संगमनेर प्रतिनिधी
शहरातील अवैध रित्या सुरू असणाऱ्या कत्तलखान्या बाबत संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि संगमनेर शहर पोलीस निरीक्षक यांच्या कडून शासनाला देण्यात आलेली सर्व माहिती धादांत खोटी असून दिशाभूल करणारी असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळात लक्षवेधी द्वारे शासनाच्या निदर्शनास दिले. या अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणीच त्यांनघ गृहमंत्र्यांकडे केली .

महाराष्ट्रात सर्वात जास्त खुलेआम कत्तलखाने संगमनेर शहरात राजरोसपणे सुरू असतात. शहर पोलीस त्यांच्या विरोधात थातुरमातुर कारवाई करत आहे. गोवंश हत्याबंदी कायदा अमलात आला असूनही कायदयातील तरतूदीतून पळवाट काढून खुलेआम कत्तलखाने चालत आहेत. पोलीस प्रशासना कडूनच या चालक-मालकांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आत्तापर्यंत संगमनेर पोलिसांनी गोवंश हत्या, आणि कत्तलखाने प्रकरणात एकाही कत्तलखाना चालक मालकावर एम पी डी ए नुसार कारवाई केलेली नाही. परंतु अशी कारवाई केली असल्याचे संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि संगमनेर शहर पोलीस निरीक्षक यांनी गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांना सांगत खोटी माहिती देऊन शासनाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी संगमनेर उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी आणि शहर पोलीस निरीक्षक यांच्या वर निलंबनाची कारवाई करावी. तसेच त्या माहितीची खातरजमा न करणारे अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सक्त ताकीद देण्यात यावी अशीही जोरदार मागणी आमदार खताळ यांनी विधिमंडळात विधानसभा अध्यक्षांकडे केली.

संगमनेर शहरातील महाविद्यालये, रुग्णालये व धार्मिकस्थळे, झोपडपट्टी परिसर इत्यादी ठिकाणी अवैध गुटखा, मादक पदार्थ, नशेची गोळी, सिगारेट तसेच अफू, गांजा जवळपासच्या पान टपरीवर खुलेआम विक्री केली जात आहे. मटका, ऑनलाईन जुगाराकडे बेरोजगार तरुणांच्या रांगा दिसून येत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारू निर्मिती, वाहतुक करून त्याची राजरोसपणे विक्री केली जात आहे. या माध्यमातून संगमनेरची तरुण पिढी बिघडविण्याचे काम होत आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे .या सर्व प्रश्नांकडे आमदार खताळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधत या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
स्वतःला ओळखणे हीच खरी प्रगतीची सुरुवात आहे.
महात्मा गांधी