हिवरगाव पावसा मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ३० वर्षीय महिला गंभीर! प्रवरानगरात कुत्रा फाडला बिबट्याची दहशत
संगमनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील शेतातून घरी परतणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेला बिबट्याने अचानक लक्ष्य केले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून, परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जखमीचे नाव अर्चना संदीप टेमगिरे (वय ३०, रा. हिवरगाव पावसा) असे असून, त्या शनिवार दि १ ला सायंकाळी शेतकाम आटोपून घरी परतत असताना बिबट्याने अचानक झडप घालून हल्ला केला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिला तातडीने शहरातील एका डॉक्टर प्रदीप कुटे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

गेल्या काही दिवसांत संगमनेर तालुक्यात बिबट्यांचा संचार झपाट्याने वाढला असून, अनेक गावांमध्ये दिवसा ढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासन आणि वन खात्याने वेळीच योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, नीलम खताळ यांनी रुग्णालयात धाव घेत जखमी महिलेचे विचारपूस करून महिलेला आणि नातेवाईकांना धीर दिला.

लोणी प्रवरानगर परिसरात बिबट्याने चांगलीच दहशत माजवली असून मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गावात प्रवेश करून एका शेतकऱ्याच्या अंगणातील कुत्र्याला उचलून नेले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

थेटे वस्तीवर मध्यरात्री बिबट्याने कुत्र्याला उचलून नेल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले. राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील कारखान्यालगतच्या थेटे वस्तीवर पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे. गट क्रमांक १९५ मध्ये असलेल्या गणेश रवींद्र थेटे यांच्या फार्म हाऊस समोरून बिबट्याने पाळीव कुत्र्याला उचलून नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. स्थानिक शेतकरी रवींद्र थेटे, गणेश गरगडे, परसराम थेटे, संदेश थेटे, प्रवीण गरगडे, अमोल थेटे, मनोज थेटे, योगेश थेटे, केशव थेटे, मंजाबापू थेटे आदींनी सांगितले की, बिबट्याचे हालचाली गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामस्थांनी वनविभागाकडे तत्काळ पिंजरा बसविण्याची मागणी केली आहे. रात्रीच्या वेळी शेतकरी आणि महिला वर्गात भीतीचे सावट पसरले असून, लोक रात्री शेतात जाणे टाळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचे हालचाली सुरू असल्याने वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे.

