ब्रेकिंग न्यूज :
भारत

डिलिव्हरी बॉय करतात सिलेंडरसाठी अवाजवी मागणी ?

Blog Image
एकूण दृश्ये: 243

डिलिव्हरी बॉय सिलेंडरसाठी करतात अवाजवी पैशाची मागणी ? ग्राहकांच्या अनभिज्ञतेने ग्राहकच गॅसवर ; महिला म्हणतात जादा पैसे देऊनही सेवेस विलंब ; ग्राहक देवो भव नव्हे , ग्राहक दे भव:

     संगमनेर { भारत रेघाटे }

घरगुती वापरामध्ये खूप मोलाची भूमिका निभवणाऱ्या आणि गृहिणीचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या गॅस सिलेंडर बाबत नेहमीच ओरड सुरू असते. कधी सिलेंडरची दरवाढ, तर कधी तुटवडा भासणे, तर कधी सिलेंडर वेळेत पूर्तता होत नसल्याने गॅसमुळे घरात नेहमीच भडका होत असतो. तर दुसरीकडे डिलिव्हरी करणाऱ्या मुलांकडूनच अवाजवी पैशाची मागणी केली जात असल्याची ओरड वाढल्याने संगमनेर शहर आणि उपनगरात गॅसचा चांगलाच भडका उडाल्याचे दिसून येत आहे. एकूणच याप्रकरणाने संगमनेर शहरासह तालुक्यातील अनेक घरे मात्र गॅसवर बसल्याचे दिसून येत आहे.

         प्रामुख्याने हिंदुस्तान, भारत, रिलायन्स, इंडियन आदि पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या माध्यमातून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरची पूर्तता केल्या जाते.

          संगमनेर शहरासह तालुक्यात तब्बल १२ ते १५ ठिकाणच्या एजन्सी मार्फत गॅस सिलेंडरची पूर्तता केली जाते. त्यामध्ये सुनील दिवेकर, निलेश जाजू, मधुसूदन नावंदर, प्रवीण दिड्डी सह नवले यांची माऊली एजन्सी तर समनापुर येथे आहेरराव यांची कल्पना एजन्सी ,कळस येथे बोराडे यांची एजन्सी तर इंण्डेन गॅस एजन्सी सूर्यवंशी अशा अनेक एजन्सी आहेत. या मार्फत घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरची पूर्तता केल्या जाते. 

           घरगुती सिलेंडरचा वापर हा व्यावसायिक कारणासाठी मोठ्या प्रमाणात करताना आढळून येत आहे. "एक ना दोन हाक ना बोंब" अशी अवस्था असून यावर मात्र कोणाचाही अंकुश, धाक अथवा वचक राहिलेला दिसून येत नाही. उज्ज्वला गॅस हा महिलेच्या नावावर असल्याने त्यांना 300 रुपये सबसिडी दिल्या जाते.

ग्राहकाकडून ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर सर्विस देणारे मुले सदर सिलेंडर बिलासह ग्राहकाला देत असतात. परंतु नागरिकांची बिलविषयी अनभिज्ञता असल्याने ग्राहक स्वतःहून मुलांनी मागितलेले पैसे त्यांच्या हातात टेकवतात. याबाबत सेवा पुरवणाऱ्या मुलांकडून अनेकदा ४० ते ५० रूपयाची अवाजवी मागणी केली जात असल्याचे काही महिलांचे म्हणणे आहे.

----- Advertisements -----

    सिलेंडरचा दर ८५६ रुपये असून ९०० रूपया पर्यंत सिलिंडर दिल्या जात असल्याचे परिसरात बोलले जाते. काहीं महिलांचे म्हणणे आहे की, दहा ते पंधरा रूपये देण्याबाबत हरकत नाही. तर काही महिला म्हणतात की, अवाजवी एक रुपया का म्हणून द्यायचा ? कशासाठी द्यायचा ? याबाबत ग्राहक मंचाकडे तक्रार करू असा पवित्राच काही महिलांनी घेतल्याचे दिसून येत आहे. 

