संगमनेर फेस्टिवलमध्ये चार दिवसाची सांस्कृतिक मेजवानी ; राजस्थान युवक मंडळाचे आयोजन ; अफलातून ठरलेल्या अविस्मरणीय नाटिकाचे होणार सादरीकरण
संगमनेर :भारत रेघाटे
संगमनेर फेस्टिवल’च्या माध्यमातून संगमनेरकरांना गुरुवारपासून (ता.28) रविवारपर्यंत चार दिवस मनोरंजनाची भरगच्च मेजवानी मिळणार आहे. संगमनेरकरांनी या फेस्टिवलचा लाभ घ्यावा असे आवाहन फेस्टिवलचे प्रणेते, राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्रामध्ये ‘संस्कृतिक मानबिंदू’ म्हणून लौकिक! मिळवणार्या संगमनेर फेस्टिवलच्या आयोजनाचे हे सतरावे तर राजस्थान युवक मंडळाच्या स्थापनेचे अमृत महोत्सवी वर्ष आहे.

गुरुवारी 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुप्रसिद्ध नाट्य व चित्रपट अभिनेते संदीप पाठक ‘वर्हाड निघालंय लंडनला’ हा प्रचंड विनोदी लोकप्रिय एकपात्री प्रयोग सादर करणार आहेत. या कार्यक्रमा साठी प्रवेश विनामूल्य आहे. शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता देश-विदेशात प्रचंड गाजलेला आणि मराठी मनात घर केलेला संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचा अविस्मरणीय कार्यक्रम ‘आयुष्यावर बोलू काही’ सादर होणार आहे. शनिवार 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता तुफान विनोदी नाटक ‘आमने सामने’ सादर होणार आहे. लोकप्रिय अभिनेत्री लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या या नाटकाने लोकप्रियतेचे शिखर गाठले असून पुरस्कारांची हॅट्रिक केलेली आहे. रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता महाराष्ट्राची हास्य जत्रा या तुफान विनोदी कार्यक्रमातील कलाकार प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांच्यासह यशस्वी कलाकारांच्या संच पोट धरून हसायला लावणारे लोकप्रिय नाटक सादर करणार आहेत.
विजय नागरी सहकारी पतसंस्था, स्वदेश प्रॉपर्टीज, संगमनेर मर्चंट्स बँक, शारदा नागरी सहकारी पतसंस्था यांनी कार्यक्रमांचे प्रमुख प्रायोजकत्त्व स्वीकारले आहे. दिनांक 29, 30 आणि 31 ऑगस्ट रोजी होणार्या कार्यक्रमांच्या पुढील खुर्च्यांसाठी देणगी प्रवेशिका आवश्यक असून उर्वरित मागील खुर्च्यांसाठी प्रवेश विनामूल्य असल्याचा खुलासा प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. वरील सर्व कार्यक्रम मालपाणी लॉन्सच्या उत्सव सभागृहात होणार आहेत. मंडळाचे कार्याध्यक्ष सुमित अट्टल, उपाध्यक्ष सागर मणियार, सचिव कल्पेश मर्दा, खजिनदार प्रतीक पोफळे, सहसचिव कृष्णा आसावा, सहखजिनदार वेणूगोपाल कलंत्री यांच्यासह कार्यकारणी सदस्य गिरीश मालपाणी, मनीष मणियार, नितीन लाहोटी, ओंकार बिहाणी, रोहित मणियार, सचिन पलोड या पेस्ट साठी मोलाची योगदान लाभणार आहे.
