ब्रेकिंग न्यूज :
भारत

बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत ; जवळे कडलगमध्ये दहशत: बिबट्यांना पकडा ग्रामस्थ आक्रमक

Blog Image
एकूण दृश्ये: 149

बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत ; जवळे कडलगमध्ये दहशत: बिबट्यांना पकडा ग्रामस्थ आक्रमक 

     संगमनेर :( प्रतिनिधी )

जवळे कडलग (ता. संगमनेर) येथे शनिवारी (दि. १३) सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. दिलीप कडलग (फळ विक्रेते) यांचा नातू व सुरज कडलग यांचा चार वर्षांचा मुलगा सिद्धेश सुरज कडलग याचा बिबट्याच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला.

घटनेच्या वेळी सिद्धेशचे वडील चारा टाकत होते, तर आजी सायंकाळची झाडझूड करत होती. सिद्धेश घरासमोर उंबरठ्यावर बसलेला असताना अचानक बिबट्याने झडप घातली. माणसांची वर्दळ असतानाही बिबट्याचा असा धाडसी हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीती निर्माण झाली आहे. बिबट्यांचे मानवी वस्तीत वाढते वावरणे चिंताजनक असल्याची भावना ग्रामस्थांत व्यक्त होत आहे.

घटनेनंतर मृतदेह संगमनेर येथील घुलेवाडीत शवविच्छेदन करण्यात आले आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर अहवाल प्राप्त होणार आहे. सिद्धेश हा एकुलता एक मुलगा असल्याने कडलग कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली असून जोपर्यंत बिबट्याला पकडत नाही तोपर्यंत अंतिम संस्कार करणार नसल्याचा इशाराच ग्रामस्थांनी दिला

----- Advertisements -----

या घटनेमुळे जवळे कडलगसह परिसरात भीती व तणावाचे वातावरण आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे मानवी वस्तीत निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रशासन व वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, बिबट्याचे हल्ले हे नित्याची चिंताजनक बाप बनली असून वन विभाग ही सुस्त अवस्थेत आहे की काय तसेच शासनाचे धोरण याबाबत कुचकामी ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बिबट्याने सर्वत्र आता चांगलाच उच्छाद मांडला असून अजून किती जीव जाण्याची वाट बघणार आहेत असा खडा सवाल ग्रामस्थांकडून होत आहे. सुरक्षिततेसाठी त्वरित पावले उचलली नाहीत, तर ग्रामस्थ कडक भूमिका घेतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीच्या सुरक्षात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी जवळे कडलग परिसरात दाखल झाले असून, पिंजरे लावणे व अन्य सुरक्षा उपायांची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार याच ठिकाणी अजून दोन ते तीन बिबटे तसेच तरसही सातत्याने वावरताना दिसत असल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे. 

दरम्यान एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी घटनास्थळी जाऊन कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच वन अधिकारी यांच्याशी संवाद साधत उपाययोजना करण्याची मागणी केली.

आमदार अमोल खताळ यांनी नरभक्षक बिबट्यास शूट करण्याची मागणी केली  आहे. आमदार खताळ सध्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात व्यस्त असल्याने अधिवेशनात याबाबत आपण आपण आवाज उठवणार असून, तालुक्यात बिबट्याने उच्छाद मांडला याबाबत आपण ठोस भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

----- Advertisements -----

निस्वार्थपणे काम केले, तरच जीवन यशस्वी होते.

संत तुकाराम