ब्रेकिंग न्यूज :
भारत

अकोलेतील ग्राहकहिताचे दीपस्तंभ “जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित ;

Blog Image
एकूण दृश्ये: 148

अकोलेतील ग्राहकहिताचे दीपस्तंभ “जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित ; मंडलिक, खतोडे यांच्या सन्मानाने परिसरात आनंदाची लहर

    अकोले : भारत रेघाटे

    ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण, प्रबोधन आणि न्याय मिळवून देण्याच्या कार्यात आयुष्यभर झटणाऱ्या दोन समाजभिमुख व्यक्तिमत्वांचा गौरव ग्राहक पंचायत महाराष्ट्र या राज्यस्तरीय संघटनेने अकोले तालुक्यातील मच्छिंद्र मंडलिक आणि सखाराम खतोडे यांना 'जीवन गौरव पुरस्कार' देऊन केला आहे. या सन्मानाने संपूर्ण संगमनेर, अकोले परिसरात आनंदाची लहर उसळली आहे.

     नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे नुकत्याच झालेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र नाशिक विभागीय अभ्यासवर्गात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी राज्याध्यक्ष विजय लाड, राज्य सचिव अरुण वाघमारे, नाशिक विभागीय अध्यक्ष डॉ. अजय सोनवणे, तसेच गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी हेमंत पाटील यांच्या हस्ते मंडलिक आणि खतोडे यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.

     या अभ्यासवर्गात ग्राहक संरक्षण कायदा 2019, सायबर गुन्हे व बँकिंग जागरूकता, शेतकरी ग्राहकांचे हक्क, तसेच विद्युत नियामक आयोगातील सदस्यांची भूमिका यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली. या प्रसंगी शहादा, तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी उद्घाटन करताना ग्राहक पंचायतच्या सातत्यपूर्ण कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे तालुका अध्यक्ष दत्ता शेणकर आणि कार्याध्यक्ष महेशराव नवले यांनी सांगितले की, मच्छिंद्र मंडलिक आणि सखाराम खतोडे यांनी ग्राहक जनजागृतीचे कार्य अवघ्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचवले. त्यांचे हे निस्वार्थी योगदानच त्यांना ‘जीवन गौरव’साठी पात्र ठरवते. मंडलिक आणि खतोडे हे समाजहिताचे दोन आधारस्तंभ असून मच्छिंद्र मंडलिक यांनी ग्राहक शिक्षण, शेतकरी मार्गदर्शन आणि ग्रामीण पातळीवरील न्यायप्रवर्तनात महत्त्वाचे योगदान दिले. सखाराम खतोडे यांनी 'ग्राहक प्रथम' या तत्त्वाला जीवनाचे सूत्र मानून सामाजिक जागृतीचे असंख्य उपक्रम राबवले.या दोन्ही कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अकोले तालुक्याचे नाव ग्राहक पंचायत महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचले आहे.

----- Advertisements -----

कार्य करा, पण त्यातून काहीतरी शिका.

स्वामी विवेकानंद