शहर आणि उपनगरात अवाजवी पैसे देऊनही सिलेंडरची वेळेवर पूर्तता होत नसल्याच्या काही महिलां मंडळीच्या तक्रारी आहेत. परंतु तक्रार कुठे ,कशी करावी, एजन्सी मध्ये कोणाला भेटावे ? याबाबत मात्र महिलांमध्ये अनभिज्ञता असल्याने गेली काही दिवसापासून हा विषय तसाच भिजत घोंगड्या सारखा खितपत पडलेला दिसून येत आहे. तर घरपोच सेवा देणाऱ्या मुलांकडून सिलेंडरसाठी मात्र अवाजवी पैसे आकारणी केल्या जात आहे. एकूणच नागरिकांमध्ये अनभिज्ञता असल्यामुळे डिलिव्हरी बॉयचे चांगले फावले जाते हे तितकेच खरे. काही महिलांनी सांगितले की, सर्विस वेळेवर द्यावी या हेतूने  डिलिव्हरी बॉयला आम्ही वीस ,तीस रुपये अतिरिक्त देतो. याचा गैरफायदा अनेक मुले घेताना दिसून येत असल्याचे म्हणणे आहे. ८५६ रुपये सिलेंडरसाठी ग्राहकच अवाजवी वीस, तीस, ते पन्नास रुपयांपर्यंत डिलिव्हरी बॉयला पैसे देत असल्याने संगमनेरात मात्र  चांगलाच गॅसचा भडका उडाल्याचे दिसून येत आहे. 

         प्रतिक्रिया 

▪️याबाबत दिवेकर गॅसचे प्रमुख सुनील दिवेकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, बुकिंगचे जेवढे पैसे आहेत तेवढेच पैसे घेतले जातात. डिलिव्हरी बॉयला अवाजवी पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु ग्राहकच असे का करतात ? त्यात एजन्सीचा काय व्दोष ? आमच्याकडे डिलिव्हरी करणाऱ्यास टाकीवर पैसे आकारणी करून सेवा दिली जाते. तसेच कर्मचाऱ्यांना सोयी, सुविधाही दिल्या जात असल्याचे दिवेकर यांनी सांगितले.

▪️ संजय भळगट म्हणाले की, मुलांना थोडेफार पैसे दिल्याने सर्विस चांगली देतात हा अनुभव आहे. त्यांना वीस, तीस रुपये दिले नाही तर गॅस वायसर काढल्या जाते, डिलिव्हरी नीट दिल्या जात नाही, तसेच सिलेंडर लिकेज् केला जावू शकतो, एवढेच नव्हेतर गॅसही काढला जात नसेल कशावरून त्यापेक्षा प्रेमाने -वीस तीस रुपये सर्विससाठी दिले जातात. 

▪️एक प्रतिक्रिया नाव न घेण्याच्या अटीवर आली ते गृहस्थ म्हणतात, सदर मुलांना दहा, बारा, पंधरा हजारापर्यंत पगार दिल्या जातो. तर काहींना टाकीवर पंधरा-वीस रुपये एजन्सी मार्फत दिल्या जाते आणि नागरिकही त्यांना सेवेसाठी 40-50 रुपये देतात दिवसभरात एजन्सीचे कर्मचारी कमीत कमी 20 ते 30 सिलेंडर टाकतात दिवसाला हजार ते दीड हजार रुपये कमवतात. एखादा ग्राहक त्यांच्या विषयी प्रतिक्रिया देत असेल तर सेवा देण्यामध्ये कुचराई करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

----- Advertisements -----

▪️शहर, उपनगर, मेनरोड, घोडेकर मळा, राहणे मळा, बाजारपेठ आदि भगातील काही महिला तसेच काही पुरूष सांगतात की, ९०० रुपये देऊन तसेच फोन करूनही वेळेवर सर्विस दिल्या जात नाही. ९०० रूपये देवूनही दुसऱ्या मजल्यावर सिलेंडर पोहोच करत नाही. केवळ सिलेंडर पोच करण्याचे चार्जेस आम्ही घेतो असे डिलिव्हरी बॉय सांगतात. सिलेंडरसाठी ९०० रुपये मागणी करताना दिसून येतात. ज्या ग्राहकांनी हुजत घातली त्यांना सिलेंडर सेवा नीट दिल्या जात नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे.

