डी. जे. च्या तीव्रतेला नागरिक व्यापाऱ्यांनी केला तीव्र विरोध ; मेन रोडवर वाजू देणार नाही डीजे ; अधिकाऱ्यांना धरणार जबाबदार !
संगमनेर ; भारत रेघाटे
श्री गणेशाचे आगमन मोठ्या भक्तीभावाने श्रद्धेसह ढोल ताशाच्या गजरात आणि डीजेच्या कर्णकर्कश असह्य अशा आवाजात आगमन झाले खरे. परंतु , डी जे चा दणदणीत कर्णकर्कश असा आवाजच नागरिक आणि व्यापारी वर्गाला सहन न झाल्याने व्यापारी वर्गासह येथील स्थानिक जनतेने डीजे तीव्रतेच्या विरोधात आपल्या तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या. जन माणसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तर डी जे वाजविण्यास प्रतिबंध आणावा असा आक्रोशच निर्माण केला होता. याबाबत संगमनेर शहरातील मेनरोड परिसरातील व्यापारी वर्ग आणि नागरिकांनी कर्णकर्कश आवाजातील डी.जे. वाजविण्यास बंदी घालावी अशी मागणी करत प्रांताधिकारी अरूण उंडे यांना निवेदन देत डीजे वाजविण्यास बंदी करण्याची मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोणताही सण, उत्सव, वाढदिवस अथवा मिरवणुकी दरम्यान मेनरोडवर डी.जे. वाजवला जातो. यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. आऊट ऑफ डेसिबल आवाजामुळे कंपन निर्माण होऊन घरातील भांडी, वस्तू खाली पडतात, तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना या आवाजाचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
यापूर्वी शांतता कमिटीच्या बैठकीत श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी कुठेही डी.जे. वाजल्यास तात्काळ जप्त करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, स्थानिक प्रशासनाने या आदेशांकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोपच निवेदनकर्त्यांनी केला आहे.
यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, व्यापारी योगेश काजळे, गोटू अट्टल, सी ए जितेंद्र लाहोटी, अतुल कासटसह शंभरापेक्षा अधिक व्यापारी आणि नागरिकांनी स्वाक्षरी करीत याबाबत आता स्पष्ट भूमिका घेत डीजे वाजविण्यास प्रतिबंध करण्यात यावा असा इशाराच देण्यात आहे. यापुढे मेन रोडवर डी.जे. वाजिवण्यास परवानगी दिली तर न्याययालयाचा अवमान करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात धाव घेवू असेही निवेदनकर्त्यांनी म्हणणे मांडले. सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार अमोल खताळ पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे, डी.वाय. एस.पी डॉ. कुणाल सोनवणे, यांना पाठविण्यात आली आहे.
