४४, ५८४ चा गुटखा ,पान मसाल्याचा साठा जप्त, आरोपी अटक
संगमनेर प्रतिनिधी
शहरात पोलिसांनी सुगंधित गुटखा आणि पान मसाल्याची अवैध विक्री आणि साठवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून गुटखा पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे. संगमनेर खुर्द येथील आरोपी आहद रऊफ शेख वय ३५, ध याच्या राहत्या घरातून ४४, ५८४/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शहर पोलीस संतोष बाचकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या कलम २६ (२) (४) (५) (इ) अंतर्गत गुन्हा करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आहद रऊफ शेख याने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधी गुटखा आणि पान मसाला स्वतःच्या ताब्यात विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवला होता. कारवाई दरम्यान पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ३३९८४/- रुपये किमतीचे 'केसरयुक्त हिरा पान मसाला' नावाचे १७७ प्लास्टिक पाऊच, ५७६०/- रुपये किमतीची 'हिरा पान मसाला रॉयल ७१७ तंबाखू, ४३५६/-रुपये किमतीचे 'केसरयुक्त विमल पान मसाला' नावाचे २२ पाऊच, ४८४/- रुपये किमतीची 'विमल पान मसाला तंबाखू नावाचे २२ पाऊच असा एकूण ४४५८४/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल करीत आहे.

