नगर पालिकेने दिलेल्या ठेक्याने शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले गेले. मात्र असे कसे रस्ते केले, खडी सह डांबर ही उडाले. चारच दिवसात लाखो रूपये खड्यात गेले, बुजविलेले खड्डे दाेनच दिवसांत वाहून गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अक्षरशः शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने विद्यार्थ्याचे अतोनात हाल होत असून नागरिकांना, वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.

ठेकेदाराच्या या अजब कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे साठलेल्या कचऱ्याने जागोजाग दुर्गंधी पसरली असून माधव टॉकीज विद्यानगर, जेधे कॉलनी, बाजारपेठ, आदी ठिकाणी मोकाट जनावर कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. संगमनेर शहर अस्वच्छतेचे आगार बनले असल्याने नागरिकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.

शहरातील बहुतांश रस्त्यांची आता चांगलीच चाळण झालेली असूनही ठेकेदार पालिक प्रशासन साेईस्कररीत्या त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामाला संगमनेरमध्ये थोड्याफार प्रमाणात वेग आला होता. परंतु पावसाळा सुरू होण्यापूर्वीच एक महिना आधीच पावसाने चांगली हजेरी लावल्याने शहरातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. दरम्यान लाखो रुपये खर्च करून शहरातील अनेक भागातील रस्ते दुरुस्तीचे काम करण्यात आले. परंतु या रस्त्याची आता चाळण झाल्याचे दिसून येत आहे. असे कसे रस्ते केले खडी सह डांबर ही उडाले दोनच दिवसात लाखो रूपये वाहून गेले.

शहरातील अकोले बायपास, शारदा शाळेसमोरील रस्ता दिगंबर सराफ विद्यालय, ओहरा कॉलेज, मेडिकवर हॉस्पिटल समोर न मोजता येणारे अगणित खड्डे या ठिकाणी नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागते समोरच हॉस्पिटल असल्याने नागरिक सावधगिरी बाबत वाहने चालवताना दिसून येतात.

अकोले बायपास ते बी एड कॉलेज, बी एड कॉलेज ते श्रमिक मंगल कार्यालयाकडून राहणे मळा आणि ऐश्वर्या पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. नवीन नगर रस्त्यावर नुकतेच रस्त्याच्या मध्यभागी काही प्रमाणात रस्ता दुरुस्त करण्यात आला. परंतु या रस्त्याची आता चाळण झाल्याचे दिसून येत आहे. मालपाणी गेस्ट हाऊस समोर रस्त्यात खड्डा की, खड्ड्यात रस्ता हेच लक्षात येत नाही.

शहरात गेल्या महिनाभर चांगला पाऊस झाला. त्यामुळे सर्वच रस्त्यांवर पाणी साचून खड्डे पडले. अनेक ठिकाणी रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे दुचाकी चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. शहरातील रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होताहेत. जखमींना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले, काही कायमचे जायबंदी झाले आहेत. त्यातच शहरात ड्रेनेज आणि जलवाहिनी टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदाई केली होती. त्यावर पॅचवर्कचे काम करण्यात आले. हे पॅचवर्क देखील रस्त्याशी एकरूप झाले नाही. रस्ते खोदाई नंतरच्या वरवरच्या मलमपट्टीने रस्ते उघडले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले असले तरी कोणत्याही रस्त्याचे काम समाधानकारक झाले नसल्याचे दिसून येत आहे. पावसाचे पाणी साठलेल्या ठिकाणी निचरा करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. पण या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे.
पाण्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि रस्त्यात खड्डे पडतात. आपल्याकडे रस्त्यावरील पावसाळी वाहिन्या तुंबलेल्या असतात त्यामुळे रस्त्यावरून पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे शहरांमध्ये खड्डे पडण्याचे प्रमाण हे जास्त आहे. उखडलेले रस्त्या पैकी अकोले नाक्यापासून बी एड कॉलेजपर्यंत तसेच नवीन नगर रोड नुकताच करण्यात आला. अशा अनेक ठिकाणी रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी केली की काय असा प्रश्न नागरिक आता विचारत आहेत ? शहरातील एकही रस्ता धडाचा नसल्याचे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
लक्षवेधी
याबाबत स्थानिक आमदार अमोल खताळ यांनी नगरपालिकेची संवाद साधला तरी प्रशासनाने फारसे गांभीर्याने घेतलेले दिसत दिसून येत नाही . तद्वतच चार दिवसापूर्वी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे तसेच माजी नगरसेवकांच्या वतीने पालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. दोन दिवसांमध्ये याबाबत निर्णय होणार होता. परंतु अद्याप यावर निर्णय न झाल्याने. नगरपालिका प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सुखाचे रहस्य समाधानात आहे.
संत ज्ञानेश्वर