ब्रेकिंग न्यूज :
भारत

रंगोत्सव मैत्रीचा ; कट्ट्यावरचे रंग बनले उत्सवांचे रंग ;

Blog Image
एकूण दृश्ये: 57

रंगोत्सव मैत्रीचा ; कट्ट्यावरचे रंग बनले उत्सवांचे रंग ; विचार कट्टा बनला संगमनेरची आगळी वेगळी ओळख 

      संगमनेर { प्रतिनिधी }

भारतीय संस्कृतीत सण, उत्सवांचा संगम हे केवळ परंपरेचे प्रतीक नसतात, तर ते माणसांच्या मनांना एकत्र आणणारे क्षण असतात. होळी आणि धुळवडही त्याला अपवाद नाहीत. होळी म्हणजे वाईट विचारांची होळी, धुळवड म्हणजे नात्यांना आधार देणारा आधारवड. तर रंगपंचमी प्रत्येकाच्या जीवनात रंग भरणारा सण अशी भावना या सणामागे दडलेली आहे. जीवनातला ताण तणाव, मतभेद, नकारात्मकता दूर करून नव्या उत्साहाने जगण्याचा संदेश या सणातून दिला जातो. असाच आनंदाचा, मैत्रीचा आणि नैसर्गिक आल्हाद देणारा रंगोत्सव संगमनेर बसस्थानक समोरील 'पत्रकार कट्टा’ येथे रंगीबेरंगी रंगांची उधळण करत रंगतदारपणे साजरा करण्यात आला.

हा कट्टा म्हणजे फक्त बसून गप्पा मारण्याची जागा नाही, तर येथे शहरातील नानाविध घडामोडींचा धांडोळा घेतला जातो, सुख, दुःखाची देवाणघेवाण होते आणि समाजातील प्रश्नांवरही विचारमंथन घडवत कृतीतही उतरवले जातात.

कधीकाळी पत्रकारांनी तयार केलेल्या नवविचाराची निर्मिती म्हणून हा कट्टा सर्वश्रुत आहे. कट्ट्यावरचे मित्रमंडळ, तसेच सौ शहरी एक संगमनेरी या ग्रुपचे मेकर संजय क्षत्रिय अर्थात नेहमी कवरेज मध्ये असलेले तवरेज व ग्रुप सदस्य हे कार्यक्रमांचे नियोजन करत असतात.

यावर्षीची रंगपंचमीही त्याला अपवाद नव्हती. शहरातील अनेक मान्यवर या आनंदोत्सवाला उपस्थित होते. संगमनेर शहराला नव्या रंगाढंगात उभे करण्याचे स्वप्न आमदार सत्यजीत तांबे पाहत आहेत. विविध रंगांनी माखलेला त्यांचा चेहरा उपस्थितांचा भाग बनला. आणि आमदार तांबे यांच्या उपस्थितीने वेगळी उंची गाठली. सोबत माजी नगराध्यक्ष विश्वास मूर्तडक, नगरसेवक गजेंद्र अभंग, निखिल पापडेजा, सौरभ कासार, सतीश आहेर, श्याम कर्पे, हरीश सारडा, विजय भडांगे, कैलास वाकचौरे, संतोष मुर्तडक, राजू गुंजाळ, अमोल बोराडे, गणेश गुंजाळ , काशिनाथ गोसावी तसेच पत्रकार मित्र आणि मान्यवरांच्या उपस्थितीत रंगपंचमीचा हा उत्सव रंगतदार झाला. संगमनेरमध्ये सर्वाधिक उत्साहाने साजरा झालेल्या कार्यक्रमांपैकी हा एक आगळा वेगळा कार्यक्रम ठरला.

----- Advertisements -----

या कट्ट्याचा इतिहासही तितकाच रंजक आहे. सुरुवातीला चार पत्रकार रोज सकाळी येथे भेटून विविध वृत्तपत्रांची पाने चाळत शहरातील प्रश्नांवर चर्चा करत असत. त्या चर्चांमधून ‘विचार कट्टा’ ही संकल्पना जन्माला आली. संगमनेर श्रमिक पत्रकार संघाचे शाम तिवारी, गोरक्षनाथ मदने, नितीन ओझा, सुनील नवले, सतीश आहेर, सुनील महाले, संजय अहिरे, अमोल मतकर, आनंद गायकवाड, सचिन जंत्रे, सोमनाथ काळे, भारत रेघाटे, शेखर पानसरे, नीलिमा घाडगे, धीरज ठाकूर, सुशांत पावसे, काशिनाथ गोसावी, अंकुश बुब, संजय साबळे , संदीप वाकचौरे, मंगेश सालपे, गोरक्ष नेहे,, बाबासाहेब कडू अशा पत्रकार मंडळीनी ह्या कट्ट्याचे नाते जपले, जिवंत ठेवला, आपलासा केला ,पत्रकारांच्या मैत्रीने उभा राहिलेला हा कट्टा, गप्पा विचारांनी त्यास जिवंत श्वास दिला, तो साऱ्यांचा झाला. आणि आज तोच संगमनेर शहराची खास ओळख बनला.

