अजब टक्केवारीने तालुक्यात होतेय चर्चा ; प्रिया मोरे सह रवी धनवटेचा असाही विक्रम; सर्व विषयात ३५ गुण
संगमनेर { प्रतिनिधी }
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत सर्व विषयांना एकसमान गुण मिळणे म्हणजे दुर्मिळ योगायोगच. असाच योगायोग तालुक्यातील रहिमपूर येथील एका विद्यार्थिनीच्या नशिबी आला आहे. या विद्यार्थिनीला दहावीच्या परीक्षेत सर्व विषयांना एकसमान ३५ गुण मिळाले असून, ती ३५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.
इयत्ता दहावीच्या परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थ्याला किमान प्रत्येक विषयात ३५ गुण मिळणे गरजेचे असते. ३५ टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी दहावी शालांत परीक्षेत पास होत असतो. ३५ गुण मिळवून उतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना लोक विनोदाने काठावर पास झाला असे म्हणत असतात.
तालुक्यातील रहिमपूर येथील भिमाजी अंबुजी शिंदे, बिरोबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सह्याद्री बहुजन विद्या प्रसारकची प्रिया किरण मोरे ही विद्यार्थीनी इयत्ता दहावीच्या वर्गात सर्व विषयांमध्ये समान ३५ गुण प्राप्त केले. तिला ५०० पैकी १७५ मिळाले असून ३५ टक्कज मिळाल्याने प्रिया मोरेच्या मार्काची तालुक्यात सर्वत्र चर्चा रंगल आहे.
परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रयत्नांची पराकष्ठा करुन अभ्यास करावा लागतो. तसाच प्रयत्न प्रिया मोरे हिने देखील केला मात्र तिला सर्वच विषयात तंतोतंत ३५ गुण मिळाले असून एकाही विषयात जादा अथवा कमी गुण मिळाले नसल्यामुळे प्रिया मोरे हिच्या नावावर ३५ टक्के गुण मिळवून पास होण्याचा अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. त्यामुळे रहिमपूरच्या ग्रामस्थांनी या विद्यालयातून ९२.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या तनुष्का शार्दुल शिंदे आणि ३५ टक्के गुण मिळवून नशीबवान ठरलेल्या प्रिया मोरे या दोन विद्यार्थिनींचा ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार केला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास जाधव, सरपंच सविता शिंदे, माजी सरपंच शांताराम शिंदे, ग्रामसेवक मांढरे, आप्पासाहेब शिंदे, सह्याद्रीचे संचालक नानासाहेब शिंदे, सीताराम शिंदे, बाबासाहेब शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रभाकर गुळवे, राजेंद्र वाळुंज, लखन शिंदे, दत्तात्रय खुळे, माजी सरपंच बाजीराव शिंदे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रिया मोरे ही येथील ग्रामपंचायत कर्मचारी किरण सोमनाथ मोरे यांची कन्या आहे.
जिल्ह्यातील नेवासा शहरातील संभाजीनगर प्रभागात राहणाऱ्या आणि तेथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या रवी राजेंद्र धनवटे या विद्यार्थ्यालाही दहावीच्या परीक्षेत सर्व विषयांमध्ये एक समान ३५ गुण मिळवून तो ३५ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे यंदाच्या या दहावीच्या परीक्षेत प्रिया किरण मोरे आणि रवी राजेंद्र धनवटे नशीबवान ठरले आहेत.

