बनावट सीआयडी ने ज्येष्ठाला लुटले : 65 हजाराची चैन केली लंपास; दुसऱ्या घटनेत एकाचे एटीएम मधून 35, 100 उडविले
संगमनेर ( प्रतिनिधी )
सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक यास सीआयडी असल्याचे भासवून तीन अज्ञातांनी 65 हजाराची सोन्याची चैन लंपास केल्याची घटना चंदनापुरी जवळील एका धब्यावर घडल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेवरून स्पष्ट होत आहे तर दुसऱ्या घटनेत एका नागरिकाचे एटीएम ओले असल्याचे सांगत पस्तीस हजार शंभर रुपये ची लूट केल्याचा प्रकार संगमनेर येथील जाणता राजा मैदानाजवळ एका बँकेसमोर घडला. पहिल्या घटनेमध्ये घडलेला प्रकार असा की आताच आम्ही सात लाखाची चोरी पकडली असून तुमच्यावर आमचा संशय आहे असे सांगत सेवानिवृत्त एका ज्येष्ठ नागरिकास आम्ही सीआयडी अधिकारी आहोत असे सांगून या भामट्यानी सदर व्यक्तीकडून 65 हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन लंपास करत तोबारा केला. हा प्रकार तालुका हद्दीत पुणे महामार्गावर 14 जून 2025 सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेत केशव नाथा गोसावी (वय 69 ) सेवानिवृत्त सावित्रीबाई फुले बटवाल मळा संगमनेर हे काही कार्यक्रमा निमित्त चंदनापुरी येथील एका धाब्याजवळ आले असता मोटरसायकल अनोळखी व्यक्तीने थांबवले. त्यांना मोटरसायकलची डीकी उघडून दाखवण्यास सांगितले. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढण्यासाठी सांगितले. सोने गळ्यात घालून जायचे नाही असे ते म्हणाले. घाबरलेल्या गोसावी यांनी खिशातून रुमाल काढला. यावेळी आरोपींनी त्यांच्या खिशातील तंबाखूची पुडी पाकीट आणि सोन्याची चैन रुमालात बांधली. यानंतर आरोपीने रुमानातील वस्तू डिकीत ठेवण्यास सांगितले. गोसावी यांचे लक्ष विचलित करून सोन्याची चैन चोरून नेली. आरोपीने गोसावी यांना येथे थांबू नका असे सांगून ते संगमनेर कडे निघून गेले. त्याने डीक्कीतील रुमाल उघडला असता त्यात इतर वस्तू होत्या . परंतु सोन्याची चैन त्यामध्ये आढळून आली नाही. तोतया सीआयडी ने आपणास फसवले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गोसावी यांनी घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तीन अज्ञाताच्या विरोधात भारतीय न्याय सहिता कलम 303 (2) (3)(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी घटनास्थळी भेट दिली तर पोलीस आशिष अरवाडे पुढील तपास करीत आहे.

दुसऱ्या घटनेत एका अज्ञानताने एटिम मधून 35,100 रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानाजवळील युनियन बँकेसमोर घडला. एटीएम मधून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असताना आपले एटीएम ओले झालेले असून पैसे निघत नाही. पुसून देतो. असे सांगत सदर व्यक्ती एटीएम मधून बाहेर गेल्यावर कार्ड चा गैरवापर करत 35 हजार 100 रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी एका अज्ञाताच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 318 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजी देवीचंद साबळे (वय 48) रहिमपूर यांनी फिर्याद दिली. सदर घटना 18 जून सकाळी दहाच्या सुमारास जाणता राजा मैदान युनियन बँक शेजारी घडली. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. तर पोलिस वायकर यांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस टोपे पुढील तपास करीत आहेत.
