चंदनापुरीतील १४ जणांना ६ महिन्याचा कारावास ; १० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मिळाला न्याय,
संगमनेर ( प्रतिनिधी )
तालुक्यातील चंदनापुरी येथे ग्रामपंचायतीच्या जागेत पत्र्याचे शेड बांधल्याने गावातील १४ विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी ८ मार्च २०१५ रोजी चंदनापुरी येथील रहिवासी असलेले दीपक रंगनाथ राहाणे यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याची घटना घडली होती. दीपक रंगनाथ राहाणे यांना गावातील मारुती मंदिरा समोरील शिसवाच्या झाडाला बांधून मारहाण केली होती.

दरम्यान तब्बल १० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या प्रकरणातील आरोपी सोमनाथ राजाराम राहाणे ४५ शांताराम शिवनाथ राहाणे ५५ बाळासाहेब राजाराम राहाणे ४५ निवृत्ती राजाराम राहाणे ५५ जिजाबा राधु राहाणे ६० भास्कर राधु राहाणे (मयत), अनिल भास्कर राहाणे ३५ अरुण निवृत्ती राहाणे ३२ राजाराम पंढरीनाथ राहाणे ८० गणेश उर्फ गणपत सोमनाथ राहाणे २५ सतिष सोमनाथ राहाणे २७ कैलास बबन राहाणे ३० संजय निवृत्ती राहाणे २९ विजय निवृत्ती राहाणे २८ अशा एकूण १४ जणांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी संगमनेर न्यायालायात द्रव्य दंडासह ६ महिने कारावासाची एकत्रित शिक्षा सुनावली आहे.
याबाबत माहिती अशी आहे की, चंदनापुरी येथील दीपक रंगनाथ राहाणे यांनी दि. ८ मार्च २०१५ रोजी संगमनेर तालुका पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादित म्हटले आहे की, चंदनापुरी ग्रामपंचायत मालकीच्या जागेत २५ ते ३० वर्षांपसून पत्र्याचे शेड होते. दरम्यान वरील सर्व आरोपींनी सदर शेड तोडून नुकसान केले. यानंतर सदर प्रकरणी वरील सर्व आरोपींविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गु.र.नं. ४२\२०१५ भा.द.वी. कलम १४३, १४७, १४९, ३४२, ३२३, ५०४, ५०६, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला असता, न्यायालयाने वरील सर्व आरोपींना दोषी ठरवत द्रव्य दंडासह एकत्रित ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा तपास संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे तत्कालीन तपासी अंमलदार जयसिंग आव्हाड यांनी केला.
या तपासात सरकारी वकील ऍड. श्रीमती एम.ए. पवार यांनी कामकाज बघुन, तपास पुराव्यानिशी न्यायालया समोर सबळ पुरावे सादर केले. सदर पुराव्याच्या आधारावर न्यायाधीश जी.व.भेंडे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद समजावून घेत न्याय दिला. तसेच या तपासात ऍड. श्रीमती एम.ए. पवार यांनी महत्वाची भुमिका बजावली आहे.

