आयशर आणि चारचाकीच्या चढाओढीत घाट माथ्यावर बस पलटी ; ७० प्रवाशी सुखरूप ; मोठा अनर्थ टळला बॅगासाठी प्रवाशांनी तोडल्या काचा
संगमनेर ( भारत रेघाटे)
पाचच दिवसापूर्वी एका आयसरने संगमनेर खुर्द येथे ट्रक चालकाला ओव्हरटेक करताना ट्रक पलटी होऊन एका व्यक्तीला आपला जीव गमावा लागला. ही घटना ताजी असतानाच, संगमनेर आगारातून संगमनेरहून साकुरकडे निघालेल्या बसला एका आयशर आणि चार चाकीच्या चढाओढीत साईट देण्याच्या नादात बस पलटी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. परंतु चालकाच्या प्रसंगावधानाने तब्बल ७० प्रवाशी या दुर्घटनेत सुखरूप वाचले. थोडीशी चूक झाली असती तर दिवाळी आधीच फार मोठा अनर्थ घडला असता.

गुरुवार दि १६ रोजी संगमनेर आगारातून संगमनेर साकुर बस क्रमांक एम एच ७ सी ९२५२ आपल्या पुढील प्रवासासाठी दुपारी दीड ला निघाली होती. परंतु, चंदनापुरी घाटमाथ्यावरील चढावर पोहोचताच मागून येणाऱ्या एका चार चाकी आणि आयशरच्या चढाओढीत आयशरला चारचाकीने कट मारण्याच्या नादात बस चालकाच्या प्रसंगावधाने बस बाजूला घेताच बस मात्र दुपारी २:१५ ला पलटी झाली. या दुर्घटनेत तब्बल ७० प्रवासी वाचले असून चालकाकडील आणि संकटकालीन मार्गातून सर्वच प्रवाशी सुखरूप बाहेर पडले. या घटनेत चालकाच्या हाताला तसेच आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. परंतु बस पलटी झाल्याने या अपघातात बस चे एका बाजूचे अतोनात नुकसान झाले. तर बस मधील असलेले साहित्य आणि बॅगाचे नुकसान होऊ नये म्हणून ते काढण्यासाठी प्रवाशांनी बसच्या काचा फोडत सामान बाहेर काढले.

चालक वाहकाचा प्रवाशांना धीर व मदत ;
बस पलटी झाल्याने नेमके काय झाले हे लक्षात आलेच नाही. घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बस मधील साहित्याचे नुकसान होऊ नये म्हणून प्रवाशांनी बॅग आणि साहित्य काढण्यासाठी एकच धावपळ करत बसच्या काचा फोडत सामान बाहेर काढले. परंतु चालक सर्जेराव मुंढे आणि वाहक महेंद्र दरेकर यांनी प्रवाशांना साहित्य काढण्यासाठी मदत करत प्रवाशांना धीरही दिला. काही युवकांनी आईसर आणि चार चाकीचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला परंतु ते सुसाट वेगाने निघून गेले. महामार्ग पोलीस आणि युवकांनी बस मधील प्रवाशी आणि साहित्य काढण्यासाठी चालक वाहकाला मदत केली. यावेळी घाटात ये जा करणा-यांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे वाहतुकीस चांगलाच खोळंबा निर्माण झाला होता. महामार्ग पोलीस पथकांना वाहतूक सुरळीत करण्यास परिश्रम घ्यावे लागले.
डिझेलचा आभाव : फे-यात फपात
संगमनेर आगारात बसेसची कमतरता नाही. नव्याने दहा बस दाखल झाल्या आहेत परंतु, डिझेलचा अभाव असल्याने बस फेऱ्यात कपात केली जात असल्याचे बोलले जाते. सप्टेंबर महिन्यात संगमनेर आगाराला साडे अकरा लाख रुपयाचा फायदा झाला आहे. आता दिवाळी सुरू झाली असून प्रवाशी संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे. बस फे-या कमी असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो बस मधील फेरीत कपात करू नये अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