 ▪️दिड्डी अँड सन्स चे प्रवीण दिड्डी म्हणाले की, सिलेंडरच्या दरा व्यतिरिक्त ग्राहकांनी जादा पैसे देऊ नये, अथवा वितरण करणाऱ्या मुलांनी घेऊ नयेत. गॅसटाकी सिलेंडर हा ३५ किलो वजनाचा होतो. सेवा देणाऱी मुले आणि ग्राहक यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध जपत टीप देण्याचा प्रकार हा स्वेच्छेचा आहे. सेवा पुरवणाऱ्या मुलांनी पैशाची मागणी करू नये असे प्रवीण दिड्डी म्हणाले. 

▪️मे लक्ष्मी कमल गॅस एजन्सी चे मधुसूदन नावंदर म्हणाले की आम्ही कामगारांना 12,000 च्या वर पगार देतो विमा असतो. ड्रेस कोड, सोबत वजन काटा, तसेच दिवाळी बोनसही देतो. ग्राहकाची अडवणूक करणाऱ्या डिलिव्हरी बॉयची आम्ही रवाणगी केलेली आहे. उपभोक्त्यांनी काही समस्या असल्यास डिस्ट्रीब्यूटरकडे तक्रार करावी. ग्राहकाचे प्रश्न सोडवू असे नावंदर म्हणाले. पीडीएस "सार्वजनिक वितरण व्यवस्था" ही पारदर्शकतेने चालत असते. नागरिकांचे अनेक समजगैरसमज आहेत. त्यांनी ह्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे.  अकोले आणि संगमनेर तालुक्यात तब्बल सव्वा लाख पेक्षा जास्त उपभोक्ता असून ४० टक्के लोक ऑनलाइन बुकिंग करत आहेत असे नावंदर यांनी सांगितले.

▪️मे एस. एच. जाजू कार्यालयीन कर्मचारी संतोष कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, स्व:खुशीने ग्राहक पैसे देतात. काही ग्राहक एक रुपयाही देत नाही. परंतु तक्रार आलेल्याचे पैसे आम्ही परत केल्याचे त्यांनी सांगितले . 

▪️संजय क्षत्रिय म्हणाले की, एजन्सी मालकांनी गॅस टाकी देणाऱ्या मुलांना अधिकृत बिलाच्या व्यतिरिक्त नेमके किती रुपये द्यायचे ? आज-काल टाकी आणणारे मुले ५० रु. बेकायदेशीर वाढीव रक्कम मागू लागल्याने अनेक गृहिणींची तक्रार आहे. गॅसच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणी मात्र चांगल्याच तापल्या असून घरपोच सिलेंडर देणारे मुले अडवणूक करून ४० ते ५० रुपये मागत आहेत. यावर एजन्सी मार्फतच ग्राहकांना माहिती दिली पाहिजे. तसेच दराबाबत ग्राहक अनभिज्ञ असतात याबाबत एजन्सीने खुलासा करावा असे संजय क्षत्रिय म्हणाले.

----- Advertisements -----

▪️महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर राक्षे म्हणाले की,डिलिव्हरी बॉय ला अतिरिक्त पैसे घेण्याचे अधिकार नाही. घरपोच सेवा देण्याची जबाबदारी एजन्सीची आहे. याबाबत ग्राहक दिनानिमित्त आपण सातत्याने जनजागृती करत असतो. तसेच तहसीलदारांना वेळोवेळी निवेदनही दिले आहे.

▪️ एका सदगृहस्थाने आपणास येत असलेल अनुभव कथन केला. सिलेंडर बुकिंग न करता ग्राहकाचा सिलेंडर बुक होतो  तशा प्रकारचा ग्राहकाला मेसेज जातो. त्यानंतर काही कालावधीतच ग्राहकाला पुन्हा मेसेज जातो. तुमचा बुकिंग कोड आणि ओटीपी असा असा आहे. त्यानंतर काही वेळात मेसेज येतो की तुमचा सिलेंडर डिलीवर झाला. परंतु ग्राहकाला तो सिलेंडर मिळालेलाच नसतो असे अनुभव संगमनेर मधील अनेक ग्राहकांना आलेले असून नेमके काय गौड बंगाल आहे असा प्रश्न ग्राहकांना सध्या पडलेला आहे.

परिस्थिती हीच आपल्या आयुष्याची खरी परीक्षा असते.

संत तुकाराम