात. या आव्हानामुळेच ग्रामीण भागाच्या मुलींचा रुरल व्हॉइस हा त्यांच्या भविष्याची नांदी ठरेल.

सादर केलेल्या प्रक्रियेत नीलकंठेश्वर हायस्कूल, चावलखेडा आणि परिसरातील धरणगाव तालुक्यातील पिंपळेसीम, वाघळूद बुद्रुक व खुर्द, सतखेडा, हनुमंतखेडा, पिंपरी या गावांतील ग्रामीण तसेच वंचित पार्श्वभूमीतील मुली सहभागी होत्या.
आठ महिन्यांच्या प्रवासात, स्थानिक पर्यावरणीय प्रश्नांना समजून घेणे त्यासाठी आपली मते ठामपणे मांडण्याकरिता, मुलींनी कार्यशाळा, फील्ड व्हिजिट्स, मुलाखती, नकाशे व अनुभव कथनाच्या माध्यमातून त्यांच्या गावांतील पाणी, कचरा, आरोग्य, शिक्षण, सुरक्षितता आणि संबंधित समस्या समजून घेतल्या विशेषकरून त्यावर उपाययोजनाही ठरवल्या. या सर्वांचा परिपाक म्हणून त्यांनी सामूहिकपणे तयार केलेला गर्ल्स क्लायमेट मॅनिफेस्टो हा दस्तऐवज या संसदीय सत्राच्या माध्यमातून सादर करण्यात आला.

ह्या उपक्रमाचा हा समारोपीय कार्यक्रम २० सप्टेंबर रोजी एम. जे. कॉलेजच्या न्यू कॉन्फरन्स सभागृहात संपन्न झाला. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्या व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका इंदिरा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, माजी नगरसेविका जळगाव मनपा ॲड. शुचिता हाडा, कल्याणे गावाच्या माजी सरपंच कल्पिता पाटील, आरोग्य तज्ज्ञ डॉ. सृष्टी जैन, रेडक्रॉस सोसायटी जळगावचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी आदि मान्यवर म्हणून उपस्थित होते.
मुलींनी संसदेच्या स्वरूपात आपले अनुभव मांडले, समस्या अधोरेखित केल्या आणि ठोस मागण्या केल्या. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवेतील सुधारणा, दर्जेदार शिक्षण व मुलींसाठी उच्च शिक्षणाच्या संधी, चांगले रस्ते व पूल, दारू दुकानं बंद करणे, महिलांचा ग्रामसभेत सहभाग, आणि पर्यावरण संवर्धन या मागण्या मॅनिफेस्टोतून मांडण्यात आल्या. मान्यवरांनी या मुलींच्या धाडसाचे कौतुक केले व त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

कार्यक्रमादरम्यान सहभागी गावांतील आशा वर्कर्स व अंगणवाडी ताई यांचा विशेष सन्मान करून त्यांच्या आरोग्य, पोषण व जनजागृती क्षेत्रातील अथक कार्याचा गौरव करण्यात आला. या उपक्रमाने दाखवून दिले की ग्रामीण मुलींचा सामूहिक आवाज हा हवामान न्याय आणि स्थानिक शासन प्रक्रियेत एक महत्त्वाचा घटक ठरू शकतो, याचीच दखल घेऊन पुढील महिन्यात याबाबत सादरीकरण करण्यासाठी प्रकल्पाचे संकल्पक गिरीश पाटील यांना इंडोनेशिया येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलावले आहे.
संसदेच्या सभापती म्हणून अमरावती येथील तनया अलका गोपाल यांनी सूत्रसंचालक मौरवी गोविंदवार यांनी भूमिका पार पाडली. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विजय लोहार, प्रा.सुशील भालेराव, प्रणिल चौधरी, रेवार्थ गोविंदवार, आर्यन पाटील, अमित मोहिते, खुशी पाटील आदिंचे मोलाचे योगदान लाभले.