हळूहळू विविध क्षेत्रातील दहा बारा जणांचा समूह येथे नियमितपणे एकत्र येऊ लागला. शहरातील सुख दुःख,  समस्या, सामाजिक घडामोडी आणि लोकांच्या अडचणी यावर चर्चा होत राहिली अनेक प्रश्न सोडवण्यासाठीही पुढाकार घेण्यात आला. काळाच्या ओघात हा कट्टा केवळ चर्चेचा नाही तर मैत्रीचा, आनंदाचा आणि आठवणींचा कट्टाच बनला. कधी चहा, कॉफीचा आस्वाद, कधी गरमागरम नाश्ता, कधी वाढदिवसाचे सेलिब्रेशन, अशा अनेक प्रसंगांनी या कट्ट्याला वेगळी ओळख मिळाली. दररोज भल्या पहाटे काही सुजाण संगमनेरकर तर संध्याकाळी श्रमिक पत्रकार संघाचे सदस्य येथे येत असतात. त्यामुळे या कट्ट्यावर वाढदिवस, आनंदसोहळे आणि मैत्रीचे क्षण हे नवे राहिलेच नाहीत.

यावर्षीच्या रंगपंचमीला मैत्रीच्या या कट्ट्यावर रंगांची उधळण विशेष ठरली. शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास वाकचौरे हिरवा रंग घेऊन आले, तर इतर मित्रमंडळी भगवा, लाल, निळा असे विविध इंद्रधनुष्याचे सप्तरंग आपल्या अजस्त्र मुठीत घेत या कट्ट्याची कमानच आपल्या ताब्यात घेतली. या रंगोत्सवातून एक सुंदर संदेशही देण्यात आला,रंग माणसांना विभागण्यासाठी नसतातच. ते माणसांना एकत्र आणण्यासाठी असतात. या आनंदोत्सवाला आणखी रंगत आणली ती आवजीनाथ वडापावचे मालक विजय भडांगे यांनी. नुकतीच त्यांनी नवीन आकर्षक चारचाकी घेतल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ मित्रांसाठी चहा पाण्याची व्यवस्था केली. कट्ट्यावरच्या मित्रांनी रंग खेळत, हसत खेळत या आनंदात सहभागी होत मैत्रीची गोडी वाढवली.

----- Advertisements -----

कट्ट्यावरची एक जुनी म्हण आजही सगळ्यांच्या तोंडी आहे 'खा भजे आणि वाहा ओझे!' इथे कोणीच हमाल नाही, सगळे मालदार ,स्वयंभू आहेत. प्रथितयश उद्योजक आहेत. शहर विकासासाठी वैचारिक ओझे वाहण्यासाठी ही मंडळी एका फोन एकत्र येतात. कधी आमदार अमोल खताळ, तर कधी व्यापारी प्रथितयश उद्योगपती शेतकरी ही या कट्ट्यावर येऊन मैत्रीच्या वर्तुळात सामील होतात. येथे पदापेक्षा नात्यांचीच खरी ओळख असते. विश्वास, आपुलकी आणि विचारांची सुंदर नात्यांच्या वेलीची गुंफण जपत हा कट्टा आजही मैत्रीच्या नात्यांना दृढ करत राहतो. सुशिक्षित, उच्चभ्रू आणि विविध क्षेत्रांत आपली ओळख निर्माण केलेल्या मित्रांचा हा कट्टा ! कोणी इंजिनियर, कोणी उद्योजक, कोणी व्यापारी तर कोणी कष्टकरी शेतकरी अशा विविध क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येऊन जपलेले हे मैत्रीचे सुंदर बंधन. विचारांची देवाणघेवाण, अनुभवांची शिदोरी आणि विश्वासाच्या नात्याने बहरत राहणारा हा मैत्रीच्या कट्ट्यावर जमले तर या सगळ्यासाठी ऊर्जा हवीच. ती ऊर्जा मिळते निमाई स्वीट आणि आवजीनाथच्या गरमागरम वड्या भज्यांमधून आणि तिखट मिरच्यांमधून लाभते. जणू युद्धाला निघालेल्या सैनिकांनी घोड्यावर बसता बसता शेतातील कणसं खाऊन ही माणसं एक वेगळी ताकद बनतात, आवजीनाथ मध्ये या रंगलेलेल्या रंगनाथांनी वडे भज्यांवर येथेच्छ ताव मारत मित्रमंडळी पुढच्या कार्यक्रमांकडे आगेकूच करत पुढे निघाली. खरं तर हा कट्टा फक्त गप्पांचा नाही, तो विचारांचा, मैत्रीचा आणि समाजाशी जोडलेल्या नात्यांचा कट्टा आहे. आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते रंग, भजे आणि मैत्रीच्या अंतरंगात शिरणारा हा मैत्रीचा कट्टा यांच्याशिवाय रंगपंचमी पूर्ण कशी होणार!

जीवनात यशस्वी होण्यासाठी धैर्य आवश्यक आहे.

सावरकर